पनवेल : वार्ताहर
खारघर येथे रस्त्यावरील किरकोळ भांडणातून 45 वर्षीय आयटी अभियंता शिवकुमार शर्मा यांची दोघांनी डोक्यात हेल्मेटचे घाव घालत हत्या केली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. एक आठवड्यापासून हत्या करणारे आरोपी फरार होते, मात्र यापैकी एका आरोपीला पकडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे.
रेहान शेख (वय 20) नामक आरोपीला पोलिसांनी पकडले असून दुसरा आरोपी फैजान शेख (वय 20) हा अद्याप फरार आहे. दोघेही अनुक्रमे नागपाडा आणि आग्रीपाडा येथे राहणारे होते. दोघेही डिलिव्हरी बॉयचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
3 फेब्रुवारी रोजी खारघर येथे ओव्हर टेक करण्याच्या वादातून रात्री 8.30 वाजता दोन्ही आरोपींनी शर्मा यांची डोक्यात हेल्मेटचे घाव घालून हत्या केली. यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर शर्मा स्वतः दुचाकी घेऊन खारघर पोलीस ठाण्यात पोहचले. तिथे त्यांनी मारहाण झाल्याची माहिती दिली, मात्र पोलीस ठाण्यात ते अचानक कोसळून पडले. पोलिसांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले, पण तिथे पोहचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आरोपींनी मारहाण केल्यानंतर शर्मा यांना बाहेरून काही इजा झाल्याचे दिसले नव्हते. त्यानंतर आरोपी खारघर येथे आयोजित केलेल्या मुस्लीम समुदायाच्या समारंभाला गेले. तिथून रात्री 10.30 वाजता ते घरी गेले. दरम्यान, दुसर्या आरोपीचा शोध पोलिसांच्या विविध पथकामार्फत सर्वत्र सुरू आहे.
Check Also
नमो चषक फुटबॉल स्पर्धेत एसएसएफए बी संघाची किक सरस
पनवेल : रामप्रहर वृत्तउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे येथील विधानसभा मतदारसंघात …