Breaking News

नशेच्या विळख्यात तरुणाई

शाहरूख खान याचा पुत्र एनसीबीच्या जाळ्यात अडकल्याचे वृत्त निश्चितपणे टीआरपी खेचणारे आहे, त्यामुळे या प्रकरणाला नको तितकी प्रसिद्धी मिळाली. आर्यन खान अमलीपदार्थांच्या प्रकरणात दोषी असेल तर त्याला सजा मिळायलाच हवी. कायदा हा सर्वांसाठी समान असतो. लोकप्रिय अभिनेत्याचा पुत्र म्हणून त्याला न्यायालय सवलत देऊ शकत नाही हे सार्‍यांनाच माहीत आहे. तथापि दोषी ठरण्याआधी एखाद्याला सुळावर चढवणेही थांबले पाहिजे. गेले दोन दिवस प्रसिद्धीमाध्यमांमध्ये आणि समाजमाध्यमांवरही सतत अमली पदार्थांच्या संदर्भातील चर्चा सुरू आहे. ही चर्चा कुठल्याही सुजाण नागरिकाला निश्चितच अस्वस्थ करणारीच वाटेल. गेल्या वर्षी 14 जून रोजी सुशांतसिंह राजपूत या गुणी अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण माध्यमांमध्ये असेच मोठमोठे मथळे घेऊन गेले. सुशांतसिंह याने खरोखर आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याबाबतचा छडा अजूनही तपास यंत्रणांना लागलेला नाही. सुशांतसिंहच्या गूढ मृत्यू प्रकरणी यथेच्छ राजकारण झाले. किंबहुना, ते अजूनही चालूच आहे. सुशांतसिंह राजपूत जीवानिशी गेला, परंतु त्या निमित्ताने बॉलीवूडमधील अनेक भानगडी-कुलंगडी बाहेर आल्या. त्यापैकी सर्वाधिक चर्चिला गेलेला मुद्दा होता तो अमली पदार्थांच्या सेवनाचा. हिंदी चित्रपटसृष्टीतील तारेसितारे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. प्रसिद्धीचे वलय आणि पैसा अल्पावधीतच त्यांच्या पायाशी लोळण घेऊ लागतो. आपला लाडका नायक किंवा नायिका कसे जगतात, कसे राहतात याबद्दल सिनेरसिकांमध्ये कायमच उत्सुकता असते. सितार्‍यांची आलिशान राहणी भयंकर व्यसनांना आणि स्वैर जगण्याला प्रोत्साहन देणारी ठरते हे उघडेवागडे सत्य आहे. कित्येक नामवंत अभिनेते व अभिनेत्री मद्याच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त झालेले आपण ऐकून आहोत. त्यात आता अमली पदार्थांची भर पडली आहे. याला नव्या युगाचे देणे म्हणावयाचे किंवा काय हे ज्याचे त्याने ठरवावे. तरुण पिढीमध्ये विशेषत: तरुणींमध्ये एकेकाळी प्रचंड लाडक्या असणार्‍या सुप्रसिद्ध सुपरस्टार शाहरूख खान याचा ज्येष्ठ पुत्र आर्यन याला अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) अधिकार्‍यांनी शनिवारी ताब्यात घेतले. कॉर्डेलिया एम्प्रेस या आलिशान क्रूझवरील रेव्ह पार्टीत सामील झालेला आर्यन आणि त्याच्या दोस्तांना एनसीबीच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडल्याचे सांगितले जात आहे. गेले दोन दिवस आर्यन खान एनसीबीच्या कोठडीत असून या चौकशीमधून बरेच काही उघडकीस येईल, असेही सांगितले जाते. अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढण्यासाठीच एनसीबीसारख्या तपासयंत्रणा काम करत असतात. त्यांना मदत होईल असे सर्वांचेच वर्तन असायला हवे, परंतु दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. लाडक्या सितार्‍याला कोवळी तरुण पिढी आपला आदर्श मानत असते हे ओळखून संबंधित सितार्‍यानेच आपले वर्तन आणि वाणी यांचे प्रगल्भ प्रदर्शन करावे, अशी अपेक्षा आहे. बॉलीवूड हे प्रसिद्धीमाध्यमांसाठी तुलनेने दुबळे लक्ष्य म्हणावे लागते. कोणीही कितीही चिखलफेक केली तरी बॉलीवूडमधली मंडळी फारसा आक्षेप घेत नाहीत. बदनामीमध्ये देखील लौकिक असतोच असे सर्वसाधारणपणे मानणारी चित्रपटसृष्टी तशी जाड कातड्याचीच म्हणायची. असे असले तरी तपासामधून ठोस माहिती बाहेर आल्याशिवाय त्यावर फार चर्वितचर्वण करू नये एवढे भान तरी माध्यमांनी ठेवायला हवे. मुद्दा तरुणपिढीच्या व्यसनाधीनतेचा आहे. त्यामुळे हा विषय नाजूकपणे हाताळायला हवा.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply