Breaking News

शार्दुल ठाकूरचे जलद अर्धशतक; सेहवागला टाकले मागे

लंडन ः वृत्तसंस्था

भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली आणि अवघ्या 31 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. शार्दुल भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद अर्धशतक करण्याच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आला आहे.

शार्दुलने 36 चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 57 धावांची खेळी खेळली. कसोटी क्रिकेटमधील हे त्याचे दुसरे अर्धशतक होते. ओली रॉबिन्सनला षटकार ठोकून त्याने आपले अर्धशतक साजरे केले. शार्दुलच्या खेळीवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आक्रमक फलंदाजीचा बादशाह वीरेंद्र सेहवागने शार्दूल ठाकूरच्या वॅगन व्हीलबद्दल बोलावे लागेल, असे कधी वाटले नव्हते, असे म्हटले.

याआधी वीरेंद्र सेहवाग भारतासाठी कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर होता. त्याने 2008मध्ये इंग्लंडविरुद्ध 32 चेंडूंत ही कामगिरी केली होती. आता शार्दुलने इंग्लंडविरुद्ध 31 चेंडूंत अर्धशतक झळकावून दुसरे स्थान मिळवले. कपिल देव यांनी 1982 साली पाकिस्तानविरुद्ध भारतासाठी कसोटीत सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला होता.

शार्दुल ठाकूरच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 191 धावांचा टप्पा गाठला. कर्णधार विराट कोहलीनेही 50 धावांचे योगदान दिले, रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा हे सर्व फलंदाज मात्र अपयशी ठरले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply