देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा
नागपूर ः प्रतिनिधी
संपूर्ण कोविडमध्ये एक राज्य आपल्या लोकांना त्रास देत असेल तर ते महाराष्ट्र आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी रुग्णसंख्या महाराष्ट्रातच का वाढत आहे? काय उपाययोजना ते करीत आहोत? हे सांगण्याची आवश्यकता होती, असे सांगत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर निशाणा साधला. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जे भाषण केले, मला तर समजतच नाही की ते का केले. कारण त्यामध्ये कुठल्याही उपाययोजना नव्हत्या, कुठलेही निर्णय नव्हते. तज्ञांशी बोलू, दोन दिवसानंतर सांगू असेच मुद्दे त्यांनी मांडले. लॉकडाऊन करताना त्या काळात नागरिकांना कशा पद्धतीने मदत केली जाईल हे सांगणे गरजेचे आहे, असे फडणवीस म्हणाले.
संपूर्ण कोव्हिडमध्ये एक राज्य आपल्या लोकांना त्रास देत असेल तर ते महाराष्ट्र आहे. म्हणूनच आम्ही मुख्यमंत्र्यांना जगभरातील देशांचे उदाहरण दिले. त्यांनी काय केले हेदेखील पाहिले पाहिजे. त्यानंतर त्या देशांचे उदाहरण दिलं पाहिजे, असा सल्ला फडणवीसांनी दिला.
नागपूरसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्यानंतर सरकार काय व्यवस्था करणार आहे? पुण्याला काय करणार आहे? किंवा राज्यातील इतर भागात संख्या वाढत असताना बेड मिळत नाही, व्यवस्था नाही याचे उत्तर द्यायला हवे होते, पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, सल्ला देतात त्यांना उत्तर दे यातच वेळ घालवला, अशी टीका फडणवीसांनी केली.
लॉकडाऊन हे अपवादात्मक परिस्थितीत करावे लागते, पण तो अपवाद आहे, नियम नाही. पंतप्रधान मोदींनी देशात लॉकडाऊन केला होता तेव्हा प्रत्येक घटकातील नागरिकांची काळजी घेतली होती. त्यांच्यासाठी काही न काही उपाययोजना केल्या. प्रत्येक नागरिकांच्या घरी अन्नधान्य पोहचेल अशी व्यवस्था केली होती. खात्यात पैसे जाईल असे नियोजन केले होते. राज्यात लॉकडाऊन करायचा असेल तर राज्य सरकारने प्रत्येकाचा विचार करावा लागेल, असेही फडणवीस या वेळी म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांना विस्मरणाचा रोग
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला या वेळी फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. याचे कारण महाराष्ट्रातील एकमेव सरकार आहे ज्यांनी कोणतीही मदत केलेली नाही. केंद्र सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेज गेल्या वर्षभरात दिले आहे. देशातील इतर राज्यांनीही पॅकेज दिले आहे. फक्त महाराष्ट्राने एकाही पैशाचे पॅकेज तर दिलेच नाही, पण त्याऐवजी लोकांचे वीज कनेक्शन कापणे, लोकांना त्रास देणे यावरच भर दिला आहे.
इतके कनफ्युज मुख्यमंत्री बघितले नाहीत : मनसे
मुंबई ः वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सोशल मीडियावरून जनतेला संबोधित केले. त्या वेळी त्यांनी राज्यात कडक निर्बंध लादले जातील, तसेच परिस्थिती सुधारली नाही, तर लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना टोला लगावला होता. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
देशपांडे म्हणाले, लॉकडाऊनबद्दल काय करावे असे काल मुख्यमंत्र्यांनी विचारले. जनतेने उत्तर द्याव असेही मुख्यमंत्री म्हणाले. इतके कनफ्युज मुख्यमंत्री बघितले नाहीत. काल मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांशी चर्चा करणार असे सांगितले. हे तज्ज्ञ कोण समजले नाही. त्यांचा आजचा कार्यक्रम पाहिला, तर ते जीम मालक, नाट्य निर्माते आणि संपादकांना भेटणार आहेत. हे सगळे तज्ञ असतील आणि त्यांच्याशी चर्चा करणार असतील, तर तज्ज्ञ कोण याची परिभाषा समजली पाहिजे.
संदीप देशपांडे यांनी लेखातील एक संदर्भ वाचून दाखवला व चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करणार्या तज्ज्ञांशी चर्चा करावी, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून मार्ग काढावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. कोरोनाची भीती लोकांच्या मनातून कमी झाली पाहिजे. कोरोना बरा होऊ शकतो हा विश्वास सरकारने निर्माण केला तर परिस्थिती सुधारेल, असेही देशपांडे म्हणाले.