खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
विद्यार्थिनीस व्हॉट्सअॅपवरून अश्लील मेसेस पाठविल्यामुळे संतापलेल्या पालक, महिला व तरुणांनी गुरुवारी (दि. 21) खोपोलीतील जनता विद्यालयातील शिक्षकास बेदम चोप दिला.
जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शारीरिक प्रशिक्षण देणारा शिक्षक सुरेश देवमुंडे याने याच शाळेतील बारावीच्या वर्गातील विद्यार्थिनीस व्हॉट्सअॅपवरून अश्लील मेसेज पाठविला. ही बाब विद्यार्थिनीने पालकांना सांगितली. पालकांनी हा प्रकार जवळील नातेवाइकांच्या कानावर घातला. याबाबत विचारणा करण्यासाठी विद्यार्थिनीसोबत तिचे पालक व मनसेचे पदाधिकारी गुरुवारी जनता विद्यालयात धडकले. त्या वेळी संतप्त जमावाने सदर शिक्षकास अर्धनग्न करून चोप देत खालापूर पोलीस स्टेशनमध्ये आणले. पोलिसांनी शिक्षकास ताब्यात घेतले, मात्र नातेवाईक व संतप्त जमावाने या शिक्षकाविरोधात बाललैंगिक संरक्षण कायदा 2012 (पोस्को)अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. तेव्हा पोलिसांनी आलेले मेसेज बघून व त्याची चौकशी व पळताळणी करून योग्य कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, उशिरा मिळालेल्या माहितीनुसार सदर शिक्षकाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी संतप्त जमाव केटीएसपी शिक्षण मंडळ कार्यालयातही धडकला. त्यांनी सदर शिक्षकास तातडीने सेवेतून निलंबित करण्याची मागणी केली. त्यावर पदाधिकार्यांनी योग्य ती कडक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही दिल्यानंतर जमाव शांत झाला.