Breaking News

महाआघाडीच्या प्रयत्नांना सुरुंग

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत दाखवण्यात आले आहे. असे असले तरी विरोधकांनी मात्र निवडणूक निकालापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यानुसार तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू देशभरातील विरोधी पक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही अनेक नेत्यांशी संपर्क साधत आहेत, मात्र निकालापूर्वी सुरू असलेल्या महाआघाडीच्या मोर्चेबांधणीला सध्या तरी यश येत नसल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी मंगळवारी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्याशी चर्चेसाठी त्यांना फोन केला होता, मात्र रेड्डी यांनी पवारांचा फोन घेणे टाळल्याचे समजते. यावरून निकालापूर्वी मोर्चेबांधणीसाठी सध्यातरी महाआघाडीला यश येत नसल्याचे दिसून आले.

एक्झिट पोलनुसार लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशात शानदार कामगिरी करणारे जगनमोहन रेड्डी निकालापूर्वी कोणत्याही पक्षासोबत जाण्यास इच्छुक नाहीत. निकालानंतरच आपण चर्चा करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. गेल्या आठवड्यात चंद्राबाबू नायडू यांनी शरद पवारांची दोनदा भेट घेतली होती, मात्र नायडू व रेड्डी एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. त्यात रेड्डी व काँग्रेस यांच्यातही वितुष्ट आहे. त्यामुळेच रेड्डी यांनी पवारांचा फोन उचलला नसावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply