चित्रपट महोत्सव म्हणजे एक प्रकारची जत्राच. मराठी व हिंदीसह अनेक प्रादेशिक भाषेतील तसेच देशविदेशातील जुने नवे चित्रपट पाहण्याची संधी, जुने चित्रपट म्हणजे आठवणींना उजाळा, ’फ्लॅशबॅक’मध्ये डोक्यावण्याची संधी, एक ’उत्सवी माहौल’. अनेक गोष्टींचे निरीक्षण, लहान मोठ्या भेटीगाठी, जुनी दुर्मीळ पोस्टर्स पाहण्याचा योग, या निमित्तानाची पुस्तिका, त्यांचे वाचन आणि लहान मोठ्या अनेक गोष्टी…आणि चित्रपट महोत्सवांसाठी आता अनेक प्रकारचे निमित्त. देव आनंदच्या 26 सप्टेंबर 2023 या जन्मशताब्दीपूर्ती निमित्ताने देशभरातील पीव्हीआर आयनॉक्स मल्टिप्लेक्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देव आनंदची भूमिका असलेल्या चार चित्रपटांच्या दोन दिवसांच्या चित्रपट महोत्सवाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने माझ्यासारखे देव आनंदचे निस्सीम भक्त विलक्षण सुखावले. विजय आनंद दिग्दर्शित ’गाईड’, ’जॉनी मेरा नाम’ (1970), ’ज्वेल थीफ’ आणि राज खोसला दिग्दर्शित ’सी.आय.डी’ या चारही चित्रपटांना या महोत्सवात मिळालेल्या हाऊसफुल्ल रिस्पॉन्सने ’जुने चित्रपट पुन्हा पुन्हा प्रदर्शित करा, ’गल्ला पेटी’वर त्याला तुडुंब गर्दी नक्कीच आहे’ हेच अधोरेखित केले. महोत्सव हेदेखील देत असते. जुहूच्या पीव्हीआर मल्टिप्लेक्सच्या ’गाईड’च्या खेळास खुद्द वहिदा रेहमान यांनाही ’कधी बरे स्क्रीनिंग सुरू होतेय’ याची विलक्षण उत्सुकता असल्याचे त्यांच्या औपचारिक भाषणातील संवाद आणि देहबोलीतून जाणवले. त्यांनी अगदी शेवटपर्यंत ’गाईड’चा आस्वाद घेतला. त्यांनी आतापर्यंत ’गाईड’ अनुभवला असेलच आणि तरीही पुन्हा आपलाच काळाच्या खूपच पुढे असलेला हा चित्रपट आणि आणि त्यातील आपली रोझी ही व्यक्तीरेखा रूपेरी पडद्यावर पाहिलीय. या वेळी आपला नायक देव आनंदच्या विशेष वाढदिवसानिमित्त पुन्हा ’गाईड’ पाहताना त्या अधिकच भावूक झाल्या असतील तर त्यात आश्चर्य नाही. चित्रपटाच्या मध्यंतरात आम्ही अनेक चित्रपट रसिक आवर्जून वहिदाजींना भेटलो. त्यांची मी स्वाक्षरीही घेतली (तेही सेल्फीच्या युगात).
प्रत्येक चित्रपट महोत्सवाचे आपलं एक वैशिष्ट्य आणि व्यक्तिमत्त्व. दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा याच्या कारकिर्दीला पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट महोत्सवालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याने दिग्दर्शित केलेल्या ’सजा ए मौत’, ‘खामोश’, ‘परिंदा’, ‘1942 अ लव्ह स्टोरी’, ‘मिशन कश्मीर’, ‘करीब’ अशा चित्रपटांची यानिमित्त चित्रपट रसिकांत चर्चा रंगली. (चित्रपट महोत्सवाचा हा एक महत्त्वाचा हेतू. एकमेकांत संवाद व्हायला हवा.) काही चित्रपटांचे शोज झाले. यानिमित्त नव्वदच्या दशकातील या चित्रपटांवर ’फोकस’ पडला. जुने चित्रपट म्हणजे आता त्याची मर्यादा नव्वदच्या दशकापर्यंत हवी. ब्लॅक अॅण्ड व्हाईट अर्थात कृष्ण धवल चित्रपट म्हणजेच जुने चित्रपट या मानसिकता आणि दृष्टिकोन यातून ‘अधूनमधून’ निश्चितच बाहेर पडण्याची संधी मिळणे हे अशा चित्रपट महोत्सवांचे जणू एक देणेच आहे. वहिदा रेहमान यांना आपल्या देशातील चित्रपटसृष्टीसाठीचा असलेला सर्वोत्कृष्ट अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्तानेही वहिदा रेहमान यांची भूमिका असलेल्या पाच चित्रपटांचा महोत्सव दूरदर्शनने आयोजित केला. त्यामुळे ते चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचले. ते चित्रपट होते ‘सी.आय.डी.’, ‘साहिब, बिवी और गुलाम’, ‘कागज के फूल’ आणि ‘चौदहवी का चांद’. ही प्रत्येक कलाकृती क्लासिक आहे. अंतर्मुख करते. या पुरस्काराच्या निमित्ताने सर्वच माध्यमातून वहिदा रेहमान यांच्या कार्यकर्तृत्वाचा चहुबाजूंनी वेध घेतला गेल्याने नवीन पिढीसमोर बरीच ’लाईव्ह’ माहिती पोहचली.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या जागरण चित्रपट महोत्सवात अनेक भाषांतील चित्रपटांचा समावेश होता. महोत्सवानिमित्त प्रकाशित होत असलेल्या माहिती पुस्तिकांमुळे आपण कोणत्या चित्रपटांना प्राधान्य द्यायचे याचा निर्णय घेणे सोपे जाते आणि आपण अशा महोत्सवानिमित्त अधिकाधिक चित्रपट पहावेत याची भूक वाढत जाते. या महोत्सवात ग्लॅमरलाही स्कोप मिळतोय. रेड कार्पेटही त्यासाठी सही जगह आहे. चित्रपट पाहण्यापेक्षा अशा रेड कार्पेटवर नवीन फॅशनच्या ड्रेसमध्ये छान वावरून/मुरडून ’धडाधड फ्लॅशमध्ये ढीगभर कव्हरेज’ अशीही मानसिकता असलेले सेलिब्रिटीज हा अशा चित्रपट महोत्सवातील वेगळा कलर आहे. तीदेखील एक रियॅलिटी आहे. जागरण चित्रपट महोत्सवात अनेक विषयांवर मुलाखती व चर्चासत्र रंगली. विशेष उल्लेखनीय गोष्ट, कास्टिंग डायरेक्टर अनमोल अहुजा याने वेगळा फोकस टाकला. चित्रपट माध्यम व व्यवसायातील अनेक विषयांवरील फोकस ही अशा चित्रपट महोत्सवाचे एक विशेष देणे आहे आणि या सगळ्यावरची सोशल मीडियात उपलब्ध होत जाणारी माहिती आणखी काही महिने तरी बुद्धीला खुराक असतो. महोत्सव संपला म्हणून त्याच्या गोष्टी संपत नाहीत, विविध माध्यमातून त्याचा मागोवा घेता येतो.
जियो मामी मुंबई चित्रपट महोत्सव अतिशय बहुरंगी. महोत्सवाचे मुख्य केंद्र अंबानी सांस्कृतिक केंद्र (बीकेसी) यासह मुंबईतील अनेक मल्टीप्लेक्समध्ये त्याचे आयोजन करण्यात आल्याने अधिकाधिक चित्रपट प्रेमी, अभ्यासक, विश्लेषक, संग्राहक आणि खुद्द चित्रपटसृष्टी यांना चित्रपट निवडीला वाव मिळाला. फार पूर्वी मुंबईत आयोजित करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफी (याची मुंबईला संधी आठ दहा वर्षांत एकदाच मिळे. 1984 नंतर 1994 साली मुंबईत इफीच्या केलेल्या आयोजनात चित्रपट महोत्सव संस्कृतीचा लाईव्ह अनुभव घेता आला), मामी, थर्ड आय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, लघुपट व माहितीपट महोत्सव, राज्य चित्रपट महोत्सवातील अंतिम दहा चित्रपटांचा महोत्सव (अनेक वर्ष तो धोबीतलाव येथील रंगभवन येथे आयोजित केला जाई..तो कालांतराने प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित केला जाऊ लागला) याचे आयोजन दक्षिण आणि मध्य मुंबईतील चित्रपटगृहात होण्याच्या परंपरेत आता बदल अपेक्षित आहे. पूर्व व पश्चिम उपनगरातील मल्टिप्लेक्सपमध्ये अधिकाधिक प्रमाणात या महोत्सवांचे आयोजन केल्याने त्याला रसिक व अभ्यासकांचा प्रतिसाद वाढेल. इतक्या लांब दूरवर मेट्रो अथवा न्यू एक्सलसियर चित्रपटगृहात कोण जाईल अशी तक्रारही करता येणार नाही. अनेक वर्षांपासूनचे हे दुखणे/खुपणे आहे. खरंतर चित्रपट माध्यम व व्यवसायात नवीनच असलेल्या अथवा येऊ इच्छिणार्यांना असे चित्रपट महोत्सव म्हणजे अतिशय उत्तम प्रशिक्षण शिबिर असते. महोत्सवातील वातावरण फिल केले (अनुभवले अशा अर्थाने) आणि शक्य तितके चित्रपट पाहिले तरी ते पत्थावर पडणारे.
मामी मुंबई चित्रपट महोत्सवात देश-विदेशातील अनेक चित्रपटांचा समावेश असल्याने अनेकजण सुखावले. या महोत्सवात मराठी चित्रपट कोणते होते असे काही मराठी चित्रपटप्रेमींनी अतिशय आस्थेने विचारले. ते होते, वरुण नार्वेकर दिग्दर्शित ’एक दोन तीन चार’, आशीष बेन्डे दिग्दर्शित ’आत्मप्लॅमप्लेट’, केदार शिंदे दिग्दर्शित ’बाईपण भारी देवा’, सुजय डहाके दिग्दर्शित ’श्यामची आई’, परेश मोकाशी दिग्दर्शित ’वाळवी’, रितेश देशमुख दिग्दर्शित ’वेड’. याशिवाय ‘भंडारा’, ‘भट्टी’, ‘विंचू’, ‘प्राणप्रतिष्ठा’ असे अनेक लघुपट होते. नवीन पिढीतील दिग्दर्शकांचा नवीन दृष्टिकोन यातून दिसून येतो. मराठी चित्रपटसृष्टीतील भविष्यातील दिग्दर्शक यातूनच घडत असतात आणि त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. महोत्सवाच्या निमित्ताने अन्य भाषांतील चित्रपट पाहणे होत असतेच. ‘मामी’मधील मार्केट विभागात फेरफटका मारताना ’तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकलेला चित्रपट कोणता?’ असा एक विभाग दिसला. मी क्षणाचाही विलंब न करता हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ’आनंद’ लिहीलेही आणि मग आजूबाजूच्या नोंदींवर नजर टाकताना ’थ्री इडियट्स’ वगैरे अलिकडचे चित्रपट दिसले. ती आजच्या ग्लोबल युगातील युथची निवड असावी. महोत्सवातील अशा अनेक गोष्टीतून चित्रपट संस्कृतीच्या विविध गोष्टीत डोकावता येते. याच मार्केटमध्ये चित्रपट माध्यमातील नवीन टेक्नॉलॉजीची थोडी ओळख झाली. चित्रपट हा बहुस्तरीय सखोल विषय आहे याची थोडीशी ओळख अशा महोत्सवातून होते. ‘मामी’मध्ये ’मराठी चित्रपट निर्मिती प्रक्रिया व अनुभव’ यावरील परिसंवादात रितेश देशमुख, वरुण नार्वेकर, आशिष बेन्डे, केदार शिंदे आणि सुजय डहाके यांनी सहभाग घेतला. एका मोठ्याच व्यासपीठावर मराठी चित्रपटावर चर्चा रंगली हे विशेष. याची आवश्यकता असतेच. आता पणजी (गोवा) येथील भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफीचा सोहळा आहे. 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत जगभरातील अनेक भाषांतील जुने (सिंहावलोकन विभागात) आणि नवीन चित्रपट (इंडियन पॅनोरमा, व्यावसायिक यशस्वी चित्रपट) असा बहुरंगी उत्सव आणि उत्साह. देशातील विविध भागांसह विविध देशांतील चित्रपट अभ्यासक, विश्लेषक या महोत्सवासाठी येतात. ते म्हणजे ’चित्रपट वारकरी’च. चित्रपटविषयक अनेक गोष्टींवर चर्चासत्र, पत्रकार परिषदा, फिल्म मार्केट, पुस्तक प्रकाशने, नवीन तांत्रिक प्रगतीची ओळख असे बरेच काही म्हणजे हा आपला इफ्फी. प्रत्येक चित्रपट महोत्सवाचे स्वरूप वेगळे. एकाच भाषेतील चित्रपट असतील अथवा अनेक भाषांतील चित्रपट असतील असा फंडा. या वर्षी ’इफ्फी’त भारतीय पॅनोरमात एकाही मराठी चित्रपटाची निवड न झाल्याबद्दल चित्रपटसृष्टी व मिडियातून (काही मोजकेच अपवाद) अजिबात प्रतिक्रिया उमटलीच नाही. उपग्रह वृत्त वाहिन्यांवरही यावर चर्चा नाही याचं सखेद आश्चर्य वाटले. याचाच अर्थ ‘इफ्फी’त अनेक भाषांतील चित्रपटांच्या वाटचालीचा प्रत्यय येत असतानाच त्यात मराठी चित्रपट नसणार. मराठी चित्रपट फक्त आणि फक्त निर्मितीची वाढती संख्या, धमाकेदार ग्लॅमरस इव्हेन्टस, पुरस्कार सोहळे, सेलिब्रिटीजच्या महागड्या गाड्या आणि चकाचक घरे व प्रमोशनचे सातत्य यातच राहिलाय काय असं कोणी कदाचित म्हणेलही.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पीफची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि लोकप्रियता विशेष उल्लेखनीय आहे. ‘पीफ’साठीही राज्यातील अनेक भागांतून चित्रपट रसिक व अभ्यासक पुणे शहरात येतात. याच महोत्सवात काही मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. चित्रपट महोत्सवातील ही आणखीन एक विशेष उल्लेखनीय गोष्ट.
आता मुंबई तर झालेच तसेच पुणे आणि देशातील अनेक शहरांतील चित्रपट महोत्सवांचे प्रमाण, उपस्थिती व त्यातील उत्साह वाढलाय. महोत्सवाबाबतची जागरूकता आणि ओढ वाढली आहे. पूर्वी चित्रपट महोत्सव म्हटलं की ती बुद्धीजीवी वर्गाची मक्तेदारी अशी प्रतिमा होती. एक प्रकारचे गंभीर वातावरण असे आणि त्याची माध्यमातून फारशी दखल घेतली जात नसे. सोशल मीडियाच्या युगात मात्र या मीडियात मोठ्या प्रमाणावर महोत्सवावर भाष्य केले जात असल्याचे दिसते. चित्रपट महोत्सवाचे रंगढंग या माध्यम व व्यवसायाबद्दल अधिकाधिक गोष्टींवर ’फोकस’ टाकण्यास उपयुक्त ठरताहेत. त्यात आतापर्यंतचा चित्रपटांचा प्रवास आणि भविष्यातील वाटचाल यांचा समतोल दिसतोय. तेच महत्त्वाचे आहे.
– दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)