दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी
अलिबाग ः प्रतिनिधी
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाटरस्त्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी हा रस्ता शनिवार (दि. 29)पासून पुढील 15 दिवसांकरिता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केली आहे.
रायगड अपर पोलीस अधीक्षक यांच्या पत्रानुसार अरूंद व वळणाच्या असलेल्या आंबेनळी घाटरस्तालगतच्या डोंगरकड्याचे या भागात पडणार्या पावसामुळे भूस्खलन झाले. या डोंगरावरील माती व मोठ मोठे दगड रस्त्यावर आल्याने तसेच दुसर्या बाजूला खोल दरी असल्याने हा घाटरस्ता वाहतुकीस धोकादायक असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
या रस्त्यावरून वाहतुक सुरू ठेवल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवून मोठया प्रमाणात जीवित व वित्तीय हानी होण्याची दाट शक्यता आहे. त्या कारणास्तव हा रस्ता बंद करण्यात येऊन पोलादपूर खेड-चिपळूण-पाटण- कराड-कोल्हापूर तसेच पाटणकडून सातारामार्गे पुण्याकडे असा पर्यायी मार्ग आहेत, असे अभिप्राय सादर केले गेले आहेत.
या पार्श्वभूमीवर महाड उपविभागीय दंडाधिकारी यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अनुषंगाने पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) घाटरस्ता 15 दिवस सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.