Breaking News

जासई येथे 1 सप्टेंबरला भव्य आगरी समाज मेळावा

नियोजन सभा उत्साहात

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
अखिल आगरी समाज परिषदेतर्फे 1 सप्टेंबर रोजी उरण तालुक्यातील जासई येथील दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील सभागृहात भव्य आगरी समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील शेतकरी समाज हॉलमध्ये शनिवारी (दि. 17) नियोजन सभा झाली. अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सल्लागार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, उद्योगपती जे.एम.म्हात्रे, कार्याध्यक्ष जे.डी. तांडेल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली.
आगरी समाजाच्या सध्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थितीचा विचार करून सामूहिक संघटनेच्या बळावर काही ठोस कार्यवाही करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी अखिल आगरी समाज परिषदेतर्फे समाजातील लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि समाज बांधव, भगिनींचा भव्य मेळावा 1 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता जासई येथील लोकनेते दि. बा. पाटील सभागृहात आयोजित
करण्यात आला आहे.
आगरी समाज काल, आज आणि उद्या या आशयाखाली होणार्‍या या मेळाव्यात नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा आणि खासदार संजय दिना पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी गावठाण विस्तार सिमांकन वाढवणे, क्लस्टर योजना, स्वातंत्र्यानंतर औद्योगिकीकरणासाठी भुमिपूत्रांच्या जमिनी संपादन केल्यामुळे बेरोजगारीत झालेली वाढ, जातवार जनगणना झालीच पाहिजे, ओबीसी आरक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष, नैना प्रकल्प, रेती व्यवसाय, विमानतळ नामकरण, नोकर्‍या, पाणथळ जमीन, उल्हास नदी पूर नियंत्रण रेषा या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील कोपरखैरण्यात नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि संजीव नाईक यांनी मेळाव्याबाबत मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले तसेच आपल्या आगरी समाजाने पक्षीय मतभेद बाजूला सारून संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या नियोजन सभेस परिषदेचे सरचिटणीस दीपक म्हात्रे, डी.बी. पाटील, संतोष केणे, शरद म्हात्रे, दीपक पाटील, अ‍ॅड. पी.सी. पाटील, संतोष घरत, विजय गायकर, चंद्रकांत पाटील, रघुनाथ पाटील, डॉ. यशवंत, सुरेश पाटील, वासुदेव भोईर, प्रकाश भोईटे आदी उपस्थित होते. या वेळी भूमिपुत्रांच्या लेखी समस्या तसेच निवेदने कमिटीपुढे सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी जे.डी. तांडेल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून 1 सप्टेंबरच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply