पी. पी. खारपाटील एज्युकेशन विद्यासंकुल अव्वल
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण पंचायत समिती शिक्षण विभाग, रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उरण तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात चिरनेर येथील पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यासंकुलनाची इ. आठवीची विद्यार्थिनी त्रिशा म्हात्रे हिने सांडपाण्याचे व्यवस्थापन या प्रयोगाच्या प्रतिकृतीची मांडणी केली होती. तिने या प्रयोगासाठी तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. तिची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यासंकुलनाचे सहाय्यक शिक्षक तथा विज्ञान प्रदर्शन प्रयोग शाळा सहाय्यक प्रदीप रसाळ यांनी वाहतूक व दळणवळण या प्रयोगाचे प्रात्यक्षिक सादर करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. प्रदर्शनाला रोटरी एज्युकेश सोसायटीचे अध्यक्ष विकास महाजन, राजिप शिक्षणाधिकारी (प्राथ.) पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ज्योत्स्ना पवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उद्धव कदम, नायब तहसीलदार धुमाळ, गटविकास अधिकारी समिर वाठारकर, गटशिक्षणाधिकारी उरण पंचायत समिती प्रियंका म्हात्रे, भाजपचे उरण शहराध्यक्ष कौशिक शाह, हितेश शाह, मोकाशी गुरुजी आदी उपस्थित होते. या तालुकास्तरीय उपक्रमात प्रश्नमंजुषा, निबंध, वक्तृत्व आणि विज्ञान परिसंवाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तालुकास्तरीय उपक्रमाला शिक्षकांबरोबर पालकांनीही भेटी देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.