पनवेल ः रामप्रहर वृत्त
सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेल संस्थेच्या वतीने मोफत वाचनालयाचा उद्घाटन सोहळा संघाच्या कार्यालयात संपन्न झाला. संघाचे माजी अध्यक्ष बळीराम उर्फ भाऊ परब यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी विद्यमान अध्यक्ष केशव राणे, सहसचिव दीपक तावडे, सहखजिनदार बाबाजी नेरुरकर, संपर्कप्रमुख गुरुदास वाघाटे, सुरेंद्र नेमळेकर, वासुदेव सावंत आदी उपस्थित होते.
संघाचे संस्थापक सदस्य व माजी खजिनदार स्व. सूर्यकांत मिराशी यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संघाच्या वतीने हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या वाचनालयात अध्यात्मिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, संगीत, ज्ञान, पाककला आणि मनोरंजन अशा विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. उद्घाटक भाऊ परब यांनी संघाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले की, हे वाचनालय म्हणजे स्व. मिराशी यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशे असे स्मारक आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि ज्ञानवृद्धी करावी, असे आवाहन भाऊ परब यांनी केले.
संघाच्या वतीने विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. संगीताचे वर्ग आणि वाचनालय सुरू केले. लॉकडाऊन संपल्यानंतर विवाह मंडळ सुरू करण्यात येणार आहे.
-केशव राणे, अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेल