Breaking News

भीती नको, दक्षता हवी

जगभरात पुन्हा एकदा नव्या कोविड-19 विषाणू उपप्रकाराची चर्चा सुरू झाली आहे. भारतही याला अपवाद नाही. कोविड-19च्या देशातील ताज्या केसेसची संख्या बुधवारी चार हजारांच्या वर पोहोचली. यात केरळमधील रुग्णसंख्या सर्वाधिक असून सुटीमुळे गोव्यात पर्यटकांची गर्दी झाल्यामुळे की काय, दिवसभरातील सर्वाधिक रुग्ण गोव्यात नोंदले गेले. या सर्व रुग्णांमध्ये कोविड-19चा नवा उपप्रकार जेएन.1 हा विषाणू आढळला आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये 2019च्या डिसेंबरमध्येच कोविड-19 या विषाणूने जनजीवन विस्कळीत करण्यास सुरुवात केली होती. यंदाच्या डिसेंबरमध्ये जेएन.1 या कोविड विषाणूची चर्चा जगभरात सुरू झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ असे संबोधले असून या विषाणूपासून कमी धोका दिसतो आहे असेही म्हटले आहे. मात्र वेगाने पसरणारा हा उपप्रकार एव्हाना भारताखेरीज चीन, ब्रिटन आणि अमेरिकेत आढळतो आहे. 2021च्या डिसेंबरमध्ये ओमिक्रॉन या कोविड उपप्रकारामुळे जगभराचे धाबे दणाणले होते. 2022च्या डिसेंबरमध्ये कुठलाही नवा उपप्रकार समोर आला नसला तरी ओमिक्रॉनच्याच उपप्रकारांचा फैलाव काहिसा वाढला होता. डिसेंबरमध्येच हे विषाणू डोके वर काढतात कारण डिसेंबरमधील थंड आणि कोरडी हवा या विषाणूंसाठी पोषक ठरते आणि डिसेंबर हा जगभरात सुटीचा काळ असल्याने फैलाव झपाट्याने होतो असा निष्कर्ष संशोधनाअंती काढण्यात आला आहे. ताज्या कोविड विषाणूमुळे कर्नाटकात तीन मृत्यूंची नोंद झाली आहे, पण तूर्तास देशातील कोविडसंबंधी मृत्यूदर अवघा 1.19 टक्के इतकाच असल्याचे सांगितले जाते. गोव्यापाठोपाठ महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा येथे नव्या केसेस आढळल्या आहेत. जेएन.1च्या बहुतांश केसेसमध्ये सौम्य लक्षणे आहेत. एकूण केसेसपैकी 3128 केरळमधील, 344 कर्नाटकातील, 37 गोव्यातील तर 50 महाराष्ट्रातील आहेत. हा नवा विषाणू धोकादायक नाही असे दिसत असले तरी कुणीही बेपर्वाईने वागू नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. कर्नाटकातील वाढत्या केसेस लक्षात घेऊन तेथील सरकारने प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, बाधित व्यक्तींनी सात दिवस कुणाशी संपर्क न येऊ देणे आदींचा यात समावेश आहे. नववर्षाच्या आगमनानिमित्त आयोजित कुठल्याही सोहोळ्यावर निर्बंध लादले जाणार नाहीत हेही कर्नाटक सरकारने स्पष्ट केले आहे. वयोवृद्ध व गंभीर स्वरुपाचे आजार असणार्‍या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यायची आहे यावरच तज्ज्ञ भर देत आहेत. कोणीही भयभीत होऊ नये. सगळ्यांनी निव्वळ खबरदारी घ्यावी. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. फुफ्फुस व हृदयाशी संबंधित विकार असणार्‍यांनी तसेच प्रतिकारशक्ती कमी असणार्‍यांनी अधिक दक्षता बाळगावी असे तज्ज्ञ सांगत आहेत. या गटातील नागरिकांसाठी खरे तर साधा फ्लूसुद्धा चिंताजनकच मानला जातो. नव्या कोविड उपप्रकाराची पाहणी अद्याप पूर्ण झालेली नाही. हा विषाणू वेगाने पसरतो आहे, पण रुग्णालयात दाखल होण्याची गरज दिसलेली नाही. शंका वाटणार्‍या सर्वांनी तपासणी मात्र अवश्य करावी. त्यातूनच आपल्याला हा विषाणू प्रकार कसा आहे हे कळेल. कुठल्याही प्रकारच्या संसर्गापासून आपली काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी मानली पाहिजे. लसीकरण ही सरकारची जबाबदारी होती. दक्षता ही आपली जबाबदारी आहे हे लक्षात ठेवलेले बरे.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply