अजय देवगनचा पहिला डबल रोल
हिंदुस्तान की कसम म्हणताक्षणीच रसिकांच्या किमान तीन पिढ्यांना बुजुर्ग दिग्दर्शक चेतन आनंद यांचा 1971च्या भारताच्या सैनिकांनी युध्दभूमीवर पाकिस्तानचा जबरदस्त पाडाव केला त्यावरचा 1973चा चित्रपट पटकन डोळ्यासमोर येतोच. हेदेखील या चित्रपटाचे यश.
चेतन आनंद यांनी 1962 सालच्या भारताच्या चीनविरुध्दच्या युध्दातील विजयावर निर्मित व दिग्दर्शित केलेल्या हकिकत (1964) या चित्रपटाने समिक्षक व रसिकांना कमालीचे प्रभावित केल्याने त्यांच्या युध्दपटाबाबत कमालीची विश्वसनीयता वाढली. त्या काळात तांत्रिकदृष्ट्या फारशी प्रगती नसतानाही या चित्रपटातील युध्द कमालीचे प्रभावी होते. चित्रपट कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट असूनही त्याचा रंग काही वेगळाच होता. अब तुम्हारे हवाले वतन साथियों हे स्फूर्तिदायक गाणे आठवले तरी अंगावर रोमांच उभे राहते.
‘हिंदुस्तान की कसम’ची कैफी आझमीची गाणी व मदन मोहनचे संगीत हे तर अप्रतिम. हर तरफ अब यही अफसाने है (पार्श्वगायक मन्ना डे), है तेरे साथ मेरी वफा (लता मंगेशकर) ही क्लासिक गाणी अगदी आवर्जून वेळ काढून ऐकावी. चित्रपटात राजकुमार, प्रिया राजवंश इत्यादींच्या प्रमुख भूमिका. हा चित्रपट हकिकत इतका प्रभावी नव्हता, त्यामुळेच यशाला मर्यादा पडल्या. तरी हिंदुस्तान की कसम म्हटलं की चेतन आनंदचा चित्रपट ही ओळख कायम. तेच तर महत्वाचे.
तसं तर एकाच नावाचा चित्रपट पुन्हा पुन: निर्माण होणे नवीन नाही. थीम तशी असेल तर तसे नाव ठेवावे. अजय देवगननने आपले पिता वीरु देवगन यांच्या चित्रपट दिग्दर्शनाच्या स्वप्नपूर्तीसाठी याच नावाचा चित्रपट निर्माण व वितरीत केला. या हिंदुस्तान की कसम (मुंबईत रिलीज 23 जुलै 1999)च्या प्रदर्शनास यशस्वी पंचवीस वर्ष पूर्ण झाली. वीरु देवगन हे खरं तर मारहाण दिग्दर्शक. (अॅक्शन मास्टर). सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटात ढिश्यूम ढिश्यूम वाढली तस तसे मारहाण दिग्दर्शकाला महत्व आले. त्यांची टीम तयार झाली. आणि त्यात वीरु देवगन आघाडीचे नाव झालेदेखिल. अशा मारहाण दिग्दर्शकाचा मुलगा अजय देवगनने आपल्या रुपेरी पदार्पणातील चित्रपटात कुकू कोहली दिग्दर्शित फूल और कांटे (1992)मध्ये पॉवरफुल्ल क्शनबाज गुंडा हीरो साकारला आणि चित्रपट सुपरहिट झाल्याने त्याला तीच इमेज चिकटली यात आश्चर्य ते काय? चित्रपटाच्या जगात यश आणि इमेज या एकाच चलनी नाण्याच्या दोन बाजू. प्रत्येकाला हे नाणे हवेय. कोणाला वाटते गुणवत्तेने मिळेल, कोणाला वाटते नशिबाने मिळते
अजयला या इमेजबाहेर पडायला संजय लीला भन्साली दिग्दर्शित हम दिल दे चुके सनम (1999)पर्यंत वाट पहावी लागली. ते फळले त्याला. तोपर्यंत अजय चित्रपट निर्माता व वितरकही झाला. स्वतःची अजय देवगन एन्टरटेन्मेन्ट ही चित्रपट वितरण संस्था स्थापन केली. चित्रपट व्यवसायिंकांचे जणू मार्केट असलेल्या ग्रँड रोड परिसरातील नाझ चित्रपटगृहातील वितरकांच्या कार्यालयात आपलेही कार्यालय सुरू केले. (त्याने बसंत पिक्चरच्या कार्यालयात आपले कार्यालय थाटले हे मी नाझमध्ये त्या काळात अनेकदा जायचो तेव्हा पाहिलं.). इतकेच नव्हे तर तो नाझमध्ये एकदा आपल्या कार्यालयात आला त्याची बातमी झाली. आपला चित्रपट जनसामान्यांपर्यंत कसा पोहचतो, त्याची वितरण करण्याची पध्दत काय, चित्रपटगृहाचे प्रदर्शक कशा पध्दतीने आपल्या थिएटरात चित्रपट प्रदर्शित करतात हे अनेक कलाकारांनी थोडे फार जाणून घ्यायला काहीच हरकत नाही. आपण ज्या व्यवसायात आहोत, घडतोय, वाढतोय, आपल्याला राह्यचेय त्यात अवतीभवती पाहणे वा असणे व्यक्तिमत्व विकासात महत्वाचे. स्टारने चित्रपट वितरणात उतरणे हीदेखील एक परंपरा. आशा पारेख व नासिर हुसेन यांचे जेम्स मुव्हीज, दिग्दर्शक शक्ती सामंता व राजेश खन्नाचे शक्तीराज फिल्म, विनोद मेहरा व विनोद खन्नाची कमला फिल्म, अमिताभ बच्चनची थनिक फिल्म ही काही उल्लेखनीय उदाहरणे.
हिंदुस्तान की कसम वीरु देवगन यांनी दिग्दर्शित केला पण पिक्चर फारसा रंगला नाही. मारहाण दिग्दर्शक असणे आणि संपूर्ण चित्रपट पेलणे यात बराच फरक. तो समजला नसावा. जनक व ह्रदय यांच्या पटकथेवर हा चित्रपट बनला. तन्वीर खानचे संवाद होते. अजय देवगनची दुहेरी भूमिका हे विशेष. पण गोष्टीत रंगतता नाही..अजय व जय मल्होत्रा (दोन्ही अजय देवगन) लहानपणी हरवतात. एक हिन्दुस्तानात सैन्यात भरती होतो तर दुसरा पाकिस्तानात दहशतवादी. त्याचे नाव तौहिद असे ठेवले जाते. हे दोघे एकमेकांविरुध्द लढतात. त्या काळात पाकिस्तान कश्मीरमध्ये बर्याच कुरापती करीत असे आणि भारतीय सैन्य त्यांना अद्दल घडवे, आणि कश्मीर सीमेवरचा वाढता दहशतवाद आणि त्याचा कणखरपणे होणारा पाडाव हे होत होते. अनेक हिंदी चित्रपटातून हे बर्या-वाईट प्रमाणात येत असे. मणि रत्नम दिग्दर्शित रोजा असो वा अनिल शर्मा दिग्दर्शित एलान ए जंग असो, सीमेवरील दहशतवादाचा पाडाव वेगवेगळ्या प्रकारे रुपेरी पडद्यावर येत राहिला. हिंदुस्तान की कसम हा त्यातला एक युद्धपट.
अमिताभ बच्चनने वीरु देवगन यांच्यासाठीच हा चित्रपट स्वीकारला. त्या दिवसात त्याच्या मृत्यूदाता, कोहराम, लाल बादशाह, सूर्यवंशम अशा चित्रपटांचे पुरते हंसे होत होते. हे चित्रपट अगदीच सामान्य. अमिताभसाठी चांगली पटकथा व संवाद लिहिले जात नाहीत हे आश्चर्याचे ठरत होते. अमिताभची चित्रपटाची निवड चुकत होती. त्यातून त्याला कौन बनेगा करोडपती (पहिला सिझन 2000) व यश चोप्रा निर्मित व आदित्य चोप्रा दिग्दर्शित मोहब्बते (दिवाळी 2000 रिलीज) यांच्या यशाने.
हिंदुस्तान की कसममध्ये अमिताभसमोर नवीन निश्चल दुय्यम भूमिकेत होता आणि त्याचा किस्सा झाला. ज्योती स्वरुप दिग्दर्शित परवाना (1972)मध्ये नवीन निश्चल नायक तर अमिताभ खलनायक होता. आणि चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीच्या फोटो सेशनच्या वेळेस आपण व योगिता बाली यांना जास्त फोकस केले जावे, अमिताभला कमी स्पेस मिळावी म्हणून नवीन निश्चलने त्याला जास्त महत्व दिले नाही यावर बरेच गॉसिप्स झाले. मनमोहन देसाई दिग्दर्शित देशप्रेमी (1979)त अमिताभ दुहेरी भूमिकेत तर नवीन निश्चल किरकोळ भूमिकेत हा प्रकार.
चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील अनेक छोट्या छोट्या गोष्टींसह प्रवास सुरू असतो. त्याची दखल घेण्याची अशी संधी मिळत राहते. हिंदुस्तान की कसम मध्ये मनिषा कोईराला, सुष्मिता सेन, फरिदा जलाल, कादर खान, प्रेम चोप्रा, शक्ती कपूर, प्रमोद माऊथो, गोगा कपूर, अर्जुन, काश्मीरा शाह यांच्या प्रमुख भूमिका. आनंद बक्षींची गीते व सुखविंदर सिंग यांचे संगीत.
दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांच्या भव्य कॅनव्हास असलेल्या चित्रपटाचे छायाचित्रणकार इश्वर बिरदी यांचे छायाचित्रण उत्तम आणि संकलक सुरेश चतुर्वेदी यांनी गतीही उत्तम ठेवली… काही असो, हिंदुस्तान की कसम म्हणताक्षणीच एकावन्न वर्षापूर्वीचा दिग्दर्शक चेतन आनंदचाच चित्रपट आठवतो. त्याचा ठसा तसा उमटला होता आणि तोच तर महत्वाचा असतो…
– दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक