Breaking News

पनवेलला मिळणार अखंडित वीजपुरवठा; 480 कोटी रुपयांचा निधी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागास अखंडित वीजपुरवठा करण्याकरिता विविध योजनांतर्गत यापूर्वी अंदाजे 254 कोटी 11 लाख खर्च करण्यात आले असून उर्वरित 480.40 कोटी रुपयांची कामे सुधारित वितरण क्षेत्र योजनेच्या (आरडीएसएस) अंतर्गत प्रस्तावित केलेली आहेत, असे लेखी उत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात दाखल केलेल्या तारांकित प्रश्नाला दिले.
पनवेल शहरी व ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच संबंधित विभागातील अधिकार्‍यांच्या दुर्लक्षपणामुळे वीज खंडित होण्याच्या प्रकारात वाढ होत असून दररोज विजेचा दाब सातत्याने कमी-जास्त होत असल्यामुळे महागड्या विद्युत उपकरणांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन नागरिकांना नाहक भूर्दंड सहन करावा लागत असून वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी या अधिवेशनात दाखल केला होता, तर मागील अधिवेशनात पनवेलमधील ओव्हरहेड विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्यामुळे विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची कामे सुरू झाली नसल्याची बाब लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित करून ओव्हरहेड विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, नवीन सबस्टेशन, नवीन ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता तसेच मोडकळीस आलेले खांब, विद्युत वाहिन्या बदलण्यासाठी तत्काळ आवश्यक तो निधी उपलब्ध करण्याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही व उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात केली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम पूर्ण करण्यासाठी निधी देणार असल्याचे आश्वासन सभागृहात दिले होते.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दाखल केलेल्या तारांकित प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात माहे ऑक्टोबर-2023मध्ये वीजपुरवठा खंडित होण्याच्या 11 घटना घडल्या आहेत. अखंडित वीजपुरवठा करण्याकरिता महावितरणमार्फत गरजेनुसार वीज वितरण व्यवस्था सक्षमीकरण करण्याकरिता पायाभूत आराखडा तसेच इतर केंद्र शासनाच्या योजनांतून रोहित्रे क्षमता वाढ, नवीन रोहित्रे, जीर्ण झालेले खांब बदलणे, कमी दाबाचा वीजपुरवठा होणार्‍या ठिकाणाचे विज खांब व तारा बदलणे व इतर कामे हाती घेतली जातात. पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागास अखंडित वीजपुरवठा करण्याकरिता विविध योजनांतर्गत यापूर्वी अंदाजे 254.11 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून उर्वरित 480.40 कोटी रुपयांची कामे सुधारित वितरण क्षेत्र योजनेच्या (आरडीएसएस) अंतर्गत प्रस्तावित केली आहेत. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली मागणी आणि पाठपुराव्याला मोठे यश आले असून वीज ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
पनवेल तालुक्यातील खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजे, पनवेल शहर व ग्रामीण या भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि त्याचबरोबर लघू उच्च दाब वीज प्रवाहामुळे महागडे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे वारंवार खराब होण्याचे प्रकार निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने गेल्या मागील अधिवेशनात मी विद्युतसंदर्भात ट्रान्सफॉर्म, विद्युत खांब, विद्युत वाहिन्या बदलणे, वरील वाहिन्या भूमिगत करणे अशी वीज संबंधित कामे लवकरात लवकर करण्याची आवश्यकता सभागृहात मांडून या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली होती. आज प्रश्नाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 480 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आल्याची लेखी स्वरूपात माहिती दिली. त्या अनुषंगाने लवकरच या कामांना सुरुवात होणार असून पनवेलकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाचे मनपूर्वक आभार मानतो, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply