Breaking News

उरणमधील स्थानिक मच्छीमारांसाठी हायकोर्टात जाणार : आमदार महेश बालदी

उरण : रामप्रहर वृत्त
करंजा टर्मिनलजवळ भरणारा बाहेरील मच्छीविक्रेत्यांचा अनधिकृत मच्छी बाजार बंद करून आमदार महेश बालदी यांनी उरण शहर व परिसरासह तालुक्यातील स्थानिक मच्छीमारांना दिलासा दिला होता, मात्र करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन यांनी स्थानिकांचा पारंपरिक व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान राज्य शासनाला पत्र देऊन सुरू केले आहे. त्या विरोधात उच्च न्यायालयात जाऊन लढा देण्यात येईल, असा निर्धार आमदार बालदी यांनी केला आहे. ते स्थानिक मच्छीमार महिलांशी वार्तालाप करताना बोलत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार आणि वाहतूक बंद झाल्याने उरण व परिसरातील मच्छीमारांना मासळी विक्री करता येत नव्हती. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते. येथील स्थानिक मच्छीमारांनी आपली मासळी जवळच्याच करंजा बंदराजवळ विकण्यासाठी तात्पुरता बाजार सुरू केला. तालुक्यातील लोकांनादेखील लॉकडाऊनमध्ये समुद्रातील ताजी मासळी अल्प दरात मिळत असल्याने या बाजारात मासळी खरेदी करण्यासाठी झुंबड उडत असे, मात्र लॉकडाऊन संपल्यानंतरही हा बाजार सुरू राहिल्याने उरण शहर व परिसरातील मच्छीविक्रेत्यांवर त्याचा परिणाम होऊ लागला. शिवाय करंजा बंदरात मासळी विकण्यासाठी डहाणू, पालघर भागातील मच्छीमार येऊ लागल्याने बाहेरील मच्छीमारांचा या बाजाराला वेढा पडला होता. परिणामी उरण तालुक्यातील शेकडो मच्छीविक्रेत्या महिला बेरोजगार होण्याच्या मार्गावर होत्या. अखेर याबाबत त्यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांच्याकडे आपली कैफियत मांडली.
आमदार महेश बालदी यांनी तालुक्यातील गोरगरीब मच्छीविक्रेत्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ताबडतोब उरण पोलिसांना पत्र देऊन बाहेरील लोकांचा समावेश असलेला अनधिकृत मासळी बाजार बंद करण्याची मागणी केली. आमदार बालदी यांच्या प्रयत्नामुळे हा अनधिकृत बाजार बंद झाला आणि शेकडो स्थानिक मच्छीविक्रेत्यांचा रोजगार वाचला, मात्र त्यामुळे विरोधकांना जळफळाट झाला असून, हा बाजार पुन्हा सुरू करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. त्या विरोधात स्थानिक मच्छीमारांच्या वतीने उच्च न्यायालयात जाऊन कायद्याची लढाई लढणार असल्याचे आमदार बालदी यांनी म्हटले आहे.
…तर ‘तो’ बाजार उलथवून लावू!
स्थानिक मच्छीमारांना न्याय मिळाला नाही, तर करंजा येथील अनधिकृत बाजार उलथवून लावण्यात येईल, असा इशारा आमदार महेश बालदी यांनी या वेळी दिला. आपण याविषयी त्यांना समज देऊ, पण ते ऐकले नाही, तर सर्व ताकद एकवटून आपण सारे आठवड्यातून तीन-चार दिवस त्या बाजारात जाऊन ठिय्या देऊ, असेही आमदार बालदी यांनी स्पष्ट केले.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply