काही चित्रपट कलाकृती कितीही वर्ष सरली तरी त्या आजच्याच असतात. आजही त्यातून जुन्या चित्रपटांचे अस्तित्व व महत्व अधोरेखित होत राहते. आंधी हा चित्रपट असाच. क्लासिक व व्यावसायिक यांचा सुवर्णमध्य गाठणारा.
नाव घेताक्षणीच एकाच वेळेस अनेक गोष्टी डोळ्यासमोर येणारच. अशी अनेक चित्रपटांची ताकद आहे. राजकीय पत्रकार याकडे राजकीयपट म्हणून पाहणार, राजकीय विश्लेषक या चित्रपटावर आणीबाणीत बंदी घालण्यात आली होती याची आठवण नक्कीच करून देणार, चित्रपट माध्यमाची जाण असणारे गुलजार यांच्या कल्पक दिग्दर्शनाचं विशेष कौतुक करणार, चित्रपट रसिक याकडे राजकारणाच्या पार्श्वभूमीवरील परिपक्व (मॅच्युअर्ड) प्रेमकथा म्हणून पाहणार, संगीत शौकीन या चित्रपटातील श्रवणीय गाणी एव्हाना गुणगुणायला लागले असणारच, काहींनी ती ऐकायला घेतली असणार. फिल्मी गॉसिप्समधून विशेष रस घेणारे या चित्रपटाच्या काश्मिरमधील चित्रीकरणाच्या वेळेस झालेली एक गोष्ट रंगवून सांगणार. आंधी हा बहुचर्चित वादळी चित्रपट म्हणून कायमच ओळखला जातो.
फिल्म क्राफ्ट या निर्मिती संस्थेचे जे. ओम प्रकाश निर्मित आणि गुलजार दिग्दर्शित ’आंधी’ (रिलीज 13 फेब्रुवारी 1975 मुंबईत मेट्रो थिएटर… 14 फेब्रुवारीपासून मुंबई व उपनगरात)च्या प्रदर्शनास यशस्वी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. कधी सरला हो इतका काळ?
1975 हे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, माध्यम क्षेत्रासाठीचे अतिशय महत्त्वाचे वर्ष. अनेक घडामोडींचे वर्ष. हिंदी चित्रपटसृष्टीसाठी तर खास उल्लेखनीय वर्ष. याच वर्षाच्या जानेवारीत 24 तारखेला मुंबईत यश चोप्रा दिग्दर्शित दीवार चित्रपट पडद्यावर आला तोच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. तो इतका आणि असा की, ’दीवार’ला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दक्षिण मुंबईतील रिगल चित्रपटगृहात आयोजित केलेल्या खास खेळास मी गेलो तेव्हा मीदेखील चक्क रांगेत उभे राहून प्रवेश घेतला. ’प्रेक्षकाच्या भूमिकेत’ राहिल्यानेच हाऊसफुल्ल गर्दीत आपण ’पुन्हा एकदा’ दीवार एन्जॉय करू हा विश्वास मनसोक्त मनमुराद टाळ्यांनी सार्थ झाला. पन्नास वर्षापूर्वी दीवारच्याच पुढच्या शुक्रवारी म्हणजेच 31 जानेवारी रोजी मुंबईत आयना (राजेश खन्ना व मुमताज), 14 फेब्रुवारीला गुलजार दिग्दर्शित आंधी, 30 मे रोजी सतराम रोहरा दिग्दर्शित जय संतोषी मां (याची जाहिरात माझ्या कलेक्शनमध्ये आहे) असे करत करत 15 ऑगस्टला शोले येईपर्यंत ’दीवार’ने मिनर्व्हात रौप्य महोत्सवी आठवडा पार करत मोती थिएटरमध्ये पुढचा प्रवास सुरू केला.
या सगळ्यात आंधी वेगळाच. महत्त्वाकांक्षी राजकीय नेत्या आरतीदेवी (सुचित्रा सेन) आणि त्यांचे पती जे.के. (संजीवकुमार) यांच्या नातेसंबंधाची ही गोष्ट राजकीय चित्रपट म्हणून चर्चेत राहिली. या चित्रपटात संजीवकुमार आणि सुचित्रा सेन यांच्यासह ओम शिवपुरी, मनमोहन, कमलदीप, ए.के. हनगल, हरीश, रणवीर, सी.एस. दुबे इत्यादींच्या भूमिका आहेत. ‘आंधी’च्या निर्मितीतील गोष्टी एक चित्रपट ठरावा.
गुलजार हे सुचित्रा सेन नायिका असेल अशा एका वेगळ्याच पटकथेवर निर्माता सोहनलाल कंवर (पहेचान, संन्यासी इत्यादी चित्रपटांचे निर्माते व दिग्दर्शक) यांच्यासाठी चित्रपट दिग्दर्शित करणार होते, पण सुचित्रा सेनने सुचवलेले बदल गुलजार यांनी अमान्य केले व तो चित्रपट तेथेच थांबला.लेखक कमलेश्वर यांच्याकडे राजकीय नेत्या तारकेश्वरी सिन्हा यांच्या आयुष्यावर आधारित एक गोष्ट होती. गुलजार यांना ती आवडताच त्यांनी व भूषण वनमाली यांनी पटकथा लेखन केले आणि नाव ठरले आंधी.
परिचय (1972), कोशिश (1973) या चित्रपटांच्या वेळेस संजीवकुमारशी गुलजार यांचे सूर जुळल्याने आणि आता त्यांच्याच ‘मौसम’ मध्येही तो भूमिका साकारत असतानाच ‘आंधी’साठी तोच निश्चित होताच. एखाद्या कलाकारावरचा दिग्दर्शकाचा विश्वास खूपच महत्त्वाचा असतोच. (त्यानंतर गुलजार दिग्दर्शित अंगूर, नमकीन या चित्रपटात संजीवकुमार दिसला. संजीवकुमारने कधीच वयाचे व भूमिकेचे बंधन ठेवले नाही). यातील मौसमची निर्मितीमागची गोष्ट वेगळीच. त्या चित्रपटाचे निर्माते मल्लिकार्जुन राव यांना कमलेश्वर यांना सांगितलेले ‘आंधी’चे कथासूत्र फारसे आवडले नाही, पण ‘मौसम’चे आवडले. 1975 या एकाच वर्षात गुलजार दिग्दर्शित आंधी, मौसम (संजीवकुमार, शर्मिला टागोर) व खुशबू (जितेंद्र, हेमा मालिनी, फरिदा जलाल. निर्माता प्रसन्न कपूर. हा जितेंद्रचा भाऊ) असे तीन भिन्न स्वरुपातील चित्रपट प्रदर्शित झाले हे विशेषच. ’मेरे अपने’पासूनच गुलजार यांनी दिग्दर्शनात विविधता दाखवली… गुलजार यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांचे प्रगती पुस्तक एक वेगळाच आनंद.
‘आंधी’तील आरती देवी या भूमिकेसाठी गुलजार यांनी आपणास विचारले होते असे खूप वर्षांनी म्हणजेच 2011 साली वैजयंतीमालाने एका मुलाखतीत भाष्य केले हा सुखद धक्काच. तोपर्यंत या गोष्टीची कधीच चर्चा झाली नव्हती. गुलजार यांनी कोलकात्यात जाऊन सुचित्रा सेनची भेट घेऊन तिचा आंधी साठी होकार मिळवला.
‘आंधी’ची काही दृश्य व गाणी काश्मिरमधील सौंदर्य स्थळावर चित्रीत करण्यात आली. या चित्रीकरण सत्रात राखी गुलजार आपली अगदी छोटी मुलगी मेघना (बोस्की) हिला घेऊन काश्मिरला गेली. दिवसभराचे शूटिंग संपल्यावर रात्री श्रमपरिहार आणि त्यात बाटली फुटणे हे स्वाभाविकच. एके रात्री (म्हणे) चित्रपटात घडते अगदी तशीच गोष्ट प्रत्यक्षात
घडली असे गॉसिप्स मॅगझिनमधून बरेच रंगवून रंगवून लिहिले गेले. एका रात्री (म्हणे) पार्टी संपल्यावर संजीवकुमारने सुचित्रा सेनचा हात धरला आणि तो तिला आपल्या खोलीत येण्याचा आग्रह धरत असतानाच गुलजार यांनी सुचित्रा सेनची त्याच्यापासून सुटका केली. ते सुचित्रा सेनला तिच्या रुमपर्यंत सोडावयास गेले. तेथून परतत असतानाच राखीने त्यांना पाहिले आणि तिचा काही गैरसमज झाला आणि ती प्रचंड रागावली (म्हणे). या सगळ्याचा परिणाम असा झाला की काश्मिरवरुन परतताना ते एकत्र नव्हते.
‘आंधी’ प्रदर्शित झाला. त्याला रसिकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत होता, शंभर दिवसांचे यशही गाठले होते आणि अशातच एक बातमी पसरली. सुचित्रा सेनने साकारलेली भूमिका तात्कालिक पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर बेतली आहे. गुलजार यांनी एका मुलाखतीत भाष्य केले, असे अजिबात नाही. हा गैरसमज आहे. चित्रपट लिहिताना व दिग्दर्शित करताना असा कोणताही विचार नव्हता. गुलजार यांचे म्हणणे काहीसं बाजूला पडले. अशातच गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुक आली आणि त्यात या चित्रपटात एका दृश्यात आरती देवी दारू सेवन करते या दृश्याचा विरोधी पक्षाकडून वापर करण्यात आला. आणीबाणीतील ही गोष्ट. हा चित्रपट निवडणूक आचारसंहितेचा भंग करतोय या कारणास्तव या चित्रपटावर बंदी घालण्यात आली.
या चित्रपटाची गीते गुलजार यांनी लिहिली असून संगीत आर.डी. बर्मन यांचे आहे. या चित्रपटातील तेरे बिना जिंदगी से कोई (अनंतनाग), तुम आ गये हो (परीमहल गार्डन), इस मोड से जाते है (पहेलगाव) ही काश्मिरमध्ये चित्रीकरण झालेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटाचे मुंबईतील मेन थिएटर मेट्रो होते. ‘आंधी’ दिल्लीत प्रदर्शित होताना पोस्टरवर म्हटले होते, आजाद भारत की एक महान महिला नेता की कहानी…, तर हैदराबाद येथील पोस्टरवर म्हटले होते, परदे परदेखीए अपने प्रधानमंत्री को… (त्या काळात मराठी असो वा हिंदी टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होत.)
देशात 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू झाली आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आली. आजही विविध कारणास्तव आणीबाणीच्या दिवसांचा उल्लेख होता (उदा. कंगना राणावतचा इमर्जन्सी या चित्रपटाचे अलिकडेच झालेले प्रदर्शन)
यानंतर 1977 साली म्हणजेच देशात जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यावर ‘आंधी’ रि-सेन्सॉर करताना काही दृश्ये कापून तो पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. आणिबाणीत गुलजार दिग्दर्शित ’आंधी’ आणि डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ’सामना’ (पुण्यात रिलीज 10 जानेवारी 1975)च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली, यावरून बरीच चर्चा झाली.
विशेष उल्लेखनीय गोष्ट, मुंबईत 14 फेब्रुवारी 1975 या एकाच शुक्रवारी आंधी व सामना (जानेवारीत पुणे शहरात जानेवारीत प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला सामना; त्यानंतर आता गिरगावातील सेन्ट्रल चित्रपटगृह) हे प्रदर्शित झाले आणि दोन्ही चित्रपट रिपीट रनला म्हणजेच पुन्हा प्रदर्शित झाल्यावर असे काही गाजले की आजही त्यांचा जबरदस्त ठसा उमटलाय. ते माईलस्टोन चित्रपट ठरलेत.
‘आंधी’मधील गुलजार यांचा एक संवाद फारच गाजला. चित्रपटातील राजकीय पक्षाचा कारभार सांभाळणारा चंद्रसेन (ओम शिवपुरी) एका वृत्तपत्राच्या संपादकास म्हणतो, इलेक्शन के पहले आप हमारा खयाल रखिये, उसके बाद हम आपका…!
– दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)