Breaking News

पिक्चर हिट, तेथेच सेलिब्रेशन… रियल शो

पिक्चर कोणासाठी बनवले जातात?… पब्लिकसाठी! काही चित्रपट जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवात दाखल व्हावेत, त्याचे कौतुक व्हावे, इंग्लिश मीडियाने दखल घ्यावीच, त्यांना पुरस्कार प्राप्त व्हावेत यासाठीच निर्माण होतात ती ’स्टोरी’च वेगळी.
पिक्चर पाहतो नि नाकारतो कोण?… पब्लिक. यह पब्लिक है पब्लिक. सब जानती है. आपल्याला आवडलेला चित्रपट ते पडद्यावर ठेवत नाहीत. ते डोक्यात घेतात, डोक्यावर घेतात. त्यावर जमेल तसं मनमुराद मनसोक्त व्यक्त होतात आणि आपल्याला न आवडलेला चित्रपट ते फार काळ चित्रपटगृहात ठेवू देत नाहीत. शेरे ताशेरे मारतात. तो आपला हक्क समजतात. आपण कोणता चित्रपट एन्जॉय करायचा आणि कोणता नाकारायचा याचे सगळेच हक्क प्रेक्षकांच्या स्वाधीन. ही वस्तुस्थिती न स्वीकारता पिक्चर फ्लॉप झालेले उगाच ओरडतात, प्रेक्षकांना हवयं तरी काय? याचं उत्तर सोपे आहे, तुम्ही जे दाखवताय ते नको.
पिक्चर हिट झालं त्याच थेटरात, त्याच पब्लिकसोबत यश साजरं करणं ही गोष्टच वेगळी. त्याचाही झक्कास फ्लॅशबॅक आहे याची कदाचित तुम्हाला कल्पना नसेल.
ताजं उदाहरण, ’बाईपण भारी देवा’च्या यशाच्या धमाल सेलिब्रेशनचे. तसं ते सुपर हिट पिक्चरच्या फर्स्ट शोपासूनच पब्लिकच्या उत्स्फूर्त टाळ्या शिट्ट्यांनी सुरूच असते. कधी पडद्यासमोर नाचकामही (पिक्चर असा बघायचा असतो का असा गंभीर प्रश्न कोणी करेलही, पण एकदा का आपण सिनेमाचे झालो की असे प्रश्न मागे मागे पडतात.)
’बाईपण…’चे यश प्लाझा चित्रपटगृहात मस्त साजरे झाले. सुकन्या कुलकर्णी आपल्या नव्वद वर्षांच्या आईसोबत आली हा खूपच भावनिक क्षण. वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, दीपा परब वगैरे या आनंदात सहभागी होतेच. धमाल आली. याची रिल्स बनली. त्यांना भरभरुन लाईक्स आल्या.
पूर्वीही असं प्रेक्षकांसह यश साजरं झालं. ’शोले’ यशाच्या गोष्टी कधीच न संपणार्‍या. मिनर्व्हात हुकमी हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असतानाच एकदा विजू खोटे (पिक्चरमधला ’कालिया’) ’शोले’ पाह्यला आला आणि पब्लिकसोबत त्याने तो एन्जॉय केला. त्या काळात आपलाच चित्रपट पाहण्यासाठी एक तर मिनी थिएटरमधील खास शो अथवा प्रत्यक्षात चित्रपटगृहात जाऊन तो पाहणे एवढाच मार्ग असे. अमजद खान चक्क मिनर्व्हातील 130व्या आठवड्यात ’शोले’ पाह्यला आल्याचा फोटो सोशल मीडियात पाह्यला मिळतो. ’शोले’चं यश अद्भूत
आणि मनोरंजक.
दादा कोंडके यांनी मराठीतून हिंदीत पाऊल टाकताच ’तेरे मेरे बीच मे’ या मसालेदार मनोरंजक चित्रपटाने मुंबईत इंपिरियल थेटरात आणि हैदराबाद शहरात रौप्यमहोत्सवी यश संपादले. दादा कोंडके कायमच जनसामान्यांत रमणारे. त्यांनी हैदराबादला हाऊसफुल्ल गर्दीत आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटाची ज्युबिली साजरी केली. विशेष उल्लेखनीय गोष्ट, आपल्या या यशात सहभागी करण्यासाठी मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना आवर्जून नेले. एक वेगळाच अनुभव होता तो. अन्य राज्यांच्या शहरात आपल्या एका मराठी कलाकाराला उत्स्फूर्त दाद मिळतेय हे केवढे तरी सुखावणारे होते. तेलगू भाषिक रसिकांचा आपल्या हिंदी चित्रपटाला मिळत असलेल्या रिस्पॉन्सने उषा चव्हाणही कमालीची इम्प्रेस झाल्याचे आठवतंय. दादांनी अशी पब्लिकसोबत ज्युबिली एन्जॉय केली.
मास्टर भगवानदादा यांच्या ’अलबेला’मधील भोली सूरत दिल के खोटे, शोला जो भडके दिल मेरा धडके, श्याम ढले खिडकी तले ही गीता बालीसोबतची गाणी आजही लोकप्रिय आहेत. हा चित्रपट मुंबईत 14 डिसेंबर 1951 रोजी प्रदर्शित झाला. मेन थिएटर इंपिरियल. भगवानदादांचे पिक्चर तोपर्यंत ताज, निशात अशा पिला हाऊसच्या थेटरात प्रदर्शित होत. पहिल्यांदाच त्यांचा चित्रपट मुख्य प्रवाहातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. एका फिल्मी पार्टीत राज कपूरने त्यांना हे सुचवले आणि दादांनी ते मनावर घेतले असा किस्सा प्रसिद्ध आहे, पण पहिले दोन आठवडे पिक्चरचा फारसा रिस्पॉन्स नव्हता. स्वत: भगवानदादा इंपिरियल थिएटरवर जाऊन ’पब्लिक रिस्पॉन्स’चा कानोसा घेत. हळूहळू गाणी लोकप्रिय होत गेली. लाऊडस्पीकरपासून इराणी हॉटेलमधील ज्यूक बॉक्सपर्यंत ती वाजली जाऊ लागली. लग्न, बारसं, महापूजा, सणात वाजली जाऊ लागली, त्यावर पब्लिक रोम्बा सोम्बा डान्स करू लागली. गाना सॉलीड हिट, पिक्चर हिट. सत्तरच्या दशकात रिपीट रनला ’अलबेला’ आला आणि रसिकांची बरीच पुढची पिढी असूनही गाण्यांच्या लोकप्रियतेवर पिक्चर पुन्हा हाऊसफुल्ल गर्दीत चालू लागले. या यशाची माध्यमातून सकारात्मक चर्चा होऊ लागली. अशा यशाचे सेलिब्रेशन व्हायला हवे ना?
’अलबेला’ची पन्नाशी इंपिरियल थिएटरमध्येच साजरी करण्याचे ठरले. एव्हाना पन्नाशच्या दशकातील चित्रपट रसिकांनी वयाची सत्तरी गाठली होती, पण सिनेमाचे व्यसनी मनाने कायमच तरुण असतात. त्यांना फक्त ’चार्ज’ होण्यासाठी संधी हवी असते. ती मिळाली. इंपिरियलमधील विशेष खेळात ’अलबेला’ एन्जॉय केला आणि जवळच्याच एका हॉलमध्ये अनेकांनी आपल्या आठवणी जागवल्या. एक अद्भूत सेलिब्रेशन. माणसाला फ्लॅशबॅकमध्ये जायला नक्कीच आवडते. त्यासाठी असा मौका हवा.
’हम आपके है कौन’(मुंबईत रिलीज 5 ऑगस्ट 1994)च्या लिबर्टीतील यशाला 2019मध्ये पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त असेच एक कौटुंबिक सेलिब्रेशन रंगले. खुद्द माधुरी दीक्षितचं त्यात येणं, असणं, रमणं डिजिटल मीडियात भरभरून व्ह्यूज, लाईक्स, कॉमेन्टसचे ठरले. पिक्चरची पंचवीस वर्षांनंतरही क्रेझ. याला म्हणतात चित्रपट रसिकांचे अस्सल प्रेम. म्हणजे याच लिबर्टीत महागड्या तिकीटात (पहिल्यांदाच तीन आकडी तिकीट दर. शनिवार रविवारच्या शोना) तब्बल 102 आठवड्यांचा मुक्काम भारी ठरला होता. प्रत्यक्षातील लग्न सोहळ्याचं कल्चर बदलून गेले (महागही झाले), त्यातील कपडे, वस्त्रलंकाराची फॅशन आली. सतत काहीना काही कारणास्तव पिक्चर, त्याची गाणी, काही दृश्ये कुठेना कुठे आजही चर्चेत असतात. पिक्चर जुनं होण्याची शक्यताच नव्हती. पंचवीस वर्षांनंतरही ते आजचेच राहिले.
’हीरो’ (रिलीज 16 डिसेंबर 1983)च्या यशाची पस्तीशी सुभाष घईंनी सेलिब्रेट केली. त्यांच्या मुक्ता आर्ट्सचाही पहिलाच चित्रपट. फर्स्ट रनला ताडदेव नाक्यावरील गंगा चित्रपटगृहात ज्युबिली हिट मुक्काम केला. पिक्चरच्या पस्तीशीत गंगा व जमुना ही जुळी थिएटर बंद होती. म्हणून न्यू एक्सलसियरला सेलिब्रेशन केले. जॅकी श्रॉफ भाव खाऊन गेला. एव्हाना सोशल मीडियाच्या युगात आपण आलो होतो. घई व जॅकीने जुन्या आठवणींना हसत खेळत उजाळा दिला. संजय दत्तच ’हीरो’ होता. नेमक्या याच काळात तो ड्रॅग डिक्ट झाल्याने उपचारासाठी अमेरिकेत गेला. घईने त्याच्यासोबत ’विधाता’ केला होता. कमल हसन बिझी असल्यानेच नाही म्हणाला. कुमार गौरवने दाढीला नकार दिला आणि त्याचा पिता राजेंद्रकुमारने जास्त मानधन मागितले. घईने त्याच वेळेस देव आनंदच्या ’स्वामी दादा’मध्ये शक्ती कपूरचा राईट हॅण्ड साकारत असलेल्या जॅकी श्रॉफला ’हीरो’ केला और उसकी तकदीर चमक गई भिडू. मॉडेल से स्टार बना. पस्तीस वर्षांनी हे सगळे ऐकणे रंजकच.
निर्माता सुधाकर बोकडेने म्युझिकल रोमॅन्टिक ’साजन’ (1991)च्या ज्युबिली हिटची अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमधील पार्टी साजरी केली. क्वचितच फिल्मी पार्टीत येणारी माधुरी दीक्षित या पार्टीत आली आणि ज्युबिलीची ट्रॉफी घेऊन आपल्या आईसोबत निघालीही. बोकाडेने लॉरेन्स डिसोझा दिग्दर्शित ’साजन’चं यश याहीपेक्षा वेगळ्या पध्दतीने साजरे केले. मुंबईतील ड्रीमलॅन्ड थिएटरमध्ये पिक्चर पंचवीसाव्या आठवड्यात सुरू असतानाच थिएटरच्या वॉचमनपासून डोअर्स किपरपर्यंत सगळ्यानाच संगीतकार नदीम श्रवण यांच्या हस्ते ट्रॉफी (स्मृतिचिन्ह) देत गौरव केला. पब्लिकची गर्दी होतीच.
चित्रपटगृह आणि त्यातील गर्दी हा पिक्चरच्या यशाचा सही फंडा. तेथेच सेलिब्रेशन ही कल्पनाच उत्तम. पंचतारांकित हॉटेलमधील महागड्या खर्चातील ’पार्टी’ ही चित्रपटसृष्टीची परंपरा, पण त्याची संधी पब्लिक देते, समझे!

– दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply