नाशिक ः प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्रात वादळी वार्यासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या सूचनेनंतरच शेतकर्यांनी पेरण्या करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
8 जून रोजी केरळात मान्सूनचे आगमन झाले असून, 14 जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे, मात्र राज्यातील उर्वरित भागांत मान्सूनच्या आगमनाला विलंब होऊ शकतो. 11 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बर्याच भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल. काही भागांमध्ये दुपारनंतर मान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस पडेल. राज्यातील बहुतांश भागात किमान 15 जूनपर्यंत तरी मान्सूनचे आगमन अपेक्षित नसल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस सलग पडत नाही. या काळात तापमान अधिक राहणार असल्यामुळे शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये. हवामान खात्याच्या सल्ल्यानुसारच पुढचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. याचबरोबर वादळी पावसादरम्यान लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
यंदा पाऊस उशिरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी घाई न करता शासनाच्या माहितीचा तसेच एसएमएस सेवेचा लाभ घ्यावा. त्यामुळे दुबार पेरणीची शेतकर्यांवर वेळ येणार नाही. यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या माहितीच्या आधारावरच शेतकर्यांनी पेरण्या कराव्यात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शेतकर्यांना सूचित केले आहे.