Breaking News

आर्थिक फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या शेकापच्या पुरुषोत्तम भोईरवर गुन्हा दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त
विचुंबे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील सरपंचपदाचा उमेदवार असलेल्या पुरुषोत्तम भोईर याने जमिनीच्या व्यवहारांमध्ये आर्थिक फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे त्याच्यावर शुक्रवारी रात्री खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणूकप्रकरणी कलम 420 आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही पुरुषोत्तम भोईरवर जमिनीच्या व्यवहारातून गुन्हे दाखल असून लोकांची फसवणूक करण्याचा नित्यपाठ असलेल्या या महाभागाने आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
सुदाम इंगळे यांनी दिनेश शंभुराम उर्फ शंभुलाल मांगे यांच्याकडून पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द येथील बिनशेती जमीन खरेदी केली होती. त्यानुसार झालेल्या व्यवहाराप्रमाणे 71 लाख रुपयांपैकी 25 लाख रुपये रोख व बँक ट्रान्सफरद्वारे अदा करण्यात आली, तर उर्वरित रक्कम भूखंडाची सरकारी मोजणी केल्यानंतर व हद्दी निश्चित झाल्यानंतर नोंदणीकृत खरेदीकृत खरेदीखताचा दस्त करताना देण्याचे उभयपक्षीयांत ठरले होते, पण या क्षेत्रफळाचा वाद प्रलंबित असताना दिनेश मांगे यांनी वकिलामार्फत करार रद्द करण्याचा, तर सुदाम इंगळे यांनी कराराची विशेष पूर्तता करून मिळण्यासाठी व निरंतर ताकीद हुकूम मिळण्याकरिता पनवेल येथील दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर न्यायालयात दावा दाखल केला होता.
दरम्यान, न्यायालयात दावा प्रलंबित असतानाही पुरुषोत्तम भोईर याने हा भूखंड सेल डिडद्वारे विक्री केला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कळताच सुदाम इंगळे यांनी दिनेश मांगे व पुरुषोत्तम भोईर याच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पुरुषोत्तम भोईर याने या भूखंडाचा वाद मिटवण्यासाठी वकिलामार्फत विचारणा केली असता सुदाम इंगळे हे कराराची उर्वरित रक्कम आणि दिनेश मांगे यांनी सुदाम इंगळे यांच्याकडून स्वीकारलेली रक्कमही पुरुषोत्तम भोईर याला देतील व त्यानुसार पुरुषोत्तम भोईर हा भूखंड सुदाम इंगळे व सुनील सुदाम इंगळे यांच्या लाभात करून देतील व त्यास दिनेश मांगे संमती देतील अशा स्वरूपाची लेखी तडजोड न्यायालय समक्ष झाली व त्याप्रमाणे हा दावा निकाली काढण्यात आला. त्यानुसार मांगे व इंगळे यांच्याकडून पुरुषोत्तम भोईर यास 71 लाख रुपये अदा करण्यात आले. अधिकची रक्कम मिळाली असतानाही बेकायदेशीरपणे पुरुषोत्तम भोईर या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. न्यायालयासमक्ष दावा संपुष्टात आल्यानंतरही पुरुषोत्तम भोईरची नियत फिरली.
खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करीत असल्याने इंगळे यांनी या भूखंडासंदर्भात माहिती घेतली असता पुरुषोत्तम भोईर याने हा भूखंड जनार्दन पाटील यांना परस्पर साठेखतान्वये विक्री केल्याचे उघड झाले. त्यामुळे 1 नोव्हेंबर 2023 रोजी या संदर्भात विचारणा करण्यासाठी सुनील इंगळे हे विचुंबे येथे आले असता पुरुषोत्तम भोईर हा श्री. ज्ञानेश्वर माऊली सहकारी सोसायटी या ठिकाणी निवडणुकीचा प्रचार करीत होता. त्या वेळी माझा भूखंड खरेदीखत करून देण्याबाबत आपण कोर्टात तडजोड केली असताना हा भूखंड परस्पर विक्री का केला अशी विचारणा सुनील इंगळे यांनी केली असता पुरुषोत्तम भोईर याने आता त्या भूखंडाची किंमत पाच कोटी रुपये झाली आहे, तरी हा भूखंड मी तुला मिळू देणारच नाही असे सांगून जातीवाचक शिवीगाळ करीत व जातीचा अपमान करून तेथून सुनील इंगळे यांना हाकलून दिले. त्यामुळे न्यायालयाची आणि आपली फसवणूक तसेच जातीचा अपमान झाल्यामुळे सुनील इंगळे यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात पुरुषोत्तम भोईर याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून त्यानुसार भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 420, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 नुसार कलम 3 (1)(आर), कलम 3 (1)(एस), कलम 3 (1)(यू), कलम 3 (2), कलम 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply