पंढरपूर : प्रतिनिधी
आजवर महाराष्ट्रात अनेकवेळा बेकायदा उद्घाटने झाली पण कोणावर गुन्हा दाखल झाले नाही, मग जेजुरीत अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे उद्घाटन करणार्या गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा का नोंद केला, असा सवाल शुक्रवारी (दि. 12) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा वाढदिवस असल्याने ते विठ्ठल दर्शनासाठी सोमय्या यांच्यासोबत पंढरपूरला आले होते. या वेळी दरेकर बोलत होते. गल्लीत लहान मुले भांडतात तशा पद्धतीने सरकारने राज्यपालांना विमान नाकारले असे सांगताना तीनवेळा फाईल जाऊनही मुख्यमंत्र्यांनी बाजूला का ठेवली, असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांबाबत पंढरपुरात शिरीष कटेकर यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे असले तरी त्यांना काळे फासणे, मारहाण करणे कितपत योग्य असा सवाल करीत ही सत्ताधार्यांची गुंडगिरी आहे, असे दरेकर यांनी सांगितले. आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीबाबत अत्यंत खालच्या पद्धतीने टीका झाली पण आम्ही कोणालाही काळे फसले नाही अथवा मारहाणही केली नाही. यावर पोलिसांची कारवाई संशयास्पद असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दरेकर यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घाणेरड राजकारण सुरू असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 13 बंगले व इतर बाबी आम्ही समोर आणल्या असून अन्वय नाईक यांची साडेबारा कोटीची जमीन सव्वा दोन कोटीत घेतली आहे, याची तक्रार आयकर विभाग व निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उजवे हात संजय राऊत, आनंद अडसूळ आणि प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई होऊन प्रताप सरनाईक जेलमध्ये जाणार असे सोमय्या यांनी सांगितले. ज्यांनी ज्यांनी बँका बुडवल्या मनी लॉन्डरिंग केले, पैसे ढापले त्या सगळ्यांना चौकशीला सामोरे जावे लागेल असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिली. दरम्यान, जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी पहाटे भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह केले. यावरून पडळकर यांच्यावर झालेल्या कारवाईवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सवाल केला आहे.