Breaking News

चौल भाटगल्लीत योग शिबिर

रेवदंडा : चौल भाटगल्ली येथील मोरया अ‍ॅकडमीने ठाणे येथील अंबिका योगाश्रमाच्या सहकार्याने मोफत योग शिबीर आयोजित केले आहे. 14 जुलैपर्यंत दर रविवारी घेण्यात येणार्‍या या शिबिरात अंबिका योगाश्रमाचे वसंत दिवेकर, वृंदा दिवेकर व दिलेश मोसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या शिबिरात व्याधीप्रमाणे वेगवेगळे गट करून प्रशिक्षणार्थीकडून योग करून घेतले जातात. रविवारी (दि. 26) सकाळी 7 ते 9 या वेळेत  विनायक देसाई हे प्रशिक्षक गायत्री, ओमकार, व योग यांची माहिती देणार आहेत. शिवाय व्याधी का होतात, व त्यापासून स्वतःला दुर कसे ठेवावे, आपला आहार काय असावा, दिनक्रमाचे नियोजन आदी विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या मोफत योग शिबीरात चौल व परिसरातील पुरूष, महिला व लहान मुलांचा सहभाग आहे.

उष्म्याचे प्रमाण पुन्हा वाढले

नागोठणे : गेल्या दोन दिवसांपासून उष्म्याचे प्रमाण वाढले असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आठवड्यापूर्वी कडक उन्हाळा अनुभवल्यानंतर पुन्हा एकदा सुसह्य वातावरण तयार होत होते. मात्र रविवार (दि. 19) पासून हवेतील उष्णतेचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भाच्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उन्हाच्या तीव्र झळा कोकण किनारपट्टीलाही बसू लागल्या आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवत आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कडकडीत ऊन पडलेले असते. परिणामी रस्तेही काही प्रमाणात निर्मनुष्य झालेले पाहावयास मिळत आहेत.

माणगावजवळ आढळली मृत महिला

माणगाव :  तालुक्यातील इंदापूर गावाच्या हद्दीत गोद नदीच्या पात्रात एका 40 वर्षीय अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदरील घटना सोमवारी (दि. 20) रात्री 8.30 वाजण्याच्या पुर्वी घडली आहे. या घटनेची माहिती अनंत गुणाजी नवगणे यांनी माणगांव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगांव उपजिल्हा रुग्णालयात आणला. या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड करीत आहेत.

रमजाननिमित्त गरजूंना जकात वाटप

पेण : रमजान निमित्त हजवानी फाउंडेशनचे चेअरमन बशीर हजवानी यांच्या वतीने गरिब गरजू जनतेला मंगळवारी (दि. 21) पेण येथे जकातीचे वाटप करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे सदस्य खलील खोत, महमद हजवानी, नौशाद अली, मुबारक राजबकर, उजेर खोत आदि उपस्थित होते. खेडचे नामांकित उद्योजक बशीर हजवानी हे गरिब जनतेला नेहमीच मदतीचा हात देत असतात. फक्त मुस्लिम नव्हे तर सर्व धर्मातील जनतेला ते मदत करीत असतात. रमजान निमित्त त्यांनी मंगळवारी पेण शहरातील खान मोहल्ला, खाटिक मोहल्ला तसेच अंतोरा, वडगाव, वडखळ, आपटा, बारापाडा गावातील गरीब-गरजूंना जकातीचे वाटप केले.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply