पिक्चरच्या जगात एकच नाणं चालतं पिक्चर हिट मंगता है यार. पिक्चर हिट झाला रे झाला की येथे रंग कधी बदलतो ते समजतच नाही.
’निमल’ने कोणी अफाट स्तुती, कोणी वारेमाप निंदा वा टीका असं चक्रीवादळ निर्माण करताच तृप्ती डिमरी स्टार झाली. तुम्ही हा पिक्चर एन्जॉय केला असेल असं गृहित धरूनच तिचा रोल, त्याचं फूटेज अशा गोष्टी पुन्हा सांगत नाही. पिक्चर हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असतानाच तृप्ती डिमरीचे सोशल मीडियातील फॉलोअर्सची संख्या सहा लाख सतरा हजारवरून झपकन दोन पॉईंट दोन मिलियनच्याही वर गेली. पिक्चरमधली तिची एन्ट्री, तिची व्यक्तिरेखा, त्या भूमिकेचे फूटेज, तिने रणबीर कपूरसोबत दिलेली बोल्ड दृश्य या सगळ्यातून तिचे फॉलोअर्स अतिशय वेगाने वाढले. ती आता स्टुडिओपासून पेज थ्री पार्टीपर्यंत आणि आपल्या घराबाहेर पडून एखाद्या फूड जॉईंटपर्यंत कुठेही गेली रे गेली पाप्पाराझी अर्थात सेलिब्रिटीजच्या मागावर असलेला मीडिया तिच्यावर खाड खाड फ्लॅश उडवतोय. तीदेखील छान थांबून, मस्त हसतं उजवीकडून डावीकडे पाहत हवे तेवढे आपले फोटो काढून देतेय. तिलाही हा अनुभव बराचसा नवाच. सनी देओल निर्मित व श्रेयस तळपदे दिग्दर्शित ’पोस्टर बॉईज’पासून (2017) या मनोरंजन क्षेत्रात आहे. या सहा वर्षांत तिने आणखी काही चित्रपटात भूमिका साकारलीय, पण खणखणीत यश ‘निमल’ने देताच संपूर्ण चित्रपटसृष्टी, मीडिया आणि फॅन्स/फॉलोअर्स यांची तिच्यावर नजर खिळली. ती चक्क ओळखीची वाटू लागली. काही फोटोग्राफर तिला गंमतीत ’दुसरी भाभी’ म्हणतात.
यशाची हीच तर ताकद असते. विजय आनंद दिग्दर्शित ’जॉनी मेरा नाम’(1970)च्या वेळेसही सेम स्टोरी. यात भरपूर कॅरॅक्टर्स, पण विजय आनंदची पटकथेवर भारी पकड. देव आनंद, हेमा मालिनी, प्राण, आय. एस. जोहर, प्रेमनाथ असे सगळेच छा गये आणि अशातच पद्मा खन्नाने पडदाभर साकारलेल्या हुस्न के लाखों रंग या गाण्याचे वादळ उठले. आजच्या ग्लोबल युगातील पिक्चर्समध्ये अनेकदा तरी अनेक अभिनेत्री मॉडर्न फॅशन म्हणून भारी शॉर्ट्समध्ये म्हणा अथवा बिकीनी म्हणा अतिशय सहज त्यात वावरतात. आपल्या आकर्षक शरीरसौंदर्याचे दर्शन घडवतात. त्यात काय विशेष? स्वीमिंग पूलावर बिकीनी अथवा बेदिंग सूटातच वावरणार हे त्यांचं म्हणणं अजिबात चूक नसते. पन्नास-बावन्न वर्षांपूर्वी बिकीनीत अभिनेत्री हा काहीसा सांस्कृतिक धक्काच. अशा वातावरणात चक्क स्री लालसेने वखवखलेल्या नजरेतील प्रेमनाथ (हादेखील अभिनयाची एक भाग) आणि त्याच्या बॉडीगार्डसनी पद्मा खन्नाच्या प्रियकराला (रंधवा) घट्ट पकडलाय आणि पद्मा खन्ना आपल्या अंगावरचे एकेक वस्त्र उतरवतेय. एकिकडे यावर मीडियातून भरपूर टीका, तर दुसरीकडे आंबटशौकीनांची दाद. त्या काळात हिट चित्रपट नि त्यातील हिट गाणे पाह्यचे तर प्रत्यक्षात थेटरात जायला हवे आणि त्यातूनच पिक्चर हाऊसफुल्ल. पद्मा खन्नाला त्यानंतर व्हॅम्पच्या भूमिकेत करियर करावे लागले. सुधेन्दु रॉय दिग्दर्शित ’सौदागर’(1973) भूमिका तुलनेत वेगळी. सजना है मुझे सजना के लिए या गाण्यात ग्रामीण युवतीच्या रूपात तिने छान रंग भरला. नूतन व अमिताभसोबत छान संधी मिळाली. तरी तिची ओळख, ’जॉनी मेरा नाम’मधील हुस्न के लाखों रंग या गाण्याची. पिक्चर हिट तो काफी कुछ होता है.
देव आनंदने आपल्या दिग्दर्शनातील ’हरे राम हरे कृष्ण’ (1972) आपल्या लहानपणी हरवलेल्या आणि मोठेपणी हिप्पी झालेल्या बहिणीच्या भूमिकेसाठी अगोदर जाहिदाला विचारले. आपण अमरजीत दिग्दर्शित ’गॅम्बलर’ (1970)मध्ये देव आनंदची नायिका साकारलीय. देव आनंद दिग्दर्शित व अभिनित ’प्रेम पुजारी’मध्ये सहनायिका साकारलीय. तेव्हा आता त्याच्या बहिणीची भूमिका नको असा विचार करत तिने ’हरे राम हरे कृष्ण’ नाकारला. देव आनंदने ओ.पी. रल्हन दिग्दर्शित ’हलचल’ (1970)मधून रूपेरी पदार्पण केलेल्या झीनत अमानला विचारले. तिचं पाश्चात्य रुपडं, मॉडर्न टीट्यूड ’हिप्पी गर्ल’ म्हणून एकदम ’सही’ ठरला आणि तिने ’दम मारो दम’चा ठसा आणि ठसका असा काही साकारला की उसकी तो करियर बन गयी. तिच्या अभिनयापेक्षा तिची मादकता आणि मोहकता तिचे क्रेडिट कार्ड ठरलं.
प्रत्येक भूमिकेवर त्या कलाकाराचे नाव लिहिलेले असते हा अलिखित नियम. त्यासाठी एक तर पिक्चर सुपरहिट हवे अथवा रोल पॉवरफुल्ल हवा. लक्षात राहणारा हवा.
’दास्तान’( 1972)च्या वेळेस थोडसं असंच घडलं. पिक्चर पडद्यावर आल्या आल्याच पब्लिकने नाकारले, पण बदफैली व्यक्तीरेखेतील बिंदूंचे भारी कौतुक झाले. शर्मिला टागोरचं दिलीपकुमारची नायिका बनण्याचं बर्याच दिवसांपासूनचे स्वप्न दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण केले. दिलीपकुमारची यात दुहेरी भूमिका. एकाची नायिका शर्मिला टागोर, तर दुसर्याची पत्नी बिंदू. ती आपल्या मित्रांबरोबर गुलछर्रे उडवतेय. त्याच्याशी जणू भारी एकनिष्ठ आहे. त्याच्यासोबत लाईफ एन्जॉय करतेय. बिंदूने अतिशय छद्मी हसत, विखारी नजर टाकत, नि लाडे लाडे बोलत अशी काही ही व्यक्तीरेखा साकारली की सत्तरच्या दशकातील ती आघाडीची व्हॅम्प बनली. पिक्चर थेटरातून निघून गेले तरी बिंदूचा ठसका लक्षात राहिला. फ्लॉप पिक्चरही एखाद्या कलाकारासाठी हिट फंडा ठरतो. म्हटलं ना, सिनेमाच्या जगात कधी काय घडेल हे सांगता येत नाही.
बासू चटर्जी दिग्दर्शित ’प्रियतमा’ (1978)ने असाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. हा पिक्चर येईपर्यंत आशा सचदेव म्हणजे गॉसिप्स मॅगझिनच्या ग्लॉसी पेपरवरील बोल्ड फोटोसेशनने लक्षवेधक असलेली आणि जणू त्याच सवयीनुसार ’डबल क्रॉस’ इत्यादी चित्रपटातून दिसणारी. ती अभिनयाच्या वाटेला जाणारी नाही अथवा तिचं आणि अभिनयाचे फारसं न जमणारं असाच फंडा. ’प्रियतमा’ बासुदा स्टाईल खेळकर खोडकर चित्रपट. जितेंद्र, नितू सिंग, राकेश रोशन यांच्या भूमिका असलेल्या चित्रपटात आशा सचदेव लक्षात राहिली ही केवढी मोठी गोष्ट. गंमत म्हणजे तिने अनेक चित्रपटांतून भूमिका साकारल्यात. लक्षात ’प्रियतमा’ राहिला.
विक्रम भट्ट दिग्दर्शित ’गुलामी’ (1998)त योगायोगानेच राणी मुखर्जी आमिर खानची प्रेमिका झाली आणि ’आती क्या खंडाला’च्या जबरदस्त क्रेझने स्टार झाली. पूजा भट्ट अगोदर ही भूमिका साकारत होती. महेश भट्ट दिग्दर्शित ’दिल है के मानता नही’नंतर पुन्हा आमिर व पूजा भट्ट एकत्र आले होते. अशातच पूजा भट्टला वाटले पडद्यावर येणं पुरे झाले, आपण पडद्यामागे राहूयात. निर्माती होऊयात. म्हणून तिने ’गुलामी’ व शाहरुख खानसोबतचा ’इंग्लिश बाबू देशी मेम’ सोडले. (यात सोनाली बेन्द्रेला संधी मिळालीच, त्यामुळे ती नृत्यदेखील शिकली.) आता ’गुलामी’त कोण? रानी मुखर्जीचे ’राजा की आयेगी बारात’ वगैरे दोनेक चित्रपट आले होते. तिचा आवाज घोगरा आहे असं म्हटलं जात होते. एकिकडे हे घडत असतानाच करण जोहरने ’कुछ कुछ होता है’ (1998)व्दारे दिग्दर्शनात पाऊल टाकले होते. शाहरुख खान, काजोल व आपली मैत्रीण ट्विंकल खन्ना असा प्रेम त्रिकोण नक्की केला. यश जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्सन्सची निर्मिती म्हणजे हॉट केक. भारीच बजेट. मोठाच तामझाम. एकूणच भारी मामला. तेवढ्यात ट्विंकलने पिक्चर सोडला (आमिर खान, शाहरूख खान यांची नायिका बनण्याचे अनेकींचे स्वप्न असतानाच हे काय? सिनेमाच्या जगात काहीही घडू शकते तसेच हे आहे.) करण जोहरचा शोध सुरू असतानाच एका मनोरंजन चॅनेलवर त्याने राजा की आयेगी बारात पाहिला आणि रानी मुखर्जीत ’स्टार मटेरियल’ जाणवलं. आणि राणीला एकदम ’गुलाम’ आणि ’केकेएचएच’ मिळाला.
सिनेमाचे जग एक प्रकारचा सापशिडीचा खेळ. येथे ठरवून काही होत नाही. कोणता चित्रपट सुपर हिट ठरेल आणि कोणती भूमिका भाव खाऊन जाईल हे सांगता येत नाही हीच तर या खेळातील गंमत आहे.
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक
Check Also
गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …