Breaking News

‘जय संतोषी माँ’ 49; सुपर हिटचा सर्वकालीन बहुचर्चित चमत्कार….

पिक्चरच्या जगात सुपर हिट, मेगा हिट फिल्मची कोणतीही रेसिपी, तराजू, थर्मामीटरम कॅल्क्युलेटर, लॅपटॉप नाही. जगातील कोणताही ज्योतिषी कशीही कुठलीही कुंडली मांडून पिक्चर सुपर हिटसाठी हा मुहूर्त हुकमी आहे असे सांगू शकत नाहीत. तरीही अनेक फिल्मवाल्यांची शुभ तारीख, शुभ शब्द यावर श्रद्धा (कधी अंधश्रद्धाही) असतेच, आणि तीही असावी.
पिक्चरचं भवितव्य पब्लिकच्या हातात (मनात, आवडीत) असते. त्यांना आवडलेल्या पिक्चरला हाऊसफुल्ल गर्दी हुकमी आणि त्यांना न आवडलेल्या पिक्चरला रिकाम्या खुर्च्यांना दाखवावा लागतो. तरी रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले न आवडणारा आणि सतिश कौशिक दिग्दर्शित ’रूप की रानी चोरों का राजा ’ चक्क आवडलेला एखादा पब्लिक भेटतोच. एक्स्युझिव्हज म्हणतात ते हेही असावे. आजच्या ग्लोबल युगातील कार्पोरेट सिस्टीममध्ये कोणाच्या तरी स्मार्ट माईंडमध्ये येते, पिक्चर सुपर हिटचा हुकमी फॉर्मुला आहे. आम्हाला तो गवसलाय. त्यांना वाटतं, पिक्चर सुपर हिटचं गणित कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटरवर मांडता येते. त्यांना हे का माहीत नाही की, पब्लिकच्या माईंडमध्ये, आवडीत पिक्चर हिटचं रहस्य आहे. सदियो से यही सच चलता आ रहा है.
’जय संतोषी माँ’बद्दल पिक्चर आवडला की नाही हा प्रश्नच कधी येत नाही. त्याच्या यशाचीच आजही म्हणजे या चित्रपटाच्या प्रदर्शनास 49 वर्षे पूर्ण झालीदेखील तरी होतेय. मुंबईत हा चित्रपट 30 मे 1975 रोजी एखाद्या सर्वसाधारण पौराणिकपट वा भक्तीपटाप्रमाणे प्रदर्शित झाला. तो काळ मेन थिएटरचा फंडा भारी महत्त्वाचा असण्याचा होता. मल्टीप्लेक्स कल्चरपूर्वी हा मेन थिएटर खेळ फार रंजक होता. दक्षिण मुंबईतील जवळपास प्रत्येक चित्रपटगृहाला मेन थिएटरची अधिकृत म्हणा वा अनधिकृत म्हणा, पण परंपरागत मान्यता होती. संतोषीमाता अलंकार (भेंडी बाजार) चित्रपटगृहात मॅटीनी शोला आणि त्यासह सुपर (ग्रँड रोड), एडवर्ड (धोबी तलाव), किस्मत (प्रभादेवी) इत्यादी अनेक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्या काळात टप्प्याटप्प्याने (काही शुक्रवारच्या अंतराने) देशभरातील विविध भागातील चित्रपटगृहात चित्रपट पोहचे. त्यात बराच काळ लागे. अनेक चित्रपट तोपर्यंत त्यातील लोकप्रिय गाण्यांची तबकडी, रेडिओ विविध भारती, रेडिओ सिलोन, वाद्यवृंद, सणासुदीचा लाऊडस्पीकर यावर ऐकायला मिळून हिट होत.
आजच्या डिजिटल पिढीला कदाचित ’जय संतोषी माँ’ या चित्रपटाचे महत्व माहित नसेल, पण सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात या चित्रपटाने फार मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक यश प्राप्त करतानाच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, माध्यम, आर्थिक क्षेत्रातही बराच प्रभाव दाखवला. त्यावरून अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. ग्रामीण भागात चित्रपटगृहाबाहेर चपला काढून हा चित्रपट पाह्यला प्रेक्षक जातात अशी आणि आणखीही बातम्या होत्या. कोणी सलग सोळा शुक्रवार हा चित्रपट अनवाणी पाहिला. या चित्रपटाचे खणखणीत यश अनेकांना अचंबित करणारे होते. या चित्रपटात संतोषीमातेची भूमिका अनिता गुहा यांनी साकारली, तर संतोषी मातेची भक्त कानन कौशल यांनी साकारली. (त्यांचे खरे नाव इंदुमती पैगंणकर. हिंदीसाठी त्यांनी नाव बदलले. मराठीतील त्या नामवंत अभिनेत्री) तर आशिशकुमार, भारत भूषण, बेला बोस, रजनीबाला, लीला मिश्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे निर्माते सतराम रोहरा असून दिग्दर्शन विजय शर्मा यांचे आहे. प्रदीप यांच्या गीताना सी. अर्जुन यांचे संगीत आहे. या चित्रपटातील मै तो आरती उतारू रे… हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. विशेष म्हणजे तेव्हापासून आजही गरब्यात या गाण्याला प्राधान्य दिले जाते. लोकप्रिय गाण्यांमुळे एका पिढीतील चित्रपट पुढील जात राहतो याचे हेही एक उदाहरण. या चित्रपटाच्या जबरदस्त क्रेझनंतर खूपच मोठ्या प्रमाणावर भक्तीपटांची लाट आली, अनेक देव देवता पडद्यावर आले वा आणले, पण जय संतोषी माँ या चित्रपटासारखे यश अन्य कोणत्याही पौराणिक चित्रपटाला प्राप्त झाले नाही. चमत्कार एकदाच होतो. आणि तो अनपेक्षित असतो म्हणून तर त्यात रस, रंजकता असते.
पिक्चर बघाल तर अतिशय साधे कथानक आणि तशीच त्याची अतिशय साधीच मांडणी. बरं कला दिग्दर्शन (सेटस) फार दर्जेदार आहेत, निर्मिती मूल्ये उंची आहेत, चित्रपटाची पोस्टर आकर्षक आहेत, चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी खर्चिक आहे असे काहीही नव्हते. ते गरजेचे वाटले नाही. मला आठवतंय, सत्तरच्या दशकाची सुरुवात राजेश खन्नाच्या अक्राळविक्राळ क्रेझची होती. माझे ते शालेय वय होते. गिरगावातील काही केशकर्तनालात राजेश खन्नाचा फोटो होताच पण ’डिट्टो’ (हुबेहूब. सेम टू सेम) राजेश खन्ना दिसण्याचाही ’आनंद’ घेणारे कोणी निकतवरी लेन वा मुगभाटात दिसत असे. प्रकाश मेहरा दिग्दर्शित ’जंजीर’ (मुंबईत रिलीज 11 मे 1973)मधील अमिताभ बच्चनचे अ‍ॅन्ग्री यंग मॅनचे वादळ आले आणि वातावरण बदलत गेले. यश चोप्रा दिग्दर्शित ’दीवार’ (मुंबईत रिलीज 24 जानेवारी 1975)पासून तर ’अमिताभ पर्व’ वेग घेऊ लागले. गुलजार दिग्दर्शित ‘आंधी’ (मुंबईत रिलीज 14 फेब्रुवारी 1975) बौध्दिक मनोरंजन दिले. राज खोसला दिग्दर्शित ’प्रेम कहानी’ (7 मार्च 1975)ची गाणी आजही लोकप्रिय आहेत, पण पिक्चर केव्हाच फ्लॉप. मग त्या 1975 सालीच रवि चोप्रा दिग्दर्शित ’जमीर’ (21 मार्च), हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ’चुपके चुपके’ (11 एप्रिल), के. एस. सेतुमाधवन दिग्दर्शित ’ज्युली’ (18 एप्रिल), ब्रीज दिग्दर्शित ’चोरी मेरा काम’ (2 मे) इत्यादी अनेक चित्रपट प्रदर्शित होत होत ’जय संतोषी माँ’ पडद्यावर आला. एक लक्षात आलं की, विविध थीमवरील चित्रपटांच्या वातावरणात संतोषीमाता चित्रपट आला आणि चमत्कार झाला. मूकपटाच्या काळापासून पौराणिक गोष्टी आपल्या चित्रपटात आल्या. याचं कारण, समाजाच्या मनात देव देवतांविषयीची श्रद्धा आणि त्यांना ज्ञात असलेल्या रामायण व महाभारत यातील गोष्टी. पूर्वी खूपच मोठ्या प्रमाणावर पौराणिक अथवा भक्तीपट निर्माण होत. त्यातील अनेक चित्रपट रसिक भक्तीभावनेने पहात. ’जय संतोषी माँ’ याच वाटचालीतील हायपॉईंट. काही भक्त प्रत्येक शुक्रवारी हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहत. काही छोट्या शहरात पडद्यावर मै तो आरती उतारू रे गाणे सुरू होताच प्रेक्षक उभे राहून त्यात रममाण होत. यालाच म्हणतात चित्रपटाची क्रेझ.
आपल्याकडच्या चित्रपट संस्कृतीच्या वाटचालीच्या वैशिष्ट्यांतील एक म्हणजे, बरेचसे चित्रपट पडद्यावरून उतरले तरी ते कोणत्या ना कोणत्या रूपाने चर्चेत राहतात. कधी काळी गच्ची, गॅलरी, नाका, अड्डा, कट्टा, इराणी हॉटेल, कॉलेज कॅन्टीन अशा ठिकाणी ’पिक्चरवर त्यातील कलाकाराच्या अभिनयापासून गीत संगीतापर्यंत सर्वांगीण होणारी चर्चा’ आता सोशल मीडियात होते. त्यात जास्त मत स्वातंत्र्य घेतले जाते. कधी एकादी प्रतिक्रिया सवंगही असते. काळ मागे पडत जातो, चित्रपट रसिकांची सतत नवीन पिढी येत असते, नवीन माध्यमे येत असतात, पण या प्रवासात काही गोष्टी कॉमन असतात. जी.पी. सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित ’शोले’ आणि सतराम रोहरा निर्मित व विजय शर्मा दिग्दर्शित ’जय संतोषी मा’ यांच्या भन्नाट यशाची तुलना. दोन्ही चित्रपटांचे स्वरुप भिन्न. ’शोले’वर हिंसक चित्रपट म्हणून टीका झाली तर ’संतोषी माँ’ या चित्रपटाला त्या काळातील बुध्दीजीवीवर्गाने भाकडकथा म्हटले. दोन्ही चित्रपटांना तात्कालिक समीक्षकांनी झोडपले, पण पब्लिकने डोक्यावर घेतले. संतोषी मा चित्रपटाची सामाजिक क्रेझ व गल्ला पेटीवर पकड बसल्यावर 15 ऑगस्ट 1975 रोजी ’शोले’ प्रदर्शित झाला. (गुगलवर हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झालेत असा असलेला संदर्भ चुकीचा आहे. संतोषी माँ चित्रपट 30 मे 1975 रोजी प्रदर्शित झाला.) दोन्ही चित्रपटांची त्या काळात सगळीकडेच चर्चा. दोन्हीबद्दल कथा, किस्से, दंतकथा, गोष्टी भरपूर आणि एकदा का कोणताही चित्रपट प्रेक्षकांच्या तोंडी आला, त्याची माऊथ पब्लिसिटी होऊ लागली की त्याची लोकप्रियता मुरत मुरत जाते.
चित्रपटाचा दर्जा आणि त्याचे यश यांचा थेट संबंध असतोच असे नाही, पण पिक्चरच्या जगात यश हेच एकमेव चलनी नाणे असते आणि म्हणूनच या यशाचे नाणे कायमच चलनी असते.

-दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply