Breaking News

दुबळी विरोधी आघाडी

एकीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या चिरफळ्या उडत असल्याचे चित्र देशासमोर उभे राहात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजच्या रोज अधिक प्रभावीपणे प्रचाराला दिशा देत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून काँग्रेसकरिता जनतेमध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या न्याय यात्रेला त्यांच्या यापूर्वीच्या भारत जोडो यात्रेइतका प्रतिसाद मिळत नसल्याचे लपून राहिलेले नाही. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तगडे आव्हान देण्यासाठी विरोधीपक्षांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीचेही लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच बारा वाजले आहेत. सगळ्यात आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लढण्याचा नारा देऊन आघाडीला तोंडावर पाडले. ममता दीदींपाठोपाठ आघाडीच्या इतरही घटक पक्षांनी एका मागोमाग एक राहुल गांधींच्या न्याय यात्रेकडे पाठ फिरवल्याने ही यात्रा आधीच्या भारत जोडो यात्रेच्या तुलनेत प्रभावाच्या बाबतीत बरीच फिकी पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. या आधीच्या भारत जोडो यात्रेमध्ये विरोधीपक्षांतील काही नेतेमंडळी राहुल गांधी यांच्यासमवेत चार पावले चालली होती, परंतु आताच्या न्याय यात्रेत मात्र राहुल गांधी एकटे पडल्यासारखेच दिसले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडल्याने बसलेल्या धक्क्यातून आघाडी अद्याप सावरलेली नाही. अलिकडेच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनीही स्वबळाचा नारा दिला आहे. एनडीएसोबत जाण्याचा पर्यायही खुला असल्याचे संकेत त्यांनी दिल्यानेच ते आघाडीतून बाहेर पडल्याची चर्चा सुरू झाली. नुकतेच शरद पवार यांनीही इंडिया आघाडीत काही ठिकाणी वादविवाद असल्याचे नमूद केले. काही पक्षांची भूमिका त्या-त्या राज्यापुरती सीमित आहे. काही राज्यांत वादविवाद आहे हे नाकारता येत नाही, परंतु हे वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पवार म्हणाले. एकीकडे अयोध्येतील बहुप्रतिक्षित मंदिरात श्रीरामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पंतप्रधान मोदींनी देशभरातील जनतेची मने जिंकून घेतली आहेतच. खेरीज रोज कुठल्या न कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेशी संवाद साधताना आपल्या अमोघ वक्तृत्वशैलीने मोदीजी ‘अब की बार 400 पार’चा मंत्र सहजपणे जनतेच्या मनावर कोरत आहेत. त्यांच्या ‘मोदी की गॅरंटी’ यांसारख्या वचनांना जनतेमध्ये स्वाभाविक अशी लोकप्रियता लाभत असताना विरोधीपक्षांचे नेते मात्र बहुतांशी तोंड मिटून गप्प असल्याचेच दिसते आहे. नुकताच भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनातूनही मोदींनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला. येणारे 100 दिवस नव्या ऊर्जेने, नव्या उत्साहाने, नव्या विश्वासाने काम करण्याचे आहेत. या शंभर दिवसांत प्रत्येक नव्या मतदारापर्यंत, प्रत्येक लाभार्थीपर्यंत, प्रत्येक वर्ग व समाजापर्यंत पोहोचायचे आहे असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना भरपूर ऊर्जा प्रदान केली. भारतरूपी मंदिर उभारण्याची जबाबदारी आपल्यावर साक्षात परमेश्वरानेच सोपवली आहे असे सांगणार्‍या मोदीजींवर जनतेला पूर्ण भरवसा आहेच आणि त्यांच्यासमोर, त्यांच्या जवळपासही जाईल असा कुठलाच पर्याय विरोधकांमध्ये दिसत नाही याचीही पुरेपूर जाणीव लोकांना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षासमोर तितकेच सामर्थ्यपूर्ण आव्हान उभे करणे तर दूरच किमान आपली आघाडी नीट टिकवणेही विरोधकांना जमलेले नाही. चर्चेच्या अनेक फेर्‍यांनंतर बुधवारी काँग्रेस आणि समाजवादी पक्षात उत्तर प्रदेशपुरते जागावाटपावर एकमत झाले असले तरी इंडिया आघाडीला लागलेली गळती पाहता आपली दुबळी प्रतिमा सावरण्यासाठी विरोधकांना आणखी बरेच प्रयत्न करावे लागतील.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply