Breaking News

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

उरण : प्रतिनिधी
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू (मुंबई पारबंदर प्रकल्प)चे 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि.6) या अटल सेतूची ठिकठिकाणी थांबून पाहणी करून आढावा घेतला.
देशातील सर्वांत जास्त लांबी असलेला 22 किमीचा समुद्री मार्गावरील अटल सेतू आहे. या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या 20 मिनिटांत पार होणार असल्याने या वेगवान वाहतुकीमुळे मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी सांगितले.
पाहणी दौर्‍यात मुख्यमंत्र्यांसोबत कौशल्य विकास उद्योजगता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आय.एस. चहल, एमएमआरडीएचे डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. अश्विनी जोशी, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे, नवी मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अटल सेतू नवी मुंबई, रायगड यासह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प, उद्योग समूह येणार आहेत. त्यातून या परिसराचाही विकास होणार आहे. हा मार्ग शिवडी येथून सुरू होऊन समुद्रमार्गे चिर्ले येथील न्हावाशेवा येथे इतर मार्गांना जोडला जातो. या सेतूमुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या संपणार असून मुंबई ते नवी मुंबईत अवघ्या 20 मिनिटांत जाता येणार आहे. प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लेमिंगो पक्षी वाढले आहेत. हा सेतू मार्ग मुंबई-गोवा महामार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्याने विविध मोठे उद्योग, विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात येणार असल्याने परिसराचाही विकास होणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवडी ते चिर्ले या अटल सेतू पुलाची पाहणी करतानाच ठिकठिकाणी उतरून तेथील सुविधांची माहिती घेत त्या अनुषंगाने विविध सूचना एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांना दिल्या. अटल सेतूची नियमित स्वच्छता राखण्याबरोबरच परिसर सुशोभीकरण आणि वृक्षारोपण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या.
चिर्ले टोल प्लाझाजवळील वाहतूक नियंत्रण केंद्राला (कमांड सेंटर) मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. अटल सेतूवरील वाहतुकीचे नियंत्रण आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे कार्य आदींचीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनासह एमएमआरडीए अधिकार्‍यांना सूचना दिल्या. अटल सेतूची पाहणी केल्यानंतर चिर्ले येथे स्वच्छता कर्मचार्‍यांशी संवाद साधला. या भागात प्रकल्पाचे उद्घाटन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply