ग्रामस्थांंमध्ये घबराट
उरण : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील दिघाटी आणि जवळच असलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर येथील जंगलात बिबट्या फिरत आहे. या भागात बिबट्याच्या पायाचे ठसेही आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ धास्तावले आहेत. वन विभागाच्या अधिकार्यांनी याची पडताळणी करून बिबट्याचा शोध घ्यावा, अशी मागणी भयभीत लोक करीत आहेत.
पनवेल आणि उरण तालुक्यांच्या ग्रामीण भागात आजही डोंगर, जंगल भाग अस्तित्वात आहे. पनवेलमधील कर्नाळा किल्ल्ला व अभयारण्य परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असतो. तेथूनच बिबट्या दिघाटी, चिरनेर परिसरात आल्याची चर्चा आहे. 23 व 24 सप्टेंबर रोजी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ जंगल परिसरात गेले असता त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे निदर्शनास आले.
सध्या गणेशोत्सव सुरू आहे. सर्व लोक बाप्पाच्या सेवेत मग्न असताना दिघाटी, चिरनेर परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या पाऊलखुणा दिसून आल्या आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाच्या अधिकारीवर्गाने येथे येऊन पाहणी करून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी दिघाटी ग्रामपंचायतीच्या सरपंच रजनी ठाकूर, सदस्य अमित पाटील व अन्य सदस्य तसेच ग्रामस्थांनी केली आहे.
दिघाटी व चिरनेर परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात इतर वन प्राण्यांप्रमाणे बिबट्याचाही वावर असू शकतो. त्याची पाहणी करण्यात येत आहे. शेतकरी, ग्रामस्थांनी घाबरून न जाता वन विभागाच्या अधिकार्यांना सहकार्य करावे. त्याचप्रमाणे सतर्कता बाळगावी, असे आवाहन कर्नाळा पक्षी अभयारण्याचे वन अधिकारी हेमंत करादे यांनी केले आहे.