वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड यांचे आवाहन
पेण : प्रतिनिधी : कोकणात होळीच्या सणासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. नागरिकांनी इकोफ्रेंडली होळीचा सण साजरा करून राष्ट्राची संपत्ती असलेल्या वनांचे रक्षण करावे आणि झाडांचा पालापाचोला, केळीची पाने, गोवर्या याद्वारे होळीचा सण साजरा करावा, असे आवाहन पेण वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड यांनी केले आहे.
गेल्या सात ते आठ वर्षापासून पेण वन विभागाच्या कार्यालयीन जागेमध्ये गोवर्या, पालापाचोला, केळीची पाने यांचा वापर करून वनविभाग व वृक्षप्रेमींतर्फे पर्यावरणपूरक होळीचे प्रात्यक्षिक सादर केले जात असून, जनजागृतीद्वारे केली गेल्याने ‘इको फ्रेंडली’ होळी साजरी करणार्यांची संख्या वाढत असल्याचे वनक्षेत्रपाल गायकवाड यांनी सांगितले.
महाराष्ट्रामध्ये 36 पैकी 33 जिल्ह्यामध्ये सुके गवत, गोवर्या, पालापाचोळ्याचा वापर करून पर्यावरणपूरक होळी साजरी केली जाते, मात्र आपल्याकडे कोकणात सावर, आंबा, जांभुळ, औदुंबर अशी जिवंत झाडे तोडून होळी सण साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याचा आदर्श घेऊन आपल्या येथेही पर्यावरणपूरक सण साजरा व्हावा, असे आवाहन वृक्षमित्र उदय मानकावळे यांनी केले आहे.
पेण वनविभागाची व्याप्ती सुमारे नऊ हजार 900 चौरस मीटर असून या क्षेत्रात पानझडी जंगलाचा समावेश आहे. या क्षेत्रात 7 वनपाल व 25 वनरक्षकाद्वारे या वनांचे सरंक्षण केले जाते. गेल्या काही वर्षापासून शतकोटी वृक्षलागवडीमुळे नागरिकांमध्ये वृक्षप्रेम वाढीस लागले असून दरवर्षी होणार्या वृक्षलागवडीमुळे वनांचे स्वरूप बदलत आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर जी वृक्षतोड होत होती, ते प्रमाण आता कित्येक पटीने कमी झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. सध्या पर्यावरणपूरक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यावर नागरिकांनी भर दिला आहे.