Breaking News

राजस्थानात लाल वादळ

राजस्थानातील संशयास्पद ‘लाल डायरी’मध्ये नेमके काय आहे हे यथावकाश चौकशीअंती बाहेर येईलही, परंतु ही रोजनिशी तेथील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयपथावर घेऊन जाणार यात शंका नाही. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आपल्या भाषणात राजस्थानातील प्रचार भ्रष्टाचारविरोधी अभियानाच्या अंगाने जाणार हे सूचित केले आहे.

अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या राजस्थानातील निवडणुकीच्या प्रचारास अचानक लाल रंग प्राप्त झाला आहे. येथील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचेच मंत्रिमंडळातील एक सहकारी राजेंद्र गुढा यांनी विधानसभेमध्ये एक लाल डायरी फडकवली आणि त्यामध्ये मुख्यमंत्री गेहलोत यांच्या भ्रष्टाचारी काळ्या कारनाम्यांचा कच्चा चिठ्ठा असल्याचा दावा केला. त्यांच्या या आरोपामुळे प्रचंड खळबळ उडाली. सभागृहातून त्यांना बाहेर काढण्यात आले. शिवाय त्यांचे मंत्रिपददेखील गेलेच. हा प्रकार घडून काही दिवस झालेले असताना राजस्थानातील सिकर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. अर्थात पंतप्रधान राजस्थानात गेले होते दुहेरी कारणांनी. काही जनहितार्थ उपक्रमांचे लोकार्पण करण्यासाठी ते तेथे गेले होते. त्या सभेमध्ये राजकीय शिष्टाचारानुसार मुख्यमंत्री गेहलोत यांची उपस्थिती आवश्यक होती, परंतु सिकर येथील कार्यक्रमात आपल्याला भाषणाची परवानगी नाकारल्याचा आरोप गेहलोत यांनी केला व पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला जाण्याचे टाळले. पंतप्रधान कार्यालयाने खणखणीत शब्दांत या आरोपाचा इन्कार करीत गेहलोत यांच्याशी झालेल्या ई-मेल संवादाचे पुरावेच जाहीर करून टाकले. त्यामुळे गेहलोत यांची प्रचंड पंचाईत झाली. या सरकारी कार्यक्रमात पंतप्रधानांनी एकही राजकीय वक्तव्य न करण्याचे भान ठेवले. उलटपक्षी मुख्यमंत्री गेहलोत यांचा पाय दुखावला असून ते लवकर बरे व्हावेत, अशी कामनाही व्यक्त केली. त्यानंतर झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधानांनी लाल डायरीचा मुद्दा उचलून गेहलोत सरकारला अक्षरश: धारेवर धरले. या लाल डायरीमध्ये नेमके काय आहे याबाबतचे रहस्य अद्याप पुरते उलगडलेले नाही, परंतु हा जबरदस्त दस्तावेज सीबीआय आणि ईडीसारख्या तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची चर्चा आहे. राजस्थानात ‘झूठ की बाजार में लूट की दुकान’ काँग्रेस सरकारने उघडले आहे, अशा शब्दांत मोदी यांनी टीकास्त्र सोडले. त्यामुळे आता पुढचे चार महिने राजस्थानात राजकीय गरमागरमीचेच वातावरण असेल हे निश्चित. 2018 साली काँग्रेस पक्षाने राजस्थानात विधानसभा जिंकली होती. त्यानंतर वर्षभरातच लोकसभेसाठीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. विधानसभेला भाजपकडे पाठ फिरवणार्‍या राजस्थानी मतदारांनी लोकसभेसाठी मात्र मोदी यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली होती. या राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा भाजपनेच जिंकल्या होत्या. आता विरोधकांच्या तथाकथित ऐक्याच्या पार्श्वभूमीवरही राजस्थानी जनतेने तोच कित्ता गिरवावा, अशी रणनीती भाजपने आखलेली दिसते. पंतप्रधानांच्या तडाखेबंद सभेनंतर राजस्थानातील वातावरण पालटले आहे. पंतप्रधानांनी विधानसभा निवडणुकीपेक्षाही लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचाच नारळ फोडला आहे, असे आता बोलले जात आहे. मोदी यांनी केलेल्या लाल डायरीच्या आरोपाला गेहलोत यांनी प्रत्युत्तर देण्याचा दुबळा प्रयत्न केला. लाल डायरीपेक्षा लाल सिलिंडर, लाल टोमॅटोबद्दल बोला अशी टोलेबाजी त्यांनी केली, पण लाल डायरीतील आरोपाबाबत त्यांनी मौन पाळले. एकंदरीत पंतप्रधानांनी पुढील वर्षी होणार्‍या अपेक्षित विजयाचे भाकित जणू करून टाकले. तिसर्‍या टर्ममध्ये भारत जगातील तिसर्‍या क्रमांकांची अर्थव्यवस्था होईल हे त्यांचे भाकित खरे ठरो हीच इच्छा!

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply