अलिबाग ः रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी हे जनतेच्या हितासाठी सदैव कटिबद्ध असतात. अशाच प्रकारे मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी शुक्रवारी (दि. 26) रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या अलिबाग येथील दालनात बैठक घेतली. या वेळी सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीस जि.प.चे सीईओ डॉ. भरत बास्टेवाड, अतिरिक्त मुख्याधिकारी सत्यजित बडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भालेराव यांच्यासह विविध संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी प्रामुख्याने उरण तालुक्यातील पुनाडे धरण दुरुस्ती, साई (ता. पनवेल) येथील जलसंधारण विभागाच्या जागेत नवीन धरण बांधणे, उरण विधानसभा क्षेत्रातील क वर्ग पर्यटन व ब वर्ग पर्यटन ठिकाणांची निश्चिती करणे आणि जल जीवन मिशन योजनेचा आढावा घेणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पुनाडे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना या योजनेवर केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत काम प्रगतिपथावर आहे. या योजनेंतर्गत येणार्या अडचणी सीईओ डॉ. भरत बास्टेवाड यांनी समजावून घेतल्या व मुख्य जलवाहिनी आठ दिवसांत जोडण्याबाबत एमजीपीच्या अधिकार्यांना आदेश दिले. त्याचबरोबर योजना फायनान्शिअल अडचणीत आहे हे लक्षात आल्यानंतर योजनेंतर्गत समाविष्ट असलेले सोलर प्लॅन लवकरात लवकर बसवण्याबाबत निर्देश देण्यात आले. त्याचबरोबर विविध गावांमध्ये इएसआर पूर्ण करण्याबाबत तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम व त्यामध्ये असणार्या अडचणी दूर करून लोकांना हेटवणे ट्रीटमेंट प्लांटमधून मिळणार पाणी मिळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आदेश देण्यात आले.
या योजनेतील मुख्य अडचण नळ जोडण्याची होती. याबाबत जि.प.च्या डेप्युटी इंजिनियरने दिलेल्या माहितीनुसार नळजोडणीला निधी उपलब्ध नाही. त्यावर उपाय म्हणून साधारणतः तीन कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन या वेळी आमदार महेश बालदी यांनी दिले. या योजनेत विशेष बाब म्हणून पुनाडे धरणाला असलेली लिकेज साठवण क्षमता वाढवण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबतही चर्चा करण्यात आली व त्यासाठीदेखील लागणारा निधी उपलब्ध करून देण्याबाबत आमदारमहोदयांनी पाणीपुरवठा कमिटीला आश्वासित केले आहे.
योजना जन्माला आल्यापासून आवरे ग्रामपंचायत हद्दीतील कडापे पाड्याला पाणी पोहचलेले नाही, ही बाब युवा कार्यकर्ते धनेश्वर गावंड यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिली. याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. एकंदर एमजेपीचे डेप्युटी इंजिनिअर जगताप, जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. वेंगुर्लेकर यांच्यासह या बैठकीत गुरूनाथ गावंड, जीवन गावंड, वशेणी सरपंच अनामिका यांनी भाग घेतला. सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे मिळाल्याने पाणी कमिटीने आमदार महेश बालदी यांचे आभार मानले. या वेळी इतर विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली.
Check Also
उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …