नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर याचे गुरुवारी (दि. 26) पहाटे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरूळ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सातारच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात 5 फेब्रुवारी 1936 रोजी बाबा महाराज सातारकर यांचा जन्म झाला होता. निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचे मूळ नाव होते, पण पुढे त्यांच्या कीर्तनाला मिळालेल्या व्यापक स्वीकृतीतून त्यांना ‘बाबा महाराज सातारकर’ हे नाव मिळाले, ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिले. त्यांनी आपले आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केले. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचे प्रबोधन केले.
बाबा महाराज सातारकर नेरूळच्या आगरी कोळी भवनासमोरच्या एका वसाहतीत ते वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह.भ.प. भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. 27) सायंकाळी 5 वाजता नेरूळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्राला प्रदीर्घ अशी कीर्तनाची व ख्यातनाम कीर्तनकारांची परंपरा राहिली आहे. वारकरी सांप्रदायातील प्रमुख कीर्तनकार फड म्हणून सातारकर घराण्याच्या फडाचे नाव मानाने घेतले जात असे. गेल्या चार पिढ्यांपासून सातारकरांच्या घरात प्रवचन आणि कीर्तनाची परंपरा होती. स्वत: बाबा महाराज सातारकरांनीही ही परंपरा मोठ्या अभिमानाने जपली. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे.
Check Also
उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन
परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …