केरळमध्ये स्फोट झाल्याची बातमी रविवारी सकाळी अकस्मात येताच दक्षिणेत हिंसक कारवायांनी डोके वर काढल्याबद्दलची चिंता स्वाभाविकपणे सुजाण नागरिकांच्या मनात निर्माण झाली असावी. प्रत्यक्षात मात्र या स्फोट प्रकरणातील तपशील काहिसे निराळेच निघाले. अर्थात तरीही चिंता वाटण्यासारख्या काही बाबी आहेतच.
केरळमधील कोचिनजीकच्या कलमस्सेरी येथे रविवारी सकाळी ख्रिस्ती समाजातील एका पंथाच्या धार्मिक परिषदस्थळी दोन-तीन बॉम्बस्फोट झाले. ‘जेहोव्हाज विटनेसेस’ या ख्रिस्ती अल्पसंख्याक गटाच्या परिषदेच्या ठिकाणी हे स्फोट झाले. यात दोन महिलांचा मृत्यू झाला तर 51 जण जखमी झाले. यातील सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ल्यानंतर काही तासांतच एक जण हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून पोलिसांना शरण आला. या इसमानेही आपण ‘जेहोव्हाज विटनेसेस’ याच ख्रिस्ती गटाचे सदस्य असल्याचा दावा केला, परंतु गटातील अन्य कुणीतरी त्याचा हा दावा फेटाळला आहे. अधिकृतरित्या या गटाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. ख्रिश्चन धर्मातील ‘जेहोव्हाज विटनेसेस’ या अल्पसंख्याक गटाची तीन दिवसांची परिषद कलमस्सेरीतील एका सभागृहात सुरू होती. कार्यक्रमाचा समारोप सुरू असताना हे स्फोट झाले. स्फोट घडवण्यासाठी ‘आयईडी’चा वापर झाल्याचे पोलिसांकडून प्राथमिक तपासानंतर सांगण्यात आले. ‘जेहोव्हाज विटनेसेस’मध्ये काही गैरप्रकार चालत असल्यामुळे आपण हे कृत्य केल्याचा दावा बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेणार्या डॉमिनिक मार्टिन या व्यक्तीने केला आहे. जेहोवाज विटनेसेस या ख्रिस्ती धर्मातीलच एक पंथ असलेल्या गटाची पार्श्वभूमी जाणून घ्यायची झाल्यास, 19व्या शतकात अमेरिकेतील काही ख्रिस्ती लोकांनी बायबलचा वेगळा अर्थ लावणे सुरू करत आपला वेगळा पंथ स्थापन केला. ठळक मतभिन्नता पाहायची झाल्यास, हा पंथ ख्रिस्ती धर्मातील ‘होली ट्रिनिटी’ म्हणजे पवित्र त्रिमूर्तीची संकल्पना मानत नाही. ख्रिस्ती धर्माशी तुलना करता हा पंथ फारच अलीकडच्या काळात स्थापन झालेला आहे. आजमितीस जेहोव्हाज विटनेसेसचे जगभरात अवघे 85 लाख अनुयायी आहेत. ही संख्या लक्षात घेता ख्रिस्ती धर्मियांमध्ये या पंथाच्या लोकांची संख्या तुलनेने किती अल्प आहे हे लक्षात येते. बायबलचा अर्थ लावण्यावरून आणि सदस्यांना मिळालेल्या वागणुकीवरून या पंथावर यापूर्वीही टीका झालेली आहे. यापूर्वी जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरात याच पंथाच्या परिषदेमध्ये असाच हल्ला झाला होता आणि संबंधित हल्लेखोर हाही पंथाचा माजी सदस्य होता. त्याने बेछूट गोळीबार करून सहा जणांचे बळी घेतले होते. अखेरीस हातातील पिस्तुलाने त्याने स्वत:चाही अंत करून घेतला. या पंथाच्या अनुयायांना इतके टोकाचे हिंसक पाऊल का उचलावेसे वाटले यावर आता विचार होण्याची गरज आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे एका सर्वसामान्य व्यक्तीला स्फोट घडविण्याकरिता आयइडीसारखे स्फोटक उपलब्ध कसे झाले याची चौकशी होण्याची गरज आहे. केरळ हे राज्य निसर्गरम्यतेसाठी व साक्षरतेसाठी देशभरात प्रसिद्ध असले तरी तेथील राजकारणाला नेहमीच हिंसक वळण लागत आले आहे. केरळची जवळपास निम्मी लोकसंख्या ही मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय आहे. रविवारी स्फोट घडताच समाजमाध्यमांवर त्याचा संबंध इस्रायल-हमास संघर्षाशी जोडला गेलेला मोठ्या प्रमाणात आढळून आला. अखेरीस तेथील राज्य सरकारला अफवा न पसरवण्याचे आवाहन करावे लागले. आगामी काळ हा निवडणुकांचा असल्याने केरळमधीलच नव्हे तर सर्वच राज्यांतील सरकारांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या बाबतीत अधिक दक्ष असायला हवे आहे.