अलिबाग ः प्रतिनिधी
बालकांचे चुकीचे लसीकरण करणार्या जिते प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन आरोग्य सहाय्यक व एक आरोग्य सेवक यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे तसेच सर्पदंश झालेल्या 12 वर्षीय मुलीला वेळेत प्राथमिक उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात घटनेवेळी जिते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्यालयी उपस्थित नसणार्या वैद्यकीय अधिकारी मिलिंद पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आरोग्य सेवा संचालक आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली.
1 मे 2023 रोजी जिते प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच बालकांना गोवर रुबेला लस देणे आवश्यक असताना त्यांना तेथील आरोग्य कर्मचार्यांनी बीसीजी लस दिल्याची घटना घडली होती. यानंतर संबंधित बालकांच्या शरीरावर जखमा होऊन त्यांना त्रास सहन करावा लागला. या प्रकरणाची चौकशी आरोग्य विभागाकडून करण्यात आली. या प्रकरणी आरोग्य सहाय्यक विकास पाटील, आरोग्य सहाय्यक प्रियांका म्हात्रे, आरोग्य सेवक कोमल पाटील यांच्याकडून कर्त्याव्यात कसूर झाल्याचे निष्पन्न झाले असून या तिघांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी निलंबित केले आहे.
पेण जिते येथील सारा ठाकूर या 12 वर्षीय मुलीला मण्यार जातीचा सापाने दंश केल्याची घटना 26 जुलै रोजी घडली होती. या प्रकरणात साराला प्राथमिक उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत होता. या प्रकरणाची आरोग्य विभागाकडून चौकशी करण्यात आली असून घटनेच्या दिवशी जिते प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मिलिंद पाटील हे केंद्राच्या मुख्यालयी हजर नसल्याचे समोर आले आहे तसेच मे महिन्यात चुकीचे लसीकरण झाले या प्रकरणात डॉ. मिलिंद पाटील यांनी क्षेत्रीय कामाचे व्यवस्थितरीत्या पर्यवेक्षण केले नसल्याने त्यांनी कर्त्याव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे डॉ. पाटील निलंबित करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आरोग्य सेवा संचालक आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
Check Also
दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीला एमआयडीसीकडून जागेचे हस्तांतरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीच्या पुनर्वसनासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न …