Breaking News

खुद्दार विरुद्ध गद्दार

निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, परंतु रणांगणाचे वेध मात्र लागले आहेत अशा अवस्थेत ठाकरे गटाची चांगलीच कुचंबणा झालेली दिसते. तारखा जाहीर न झाल्यामुळे निवडणुकीचा अजेंडा ठरवणे अनेक राजकीय पक्षांना जड जाते आहे. नेमके कुठल्या दिशेने प्रचाराचे गाडे पुढे रेटायचे याचा अंदाज अद्याप त्यांना आलेला दिसत नाही.

दसर्‍याचा दिवस हा राजकारणासाठी जणु पर्वणीचा दिवस झाला आहे. विजयादशमीचा मुहुर्त साधून अनेक राजकीय पक्ष आपापले मेळावे आयोजित करत असतात. महाराष्ट्रात मंगळवारच्या दिवशी असे चार मोठे मेळावे पार पडले. नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून विख्यात संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांनी विशेष उपस्थिती दाखवली. रा. स्व. संघाच्या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध संचलन आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रबोधनपर व्याख्यान. भागवत यांनी आपल्या व्याख्यानामध्ये देशाच्या प्रगतीचा आलेख अचूकपणे मांडला. द्वेषभावना नष्ट करायला हवी तसेच श्रीराममंदिराची उभारणी अयोध्येत पूर्णत्वास जात असताना एकसंघ लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्याकडे आपले विशेष लक्ष असायला हवे असे मनोगत त्यांनी मांडले. संघाचा मेळावा वगळता आणखी चार मेळावे महाराष्ट्रभर पार पडले, ते सर्वच्या सर्व तद्दन राजकीय स्वरुपाचे होते. यंदा पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील विचारांचे सोने वाटले! भगवान गडावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी चढा सूर लावला. उरलेले दोन मेळावे शिवसेनेचे होते. दक्षिण मुंबईतील आझाद मैदान येथे भरलेल्या महाप्रचंड मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा अस्सल विचार परखडपणाने मांडला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीमागे बव्हंशी शिवसैनिक उभे आहेत. त्यांना दिवसेंदिवस मिळणारे पाठबळ किती वाढत चालले आहे याचे प्रत्यंतर आझाद मैदानात जमलेल्या गर्दीवरून आले. तब्बल दोन लाख शिवसैनिक महाराष्ट्रभरातून आझाद मैदानाकडे लोटले होते. त्यांच्यासाठी खाण्यापिण्याचीदेखील चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीच्या पाठीत खंजीर खुपसणारे खरे महागद्दार आहेत, अशी गर्जना मुख्यमंत्री शिंदे यांनी करताच उपस्थित लाखो शिवसैनिकांनी जयजयकारानिशी त्यांना प्रतिसाद दिला. मराठा आरक्षणासाठी शरीरातील रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढेन अशी प्रतिज्ञा करताना मुख्यमंत्री शिंदे भावनिक झाले आणि लाखो शिवसैनिकांच्या साक्षीने त्यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर मस्तक टेकविले त्याक्षणी सारे मैदान थरारून गेले होते. याच्या अगदी उलट चित्र शिवाजी पार्क येथील मेळाव्यात बघावयास मिळाले. उरल्यासुरल्या शिवसेनेचे मोजके नेते जमेल तशी निंदानालस्ती करण्याची हौस भागवून घेत होते. खुद्द ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातही नेहमीचा जोम दिसला नाही. तेच ते शब्द, त्याच त्या लाखोल्या आणि तेच ते आरोप! खंजीर, गद्दार, खोकेबहाद्दर असल्या शब्दांच्या पखरणीपलिकडे त्यांच्या भाषणात काहीच नवे नव्हते. हिंमत असेल तर एकत्र निवडणुका घ्या आणि आमच्याशी टक्कर घ्या असे आव्हान ठाकरे यांनी दिले खरे, परंतु त्याच्यात काहीच दम नव्हता. त्यांच्या गद्दार, खोकेबहाद्दर या सततच्या लाखोल्यांचा आता मतदारांनाच कंटाळा येऊ लागला आहे हे खरे. निवडणुका पार पडेपर्यंत हे आरोप-प्रत्यारोप सत्र चालूच राहणार यात शंका नाही.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply