Breaking News

अभिनेता, निर्माता सुजीतकुमारची कहाणी

’मेरे सपनो की रानी कब आयेगी तू ’हे आराधना’चे (1969) सदाबहार सर्वकालीन टवटवीत गाणे ओठावर येताच त्यासह काय काय आठवते? राजेश खन्नाची जीप चालवत हे सदाबहार गाणे साकारतानाची डोळे मिचकावणे, हातवारे करणे, दिलखुलास हसण्याची हवीहवीशी स्टाईल, रस्त्यालगत जात असलेल्या एक्स्प्रेस ट्रेनच्या खिडकीत बसलेली मुद्दाम म्हणा, आपल्याला उद्देशून होत असलेले गाणे आवडतय म्हणून म्हणा शर्मिला टागोर हे सगळे छान एन्जॉय करतेय, आपल्या हातात असलेल्या एलिस्टर मॅक्लीनच्या ’व्हेन ऐट बेल्स टॉल’ या पुस्तकात ती अधूनमधून डोकावतेय, यासह आपल्याला राजेश खन्नाच्या मित्राच्या भूमिकेतील सुजीतकुमारही आठवतो…
सुपर हिट गाणे रसिकांच्या अनेक पिढ्या ओलांडून सतत पुढे जात असतानाच त्या गाण्यातील असे हे सगळेच आठवतात. हीच आपली चित्रपट प्रेक्षक संस्कृती. ’आराधना ’ला एव्हाना तब्बल पंचावन्न वर्ष झाली आणि त्यातील मेरे सपनो की रानी, रुप तेरा मस्ताना, कोरा कागज था यह मन मेरा… वगैरे सगळीच गाणी आजही लोकप्रिय आहेत. आठवली तरी डोळ्यासमोर येतात. दिग्दर्शक शक्ती सामंतांचे हेही एक यशच.
सुजीतकुमारने अनेक हिंदी व भोजपुरी चित्रपटातून भूमिका साकारल्यात आणि या गाण्यातील तोही लक्षात राहिलाय. सुजीतकुमारचा जन्म 7 फेब्रुवारी 1934 रोजीचा तर मृत्यू 5 फेब्रुवारी 2010 रोजीचा. साल वेगळे. तरी तारखा जवळच्या. म्हणजेच सुजीतकुमारला पंचाहत्तर वर्षांचे आयुष्य लाभले.
सुजीतकुमारचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळील चकिया या गावचा. मूळ नाव शमशेर बहादूर सिंग. कुटुंबाचा व्यवसाय शेती. शालेय शिक्षणानंतर वकिली शिक्षणासाठी तो बनारसला गेला. कॉलेजमध्ये असतानाच हौस म्हणून नाटकात भूमिका साकारत असे. क्रिकेटमध्येही रस होता. एकदा दिग्दर्शक फणी मुजुमदार त्या कॉलेजच्या नाटकाला प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. त्यांना सुजीतकुमारचे काम आवडले. त्यांच्या हस्ते सुजीतकुमारला अभिनयाचा पुरस्कार देण्यात आला. तेव्हाच फणी मुजुमदार यांनी सुजीतकुमारला चित्रपट क्षेत्रात येण्याचे सुचवले. एक तर ते वय असा सल्ला स्वीकारण्याचे होते आणि दुसरे म्हणजे हा सल्ला फणी मुजुमदार यांचा होता. विशेष उल्लेखनीय गोष्ट, फणी मुजुमदार यांनी आपल्या दिग्दर्शनातील आकाशदीप या चित्रपटासाठी सुजीतकुमारला करारबद्धही केले, पण प्रत्यक्षात या चित्रपटात त्याला भूमिकाच दिली नाही. अथवा नव्हतीच. अशोककुमार, धर्मेंद्र, निम्मी व नंदा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटात सुजीतकुमारसाठी कदाचित एकाही दृश्यासाठी संधी नसेल. चित्रपटाच्या जगात असे होत असतेच पण ते स्वीकारायलाही हवे. आपण आता मुंबईत आलो आहोत, आपल्याला चित्रपटात काम करायचयं हे स्पष्ट असल्यानेच सुजीतकुमारने निराश न होता चित्रपटात भूमिका करायचे ठरवले. त्याला भोजपुरी भाषादेखिल चांगलीच येत होती आणि अशातच भोजपुरी भाषेतील पहिला चित्रपट गंगा मैया तोही पियरी चढाईयो ’ (1963) या चित्रपटात चक्क नायकाची भूमिका मिळाली. चित्रपट कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट होता आणि नायिका कुमकुम होती. पहिलाच भोजपुरी चित्रपट म्हटल्यावर बिहार, उत्तर प्रदेश येथे चित्रपट गर्दीत चालणारच.
सुजीतकुमारला आता हिंदीत लाल बंगला, सबका उस्ताद, जाल अशा छोट्या क्राईम चित्रपटात अक्षरश: किरकोळ भूमिका मिळत होत्या आणि आपण चित्रपटसृष्टीतच राह्यचं, जसं जसे काम मिळेल ते करीत राह्यचं हा सुजीतकुमारचा फोकस स्पष्ट होता. त्याला यशाची घाईही नव्हती हे त्या काळाचे वैशिष्ट्य. शक्ती सामंता वगैरे काही निर्मात्यांनी सुजीतकुमारला ’मिलते रहो, मेरी फिल्म मे कोई काम हो तो मिल जाएगा’ असे सतत आश्वासनही दिले. अशा अनेक गोष्टी चित्रपटसृष्टीचा एक भाग आहेत. सुजीतकुमारला दूर गगन की छांव मे, एक साल पहले अशा काही चित्रपटातून छोट्या छोट्या भूमिका मिळाल्या. काही भोजपुरी चित्रपटातूनही काम मिळत होते.
अशातच रामानंद सागर निर्मित व दिग्दर्शित आणि धर्मेंद्र व माला सिन्हा नायक नायिका असलेल्या ’आंखे’ (1968) या चित्रपटातील सुजीतकुमारची भूमिका त्याला साधारण ओळख मिळवून देणारी ठरली. आता सुजीतकुमारचा आत्मविश्वास वाढला. त्याला आणखीन चित्रपट मिळू लागले. ’आराधना’साठी दिग्दर्शक शक्ती सामंतांनी लक्षवेधक भूमिका दिली. त्यांच्याच ’अमर प्रेम’मध्येही तो होता. बी. आर. चोप्रा निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ’इत्तेफाक’मध्ये क्लायमॅक्सला रहस्यभेद होतो तेव्हा सुजीतकुमारची पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका महत्वाची ठरते. या तीनही चित्रपटात राजेश खन्ना नायक असून प्रत्येक चित्रपट भिन्न स्वरुपाचा आहे. राजेश खन्ना व सुजीतकुमार यांनी यासह आन मिलो सजना, हाथी मेरे साथी, मेरे जीवन साथी, रोटी, मेहबूबा, अवतार, आखिर क्यू, या चित्रपटात एकत्र काम केले.
सुजीतकुमार चित्रपटसृष्टीत व्यवस्थित स्थिरावला…धरती कहे पुकार के, नया रास्ता, हमराही, आप बिती, मर्डर इन सर्कस, जुगनू, धरमवीर, अदालत, द ग्रेट गॅम्बलर, अब्दुल्ला, गुस्ताफी माफ, पुतलीबाई, द बर्निंग ट्रेन, कामचोर, राम बलराम, कलाबाझ, बैराग, तिरंगा इत्यादी अनेक चित्रपटांत लहान मोठ्या आणि अक्षरश: कोणत्याही स्वरुपाच्या भूमिका साकारल्या. कधी पोलीस तर कधी गुन्हेगार. कधी पोशाखी चित्रपट तर कधी सामाजिक चित्रपट. कधी चांगला मित्र तर कधी चक्क कपटी मित्र. सुजीतकुमारने काहीच गैर मानले नाही. या मनोरंजन क्षेत्रात टिकून राह्यचे तर ’चांगल्या भूमिकेची वाट पहात राहण्यापेक्षा आलेली वा मिळालेली भूमिका चांगल्या प्रकारे साकारावी’ हे सूत्र त्याने अंगिकारले. आपण साकारत असलेल्या भूमिकांना चित्रपटसृष्टीत बरेच पर्याय आहेत ही त्याची समज खूपच महत्वाची ठरली. यातून सुजीतकुमार घडला. यशस्वी वाटचाल करीत राहिला.
नरेशकुमार दिग्दर्शित ’टांगेवाला’ या चित्रपटात त्याने जमीनदाराची भूमिका साकारलीय. राजेंद्रकुमार नायक असलेल्या या चित्रपटात मुमताज नायिका असून ती या जमीनदाराला जवानी बार बार नहीं आती या नटखट गाण्यात मोहक मादक अदांनी त्याला वश करण्याचा प्रयत्न करते. मेहुलकुमार दिग्दर्शित ’क्रांतीवीर ’ त्याचा कलाकार म्हणून शेवटचा चित्रपट.
’आपल्या भोजपुरी भाषेतील’ चित्रपटातही काम करीत राहिला. लोहा सिंग,चंपा चमेली, साजन करे कन्यादान, माय के लाल, संपूर्ण तीर्थयात्रा, सैया मगन पहेलवानी मे, गंगा हमार है अशी त्याची भोजपुरी चित्रपटांची संख्या वाढत वाढत राहिली. अशातच पहिला रंगीत भोजपुरी चित्रपट दंगल’ मध्येही सुजीतकुमार हीरो. आता त्याला भोजपुरी चित्रपटांचा दिलीपकुमार असं म्हटलं जाऊ लागले. त्याचे भोजपुरी चित्रपट विदेशातही प्रदर्शित होऊ लागले. त्या चित्रपटांचे मार्केट वाढले. सुजीतकुमार एवढ्यावरच थांबला नाही. अनुभवातून बरेच काही शिकला.
सत्तरच्या दशकातील हिंदी व भोजपुरी चित्रपटांतून झालेल्या आर्थिक कमाईतून त्याने जुहू परिसरात छोटासा टुमदार बंगला बांधला. तो बंगला नेमका कुठे आहे माहित्येय? जुहूच्या अमिताभ बच्चनच्या ’प्रतिक्षा बंगल्याच्या बरोबर मागील डाव्या बाजूच्या सुरुवातीचा बंगला सुजीतकुमारचा आहे. म्हणजेच तो अमिताभ बच्चनचा शेजारी. विशेष उल्लेखनीय गोष्ट, फार पूर्वी सुजीतकुमारने या बंगल्यात मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना छान पार्टी दिली. सुजीतकुमारचा बंगला असणे हे अनेकांना आश्चर्यचकित करणारे. पण पैसा कसा मिळवायचा याचे ज्ञान त्याला होते.
सुजीतकुमारने आणखीन एक विशेष गोष्ट केली. त्याने चित्रपट निर्मितीत पाऊल टाकले. काशिनाथ दिग्दर्शित सेक्स कॉमेडी ’अनुभव’ (शेखर सुमन, पद्मिनी कोल्हापूरे, रिचा शर्मा) ही त्याची पहिली चित्रपट निर्मिती. 1980 सालची ही गोष्ट. हा चित्रपट एका तेलगू चित्रपटाची रिमेक होता. म्हणजेच खूपच लवकर त्याने आपला कार्यविस्तार केला. आणि मग टप्प्याटप्प्याने एकेक चित्रपट निर्माण केला. मेहुलकुमार दिग्दर्शित ’आसमान से उंचा’ (गोविंदा व सोनम), राकेश रोशन दिग्दर्शित ’खेल’ (अनिल कपूर व माधुरी दीक्षित), अब्बास मुस्तान दिग्दर्शित ’दरार’ ( ऋषि कपूर, जुही चावला, अरबाझ खान), पद्मकुमार दिग्दर्शित चॅम्पियन (सनी देओल व मनिषा कोईराला), विक्रम भट्ट दिग्दर्शित ’ऐतबार’ (अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम, बिपाशा बसू) या चित्रपटांची निर्मिती केली. दरम्यान काही वर्षांचे अंतर ठेवले. सुजीतकुमारचे दुर्दैव बघा कसे ते, ’खेल’ आणि सतिश कौशिक दिग्दर्शित ’रुप की रानी चोरों का राजा’ हे चित्रपट मध्यंतरापर्यंत जवळपास सारखेच. फक्त चकचकीतपणात फरक. नायक व नायिका दोघेही चोर. विशेष उल्लेखनीय गोष्ट, या दोन्ही चित्रपटांचे पटकथा लेखक एकच, ते म्हणजे जावेद अख्तर. (सत्तरच्या दशकात सलिम खानसोबत ते ग्रेट पटकथा व संवाद लेखक होते हो.) तोच प्रकार ’दरार’ आणि पार्थो घोष दिग्दर्शित ’अग्निसाक्षी’ चित्रपटाचा. एकाच विदेशी चित्रपटावरुन हे चित्रपट निर्माण होत गेले आणि ’अग्निसाक्षी ’ सर्वप्रथम पडद्यावर येत हिटही झाल्यावर ’दरार ’ची निर्मिती लांबत लांबत गेली. सुजीतकुमार मिडिया फ्रेन्डली होती. ’खेल’ आणि ’दरार’च्या सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी आम्हाला आवर्जून बोलवले. भरपूर गप्पा करत जुन्या आठवणीत नेले. त्याने ’पान खाये सैया हमार’ या भोजपुरी चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. अमिताभ बच्चन व रेखा त्यात पाहुणे कलाकार होते. हे श्रेय सुजीतकुमारचे.
’ऐतबार’नंतर त्याला दुर्दैवाने कर्करोगाने गाठले. ग्रासले. अशातच पत्नी किरणचे 2007 साली निधन झाल्यावर सुजीतकुमार एकदमच निराश झाला. एक मुलगा व एका मुलीचा त्याला आधार होता. आजारपणाच्या काळात राजेश खन्ना, राकेश रोशन अशा अनेकांनी त्याला मदत केली. एकाच क्षेत्रात ते एकाच काळात वाढले, घडले. नावारुपास आले. रणधीर कपूर, सावनकुमार टाक यांच्याशीही त्याचे चांगले संबंध. अखेर 5 फेब्रुवारी 2010 रोजी सुजीतकुमारचे निधन झाले.
रसिकांच्या एका पिढीला सुजीतकुमार चांगलाच माहित आहे. संपूर्ण कारकिर्दीत त्याला कोणताच मानाचा पुरस्कार प्राप्त झाला नाही तरी तो कुठेच थांबला वा रेंगाळला नाही हे जास्त महत्वाचे. म्हणूनच तो यशस्वी ठरला.

-दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply