Breaking News

बीस साल बाद…; श्रवणीय संगीताच्या वेष्टनातील भयपट

बेकरार कर के हमे यू न जाईये (पार्श्वगायक हेमंतकुमार)
कहीं दीप जले कही दिल (लता मंगेशकर)
जरा नजरों से कहदो जी निशाना चूक न जाऐ (हेमंतकुमार)
ये मोहब्बत मेरी दुनिया मे (लता मंगेशकर)
सपने सुहाने लडक पन के (लता मंगेशकर)
ही अतिशय मधुर आवाजातील गाणी आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीने यू ट्यूबवर पाहिली अथवा ऐकली तर त्यांचा समज होईल की एखाद्या जुन्या प्रेमपटातील ही अतिशय गोड गाणी आहेत. त्यात मनस्वी अशा पद्धतीने प्रियकर आणि प्रेयसीने अतिशय उत्कटपणे प्रेम भावना व्यक्त केल्या आहेत. शकील बदायुनी लिखित या गाण्यांना हेमंतकुमार यांचे संगीत आहे.
या प्रेम भावनाच आहेत, पण रहस्यरंजक सायकॉलॉजिकल थ्रीलर बीस साल बाद ( मुंबई रिलीज 4 मे 1962) या चित्रपटातील आहेत. चित्रपटाच्या भाषेत सांगायच तर हा भूतपट होता.
बीरेन नाग दिग्दर्शित आणि हेमंतकुमार निर्मित या चित्रपटाचे थोडक्यात मध्यवर्ती सूत्र असे, उत्तर भारतातील दूरवरच्या एका चंदनघाट गावातील जमीनदार ठाकूरची एका युवतीवर बुरी नजर असते. दुर्दैवाने ती त्याच्या हवसची शिकार बनते. त्यातून ती आत्महत्या करते. त्यामुळे संपूर्ण गाव हादरते. काही दिवसांतच त्या ठाकूरचेही दुर्दैवाने निधन होते. तेव्हा चंदनघाटमध्ये खबर पसरते, त्याच्या वासनेची शिकार झालेल्या युवतीच्या आत्म्याने हा सूड घेतला. तिचा आत्मा गावात फिरतोय. यावरून गावात दंतकथा पसरतात. त्या एका पिढीतून पुढील पिढीत जात राहतात.
बीस साल बाद त्या ठाकूरचा नातू कुमार विजयसिंग (विश्वजीत) ही केवळ दंतकथा आहे, यात काहीही तत्थ नाही हे चंदनघाटला समजावून सांगण्यात अगदी प्रयत्नपूर्वक यशस्वी ठरतो आणि हे करत असतानाच त्याचे राधाशी (वहिदा रेहमान) प्रेम प्रकरण जुळते. फ्लॅशबॅकने हा चित्रपट घडतो. चित्रपटात मनमोहन कृष्ण, मदन पुरी, असित सेन, सज्जन यांच्याशी प्रमुख भूमिका आहेत.
कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट चित्रपटाचा आपला एक रंग असतोच. आणि त्याचा भयपटात भारी उपयोग करता येई. विशेषत: फक्त सावलीच चालतेय ही गोष्ट कुतूहल निर्माण करे.
या चित्रपटाला तब्बल बासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत. तरी बीस साल बाद म्हणताच रसिकांच्या किमान तीन पिढ्यांच्या डोळ्यासमोर हा भयपट येतो आणि त्यातील लोकप्रिय गाणीही ओठांवर येतात. निर्माता व दिग्दर्शक राजकुमार कोहली यांनीही बीस साल बाद (1988) नावाने भयपट पडद्यावर आणला. मिथुन चक्रवर्ती, डिंपल व मीनाक्षी शेषाद्री यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाची वेगळ्या अर्थाने भीती वाटली. हा सगळाच आभासाचा खेळ होता. न जमलेला, न रंगलेला.
बीरेन नाग हे साठच्या दशकातील कल्पक कला दिग्दर्शक. प्यासा (1957), काला पानी (1958), चौदहवी का चांद (1960), ’साहेब बीवी और गुलाम (1962) या चित्रपटांचे कला दिग्दर्शन त्यांचेच. हे क्लासिक चित्रपट तुम्ही पाहिले असल्यास त्यातील कला दिग्दर्शकाची कल्पकता, बोलके सेट्स आणि बीरेन नाग यांना अतिशय उत्तम दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची मोलाची संधी व ते सर्व करीत असतानाच चित्रपट या दृश्य माध्यमाची आवड व बरेच काही शिकण्याची मिळालेली संधी यांची कल्पना आली असलेच. अशा गुणी दिग्दर्शकाची सावलीही बरेच काही शिकवते. बीरेन नाग यांनी याच मुरब्बी दिग्दर्शकांच्या सहवासात राहून दिग्दर्शनात स्वतंत्र पाऊल टाकताच ‘बीस साल बाद’मध्ये कला दिग्दर्शन (ते आता जी. एल. जाधव यांचे आहे) व छायाचित्रण (ते मार्शल ब्रगेन्झा) यांचा उत्तम वापर करून घेतला. पटकथा ध्रूव चटर्जी यांची तर संवाद देव किशनचे आहेत.
चित्रपटाच्या नाव व पोस्टरवरुन हा भयपट असल्याचे आपल्या डोक्यात फिट्ट असल्यानेच चित्रपटाची सुरुवात खूपच महत्त्वाची होती (सुरुवात चुकवू नका. शेवट कोणाला सांगू नका असं फार पूर्वी वृत्तपत्रातील चित्रपटाच्या जाहिरातीत ठळकपणे दिलेले असे आणि त्या काळातील चित्रपट व्यसनी त्या सूचनेचे तंतोतंत पालन करीत. यालाच चित्रपटावरचे प्रेम म्हणतात. त्यानेच अनेक अडथळे, आव्हाने इत्यादींवर मात करीत आपल्या देशात चित्रपट जगवला. रुजवला.)
’बीस साल बाद ’ची सुरुवात किर्र किर्र अशा आवाजात रात्रीतून होते. एक मध्यमवयीन माणूस हातात दिवा घेऊन झाडाझुडपातून जात जात काहीतरी शोधतोय, तेवढ्यात तो पाठमोरा होतो आणि त्याच्यावर भली मोठी नखे झडप घालतात. त्यात तो मृत्यूमुखी पडतो (पिक्चरची सुरुवातच अशी दचकावून सोडणारी) आणि एका बंद दरवाजाच्या गाडीतून त्याचा मृतदेह नेला जातो आणि पडद्यावर शीर्षक सुरू होतात, गीतांजली पिक्चर्स प्रस्तुत बीस साल बाद… मुंबईत मेन थिएटर इंपिरियलला हा चित्रपट ज्युबिली हिट ठरला. याचं कारण चित्रपटाची थीम, त्याची वेधक मांडणी (चित्रपटात आपल्याला चकवा बर्याचदा मिळतो) आणि लोकप्रिय गीत संगीत.
साठच्या दशकातील हा चित्रपट रिपीट रन, मॅटीनी शोला सतत प्रदर्शित होत होत सत्तरच्या दशकातही आला. एखादी कलाकृती काळासोबत पुढे जात जात राहणे हेदेखील यशच. मी सत्तरच्या दशकात रॉक्सीत मॅटीनी शोला पाहिला. तोपर्यंत प्रसारमाध्यमांतून ’फ्लॅशबॅक’, ’वो दिन याद करो’, ’गुजरा हुआ जमाना’, ‘घुंघट के पट खोल’ अशा जुन्या काळातील चित्रपटाच्या सदरातून ‘बीस साल बाद’ दिसत होता. थोडासा स्पष्ट होत होता. वाचनातून चित्रपट दिसत राहणे असेही पूर्वी होत असे. चित्रपटविषयक वाचनाचेही रंग अनेक. रेडिओवरील ’भुले बिसरे गीत’ यासारख्या जुन्या गाण्याच्या कार्यक्रमातून बेकरार कर के हमे यू न जाईये, जरा नजरो से कह दो जी वगैरे मुलायम आवाजातील गोड गाणी ऐकत होतो. त्या काळात असे रहस्यरंजक जुने चित्रपट मॅटीनी शोला रिलीज करण्याचा आणि आम्ही कॉलेज युवकांनी सस्पेन्स थ्रीलर चित्रपट एन्जॉय करण्यात वेगळीच गंमत असे. पडद्यावर पिक्चर सुरू असतानाच आम्ही ’खरा खुनी कोण अथवा खरा गुन्हेगार कोण’ यावर हळू आवाजात कुजबुज करीत अंदाज बांधत असू आणि क्लायमॅक्सला काही भलताच सस्पेन्स दिसला की दिग्दर्शन भारी होते असेच प्रमाणपत्र देऊन आम्ही मोकळे होऊ.
‘बीस साल बाद’च्या यशानंतर बीरेन नागने कोहरा (1964) या भयपटाचे दिग्दर्शन केले. त्याबरोबरच त्याचे कला दिग्दर्शनही सुरू होतेच. अमरजीत दिग्दर्शित ‘हम दोनो’ (1962), विजय आनंद दिग्दर्शित ‘तेरे घर के सामने’चे (1963) कला दिग्दर्शन त्याचेच. तेरे घर के…साठीचा त्याने लावलेला दिल्लीतील कुतुबमिनारचा अप्रतिम व हुबेहुब सेट आणि त्यातीलच देव आनंद व नूतनवरचे दिल का भंवर करे पुकार हे गाणे सगळचं कसे छान व क्लासिक. दुर्दैवाने बीरेन नागचे वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी निधन झाले. अन्यथा त्यांनी बीस साल बाद, कोहरा असे कल्पक भयपट नक्कीच दिग्दर्शित केले असते.
‘बीस साल बाद’ त्यातील लोकप्रिय गीत संगीताने आजही लोकप्रिय आहे. या नावातच त्याची खरी ओळख आहे. यू ट्यूबवर एकदा पहा तर खरे, मोनो साऊंड सिस्टीम असूनही चित्रपट छान रंगतो. तेच तर महत्त्वाचे असते. सत्तरच्या दशकातील अनेक रहस्यरंजक चित्रपट त्या काळात आवर्जून पाहिले गेले… त्यात एक होता बीस साल बाद आणि त्यातच एक चित्रपट आला बीस साल पहले… हिट पिक्चरच्याच नावासारखंच आपल्याही पिक्चरचं नाव असावे हीदेखील एक फिल्मी मानसिकता. चित्रपटाच्या जगातील अशा छोट्या छोट्या गोष्टी अगणित.
बीस साल बाद हा विश्वजीतचा पहिला चित्रपट. म्हणजे त्याच्या कारकिर्दीलाही बासष्ट वर्ष झालीदेखील. त्यातील पहिली दहा वर्ष तो टिकून होता हे विशेष आणि मग ’बीस साल बाद’ वगैरे आपल्याच चित्रपटातील गाण्याचा त्याने ऑर्केस्ट्रा काढून त्यात तो गायक झाला आणि बरेच दौरे केले, त्यात शो केले. काही वर्षांपूर्वी एका फिल्मी इव्हेन्टसमध्ये त्याची भेट झाली असता तो बराच फिट्ट वाटला. यावरून त्याला दाद द्यायलाच हवी.
एव्हाना विश्वजीत म्हटल्यावर चित्रपट रसिकांच्या एका पिढीला पटकन बेकरार करके हमे यू न जाईये…, ‘जरा नजरों से कहदो तो…’ (बीस साल बाद), ’पुकारता चला हू मै…’, ‘मेरे हमदम मान भी जाओ, भला मानो बुरा मानो…’ (मेरे सनम), ‘मेरी मोहब्बत पाक मोहब्बत, आ गले लग जा…’ (एप्रिल फूल), ‘नजर ना लग जाऐ, अकेला हू मै…’ (जाल), तुम्हारी नजर क्यू खफा हो गई… (दो कलिया), लाखों है यहा दिलवाले…, आँखो मे कयामत के काजल… (किस्मत), मुझको ठंग लग रही है मुझसे दूर तू न जा… (मै सुंदर हू) अशी साठच्या दशकातील सहज गुणगुणावी अशी गाणी ओठांवर आली असतील. तो काळ श्रवणीय गीत संगीताचा. आणि त्याचा लाभ अशा अनेक नायकांनाही.
विश्वजीत म्हटल्यावर काहींना वहिदा रेहमान (कोहरा), आशा पारेख (मेरे सनम), सायरा बानू (एप्रिल फूल), शर्मिला टागोर (यह रात फिर न आयेगी), माला सिन्हा (नाईट इन लंडन, जाल, दो कलिया), साधना (इश्क पर जोर नहीं), मुमताज (शरारत), बबिता (किस्मत), लीना चंदावरकर (मै सुंदर हूँ), रेखा (दो आँखे, दो शिकारी, अंजाना सफर, कहते है मुझको राजा, मेहमान) अशा आघाडीचा अभिनेत्रींचा तो नायक झाला असा इतका तो भाग्यवान होता हे आठवले असेल. काय भारी प्रगती पुस्तक आहे ना?
चवीचवीने फिल्मी गॉसिप्समध्ये विशेष रस वा रूची घेणार्‍यांना ’अंजाना सफर’च्या सेटवर कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक त्याने रेखाचे चुंबन घेऊन एकच खळबळ उडवून दिली हे आठवले असेल. आजही हा किस्सा गाजतो. पन्नास-बावन्न वर्षांपूर्वी भरल्या सेटवर असं काही करणे म्हणजे भारीच डेअरिंगचे काम होते. कोण होतास तू काय केलेस तू असेही कोणी म्हटलं.
याच गडबडीत विश्वजीतने ’कहते है मुझको राजा’ या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शनही केले. नायकही तोच हे वेगळे सांगायलाच नको. आणि नायिका चक्क रेखा, पण पिक्चर फ्लॉप, कारण विश्वजीत आता चलनी नाणे नव्हता. मग त्याने ’रॉकी’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली. ट्रेड पेपर्समध्ये जाहिरात दिली. प्रमुख भूमिकेत अमिताभ बच्चन व रेखा. एका गोष्टीचे उत्तर कधीच मिळाले नाही, रेखाच्या गुड बॉक्समध्ये विश्वजीत कसा आणि का? हा चित्रपट घोषणेपलिकडे गेलाच नाही, पण सुनील दत्तने काही वर्षांनी संजय दत्तसाठी ’रॉकी’ हे नाव विश्वजीतकडून घेतले.
नायक म्हणून सद्दी संपल्यावर विश्वजीतने आनंद और आनंद, जिगरवाला, साहेब, अल्लारखा वगैरे चित्रपटात चरित्र भूमिका साकारल्या. एव्हाना चित्रपट रसिकांची आणि मीडियातीलही पिढी बदलली होती. त्यांना
काय माहीत साठच्या दशकात विश्वजीत टॉपच्या अभिनेत्रींचा हीरो होता आणि त्याची सुरुवात बीस साल बाद ने झाली…

-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply