पनवेल : रामप्रहर वृत्त
नमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या संघाला एक लाख 11 हजार 111 रुपये व भव्य चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत उपविजेता वहाळ संघ, तर तृतीय क्रमांक वळवली संघाने मिळवला. मालिकावीर वळवलीचा सुयोग म्हात्रे, उत्कृष्ट फलंदाज वहाळचा प्रयास कोळी, उत्कृष्ट गोलंदाज वहाळचा घनश्याम पाटील, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक भिंगारीचा सूरज परदेशी ठरला.
भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे येथील विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025चे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत खारघरमधील सेक्टर 14 येथील जय हनुमान चेरोबा बापदेव मैदानावर प्रवीण स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशनच्या संयोजनाखाली भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा दिवस-रात्र या स्वरूपात खेळविण्यात आली.
या स्पर्धेतील उपविजेत्या संघाला 55 हजार 555 रुपये, तृतीय क्रमांकाच्या संघास 33 हजार 333 रुपये तसेच मॅन ऑफ दि सिरीजला मोटारसायकल अशा भरघोस पारितोषिकांसोबतच दररोज प्रेक्षकांसाठी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये एकूण चार सायकल बक्षीस देण्यात आल्या.
या स्पर्धेत कानपोली, दापोली, मुर्बी, पेठ, बामणडोंगरी, कुंडेवहाळ, कामोठे, ओवळे, बापदेव पोदी, भैरवनाथ विचुंबे, स्व. महादेव पेठाली, अथर्व इलेव्हन घोट, गावदेवी भाताणपाडा, हिमांशू वळवली, मंगलमूर्ती घरकुल, जय हनुमान नावडे, यंगस्टार वहाळ, जिवा इलेव्हन पेंधर, धाकटा खांदा, शनिकृपा कोपरा, शिवशक्ती खारघर, श्रीराम शिरढोण, उलवा आणि ओम साई भंगारपाडा या नामवंत 24 संघांचा सहभाग होता. स्पर्धेचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध झालेली ही स्पर्धा खेळाडू तसेच क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी ठरली.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …