Breaking News

राजकीय युद्धाचे वर्ष

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. मावळत्या वर्षाने आपल्याला नेमके काय दिले याचा हिशेब घेण्याचे हे दिवस. तथापि, मावळत्या वर्षाचा हिशेब करण्यापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे ती येत्या वर्षातील सार्वत्रिक निवडणुकांची सज्जता.

लोकसभेच्या निवडणुका येत्या काही महिन्यांतच जाहीर होतील. पाठोपाठ विधानसभेसाठीही रणांगण गजबजू लागेल. मुंबई महापालिकेसह अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही झालेल्या नाहीत. त्यांचाही कौल घ्यावाच लागेल. सर्वोच्च न्यायालयाने येत्या वर्षात सप्टेंबर अखेरीपर्यंत जम्मू आणि काश्मीर येथे देखील निवडणुका घेण्यात याव्यात असा आदेश केंद्र सरकारला दिला आहे. थोडक्यात सांगायचे तर संपूर्ण देशभरात पुढील वर्षी राजकीय धमासान होणार आहे. त्याचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. यंदा प्रथमच काँग्रेसने महाराष्ट्रातील नागपूरमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात आहे हे सर्वश्रुत आहे. शिवाय, हे महानगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडलेली दीक्षाभूमी म्हणून लौकिकप्राप्त आहे. गेले काही महिने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टीकेचे लक्ष्य करत आहेत. अर्थात, काँग्रेसने संघावर टीका करणे हे काही नवीन नाही. सुरूवातीपासूनच काँग्रेसचे ते धोरण राहिले आहे. संघविचाराला जमेल तितका प्रखर विरोध सर्व पातळ्यांवर करत काँग्रेसने या देशावर साठ वर्षे राज्य केले, परंतु आता बाजी पलटली आहे. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने काँग्रेस विचारसरणीला आस्मान दाखवणार्‍या नेतृत्वाचा उदय झाला. मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कारभाराकडे कटाक्ष टाकला तरी हेच दिसून येते की संघाची विचारधारा पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी यशस्वीरित्या पुढे नेत आहेत. जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटविण्याचा मुद्दा असो किंवा अयोध्येतील राममंदिराचा विषय असो. संघाच्या मुशीतून तयार झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावरील हे मुद्दे होते व आहेत. जे स्वप्न संघसंस्थापकांनी आणि त्यानंतर थोर नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी पाहिले, तेच स्वप्न पंतप्रधान मोदी साकार करत आहेत. मोदी यांच्या विजयामध्येच काँग्रेसचा पराभव सामावलेला आहे हे ध्यानात घ्यायला हवे. ही विचारधारेची लढाई आहे. यंदा प्रथमच काँग्रेसने विचारधारेचा उपयोग निवडणुकीतील अस्त्र म्हणून करावयाचे ठरवलेले दिसते. म्हणूनच या पक्षाने नागपूरची भूमी प्रचाराची नांदी करण्यासाठी निवडली असावी. काँग्रेसच्या नागपूर येथे गुरूवारी झालेल्या सभेला गर्दी चांगली जमा करण्यात आली होती, परंतु नेहमीप्रमाणे नेत्यांची भाषणे रटाळ झाली. काँग्रेसच्या 138व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दलित कार्ड वापरले. पंतप्रधान मोदी हे संघ परिवाराचा अजेंडा पुढे रेटत आहेत आणि या अजेंड्यात दलितांना काहीच स्थान नाही असे विचित्र तर्कट त्यांनी आपल्या भाषणात मांडले. मोदी यांच्यावर ऊठसूट वेडीवाकडी टीका करणार्‍या राहुल गांधी यांनी नेहमीचीच टेप वाजवली. यामुळे मोदी यांचा विजयरथ रोखता येईल असे मात्र नव्हे. किंबहुना, संघ विचाराला पराभूत करण्याची ताकद काँग्रेस विचारसरणीने कधीच गमावली आहे. मोदी यांना जमेल तसा विरोध करत राहणे या पलीकडे कुठलाही अजेंडा विरोधकांकडे उरलेला नाही हेच खरे. मोठ्या लढाईसाठी काँग्रेसला सारे बळ एकवटून मोदी यांच्या करिश्म्याचा सामना करावा लागणार आहे. कारण मोदी हीच आता देशाची विचारसरणी बनून गेलेली आहे.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply