पनवेल : बातमीदार
पनवेल तालुक्यातील उमरोली पुलावरून पत्नीसोबत दुचाकीवरून जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने गाढी नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या सारिका आंब्रे यांचा मृतदेह गुरुवारी (दि. 17) तब्बल नऊ दिवसांनी बेलापूर खाडीत सापडला. आदित्य आंब्रे व सारिका आंब्रे हे दाम्पत्य 9 जुलैला दुचाकीसह वाहून गेले होते. बॉर्डर सिक्युरिटी कल्याण ग्रुप, एनडीआरएफ पुणे, सिडको अग्निशमन दल, पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयामार्फत शोधमोहीम राबविण्यात आली होती. 11 जुलै रोजी आदित्य आंब्रे याचा मृतदेह जुई कामोठे येथे सापडून आला होता, मात्र सारिका आंब्रे बेपत्ताच होत्या. 12 जुलै रोजी संध्याकाळी शोधमोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर गुरुवारी नऊ दिवसांनी सारिका यांचा मृतदेह बेलापूर येथील खाडीकिनारी आढळला. पोलिसांनी हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
दिला आहे. पनवेल तहसीलदार कार्यालयातर्फे मृतांच्या नातेवाईकांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत चार लाख रुपयांची मदत करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अमित सानप यांनी दिली.