पनवेल ः बातमीदार
उलवे येथील सेक्टर 25 मध्ये एका सुरक्षारक्षकाने कंत्राटदाराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. खगेंद्र बहादूर असे या सुरक्षारक्षकाचे नाव असून एनआरआय पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मुनेश्वरकुमार उर्फ मनीष राम बाबू (30) हा सेंट्रिंगच्या कामाचे कंत्राट घेऊन कामगारांच्या माध्यमातून काम करवून घेत होता. मुनेश्वर याला उलवे सेक्टर 25 एमधील व सेक्टर 25मधील पद्मावती डेव्हलपर्स या दोन्ही ठिकाणच्या बांधकाम साइटवरील सेंट्रींगचे काम मिळाले होते. त्यामुळे मुनेश्वर हा सहकार्यांसह तिथेच रहात होता. पद्मावती डेव्हलपर्सच्या बांधकाम साइटवर कामास असलेल्या खगेंद्र बहादूर याचे 29 नोव्हेंबर रोजी किरकोळ कारणावरून भांडण झाले.
या भांडणाच्या रागात आरोपी खगेंद्र बहादूर याने मुनेश्वर याला बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यावर लाकडाने जोरदार फटका मारला. यात मुनेश्वर याच्या डोक्यास जबर दुखापत झाल्याने तो जागेवरच मरण पावला. या घटनेनंतर खगेंद्र बहादूर पळून गेला होता. एनआरआय पोलिसांनी खगेंद्र याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला पकडण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती. मुनेश्वर हा खगेंद्र बहादूर याला दारू पिऊन नेहमी त्रास देत होता. 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कामावरून सुटल्यानंतरही मुनेश्वर याने खगेंद्र बहादूर याच्यासोबत वाद घालून भांडण काढले. या भांडणाच्या रागात खगेंद्र बहादूर याने त्याला मारल्याची कबुली दिली.