Breaking News

गाढेश्वर धरणात बुडणारे दोघे सुखरूप बाहेर

पनवेल तालुका पोलिसांचे प्रसंगावधान
पनवेल : वार्ताहर
गाढेश्वर धरणाच्या परिसरात पोहण्यास गेलेल्या व पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहत चाललेल्या दोघांसाठी पनवेल तालुका पोलीस देवदूत ठरले असून पनवेल तालुका पोलिसांनी प्रसंगावधान राखत मृत्यूच्या दाढेतून या दोघांना सुखरूप बाहेर काढले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे विविध स्तरांतून कौतुक केले जात आहे.
पनवेल तालुक्यातील गाढेश्वर (देहरंग) धरणाच्या परिसरात पावसाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात मजा लुटण्यासाठी पर्यटकांच्या झुंडी शनिवार व रविवारी येत असतात. अतिउत्साहामुळे काही पर्यटक खोल पाण्यात उतरतात. त्यामुळे गाढेश्वर धरणाकडे जाण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे, मात्र तरीदेखील काही उत्साही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून धरणाकडे जातात. पनवेल तालुका पोलिस ठाणे हद्दीतील नेरे बीटमध्ये पोलिस गस्त घालत असताना गाढेश्वर नदीपात्रात सोहेल खावजौद्दिन अहमद शेख व मनोज शंकर गांगुर्डे हे दोघेजण पाण्याच्या जोरदार प्रवाहातवाहत जाऊन पाण्यात अडकल्याचे पोलिसांना दिसले.
सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे, तुकाराम कोरडे, संदीप पाटील, धनंजय पठारे, कांबळे, जाधव यांनी तत्काळ दोरीच्या साहाय्याने या दोघांना सुखरूप बाहेर काढले. तसेच या वेळी पोलिसांनी अतिउत्साह टाळण्याचे आणि सतर्कतेचे आव्हान केले आहे.

पर्यटकांनी वर्षासहलीसाठी येताना त्या भागातली पूर्ण माहिती घ्यावी तसेच विविध पर्यटनस्थळी पोलिसांनी सूचनाफलक लावले आहेत. त्या सूचनांचे योग्य पालन करावे.
-अनिल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply