नितीन देशमुख : पनवेल – दो भेल देना’, ‘एक भेल… कांदा टमाटर जादा’ …एकामागोमाग एक ऑर्डर्स सुरू असतात. भेळवालाही सगळे जिन्नस एकत्र करून झटपट भेळेची पुडी तयार करून देत असतो. मुंबईतल्या जवळपास सगळ्या रेल्वेस्थानकांमध्ये संध्याकाळच्या वेळी हे चित्र दिसून येऊ लागलंय. भेळेला अचानक एवढी मागणी येण्याचं कारण डाएटच्या बाबतीत मुबईकरांमध्ये वाढत असलेली जागरूकता असल्याचे आहारतज्ज्ञांचे मत आहे.
संध्याकाळी 5 ते 7 ही भुकेची वेळ आहे. त्यात काही तरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. संध्याकाळी ऑफिसमधून घरी जायला निघालं की भूक तर लागलेली असते. वडापाव, समोसा, फ्रँकीसारखे चमचमीत, पण आरोग्याच्या दृष्टीनं अयोग्य असणारे खाद्यपदार्थ खुणावत असतात, पण त्यातून किती कॅलरीज पोटात जाणार हा हिशेबही एकीकडे मनात सुरू असतो. त्यामुळे डाएटची काळजी घेणार्या मुंबईकरांची पावलं भेळवाल्याकडे वळू लागली आहेत. ‘संध्याकाळच्या वेळी वडापाव, भजीपाव खाण्यापेक्षा साधी भेळ खाणं हा बदल चांगला आहे. कुरमुरे, चणे-शेंगदाणे, शेव असलेल्या भेळेतून खूप कमी कॅलरीज मिळतात. लोक डाएटच्या बाबतीत हल्ली खूप काळजी घेताना दिसताहेत. ऑफिस सुटल्यावर संध्याकाळच्या वेळी थोडी भूक असते. खरं तर तेव्हा एखादं फळ खाणं चांगलं, पण तेव्हा कुणी फळ खाण्याच्या मूडमध्ये नसतं. त्यामुळे थोडं चटपटीत, पण आरोग्याच्या दृष्टीनं खाणं म्हणून भेळ चांगली. आमच्याकडे येणार्या अनेकांना आम्ही भेळ खाण्याचा सल्ला देतो,’ असं एका आहारतज्ज्ञानं सांगितलं. भेळेमुळे तात्पुरतं पोट भरतं आणि हाय कॅलरीची भीती नाही. पचायला जड असे पदार्थ न खाल्ल्यामुळे घरी जाऊन जेवता येतं. त्यामुळे भेळेला पसंती द्या.
संध्याकाळी भेळ खाणे हा पर्याय आपल्या सामान्य शाकाहारी लोकांसाठी, पण मदिराप्रेमी म्हणतील संध्याकाळी आम्ही काय भेळ खात बसायचे काय? सूर्य मावळतीकडे झुकू लागला की फेसाळलेले चषक खुणावू लागतात. सोबत चकण्याला कबाब, तंदूर, चिकन चिली, लोलिपॉप अगदीच नाही, तर उकडलेली अंडी, व्हेज कबाब, किवा क्रिस्पी सोडून भेळ कोण खाणार. ऑफिस सुटल्यावर जादा काम होते असे घरी सांगून यांची पावले नित्यनेमाने बारकडे वळतात. त्यामुळे रेल्वे स्टेशन जवळील बार फुल्ल झालेले दिसतात. या ठिकाणीही भेळवाल्याप्रमाणे मूग डाळ किवा चणा डाळ मागवणारा. कांदा टमाटर जादा असे वेटरला सांगताना ऐकायला मिळतेच. रात्र चढत जाते तसे या ठिकाणी अमेरिकेच्या अध्यक्षाच्या धोरणापासून ते गल्लीतील राजकारणापर्यंत सर्वांवर चर्चा होऊन तर्रर झालेल्या व्यक्तीकडून तज्ज्ञाचा आव आणून अमेरिकेच्या अध्यक्षापासून सगळ्यांना फुकट सल्ले दिले जातात आणि हो, इथे डाएटवर ही गंभीरपणे चर्चा होते, पण दुसर्या दिवशी लक्षात येते की ती कोणी फारशी मनावर घेतलेली नाही.
मदिरा झाल्यावर काहींना गृहस्वामिनीचा रागाने लाल झालेला चेहरा दिसू लागताच ते घरची वाट चालू लागतात, पण काही हौशी असतात. त्यांना चटपटीत भेळेप्रमाणे मदिराक्षी खुणावू लागते. मग पावले माडीची वाट चालू लागतात. डोक्यात मदिरेची नशा असल्याने त्यातील धोके डोळ्यावर आलेल्या झापडमुळे दिसत नाहीत. सुरक्षेसाठी साधनांचा वापर होत नाही. त्यामुळे एचआयव्ही पॉझिटीव्हची संख्या वाढताना दिसत आहे. आपल्या देशात शासन त्याबाबत जागृती करण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न करीत आहे, पण त्याचा परिणाम मदिरा डोक्यात गेल्यावर होत नसल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये चहा घेताना एक संवाद कानी पडला. सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते बसले होते. त्यांच्या समोर बसलेली सुशिक्षित सामाजिक क्षेत्रात काम करणारी महिला त्यांच्या कामाची माहिती घेत होती. तिने त्यांना विचारले की, तुम्ही एड्सवर काम करता? अहो, तो कधीच संपला. आता फक्त तो तसल्या बायकांनाच होतो. हे ऐकून ते कार्यकर्ते मात्र आवाक् झाले.