पेण येथील उपजिल्हा रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन; सर्वपक्षीयांचा पाठिंबा
पेण ः प्रतिनिधी
सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या पेण तालुक्यातील जिते येथील सारा ठाकूर या मुलीचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शनिवारी (दि. 29) पेण येथील उपजिल्हा रुग्णालयबाहेर आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन केले. दोषींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनास पाठिंबा दर्शविला
सारा ठाकूर या 12 वर्षीय मुलीला 25 जुलै रोजी मण्यार साप चावला होता. पेण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्याने साराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या विरोधात जिते येथील नितीन ठाकूर, अतिष ठाकूर, सरपंच सुप्रिया म्हात्रे, दुरशेत सरपंच दशरथ गावंड, खरोशी महेश पाटील, लीलाधर म्हात्रे, कैलास म्हात्रे, गोरख तांडेल, निलेश तांडेल, निखिल म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, गजानन म्हात्रे, दीपेश म्हात्रे, जितू ठाकूर, विशाल भोईर यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले. साराच्या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार डॉक्टरांवर कारवाई व्हावी याकरिता शेकडो महिला, पुरुषांनी उपजिल्हा रुग्णालय गाठले. त्याचप्रमाणे सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
साराच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉक्टरांना तत्काळ निलंबित करा, रुग्णांना 24 तास उपचार मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयात डॉक्टर्स व नर्स 24 उपलब्ध करण्यात यावेत, प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिका व चालक उपलब्ध असणे बंधनकारक करा, रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी, प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालय येथे सोयीसुविधा उपलब्ध करा, औषधांचा साठा उपलब्ध करावा, तज्ज्ञ डॉक्टर्स 24 तास उपलब्ध करावेत, उपजिल्हा रुग्णालय येथे ईसीजी, रक्त तपासणी मशिनरी, व्हेन्टीलेटर व इतर तातडीची उपकरणे लवकरात लवकर उपलब्ध करावीत अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
या वेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पेण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्यादेवी राजपुत यांच्याशी चर्चा केली तसेच दूरध्वनीद्वारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी यांच्याशी चर्चा करण्यात आली.
घटनेच्या दिवशी उपजिल्हा रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या डॉ. प्रिती पाटील यांना तत्काळ निलंबित करण्यात आले तसेच प्राथमिक आरोग्य जिते येथील डॉ. मिलींद पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आयुक्तांकडे पाठविला आहे. त्यांनाही लवकरच निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी दिली तसेच इतर मागण्यांची पूर्तता 11 ऑगस्टपर्यंत करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, माजी जि. प.सदस्य डी. बी. पाटील, विक्रम चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, हरिष बेकावडे, संजय डंगर, नरेंद्र ठाकूर यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.