खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात सोमवारी (दि. 30) सकाळी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण जखमी झाले आहेत. या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पहिला अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळील तीव्र वळणावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास झाला. पुण्याहून मुंबईकडे दूध घेऊन जाणार्या टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने तो महामार्गावर पलटी झाला. टँकरमधील दूध सांडून रस्ता निसरडा झाल्याने बोरघाट पोलिसांनी द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अडवून ठेवली होती. अग्निशमन दलाच्या पथकाने महामार्ग पाण्याने धुतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. तोपर्यंत द्रुतगती महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर रांगा लागल्या होत्या. दरम्यान, पुण्याकडे जाणारी वाहतूक खोपोलीमधून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळविण्यात आली होती. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर असणार्या शिंग्रोबा मंदिराजवळ पुणे बाजूकडून खोपोलीकडे येणार्या कारचालकाचा ताबा सुटल्याने ही कार 15 ते 20 फूट खोल दरीत कोसळली. या कारमध्ये पाच जण प्रवास करीत होते. त्यापैकी दीपेश बच्चन लाल (32, रा. नाशिक), राज कैलास गुप्ता (29) व रोहित अनिल गुप्ता (30, रा. मुंबई) हे तिघे जखमी झाले. त्यांना खोपोलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर एका गंभीर प्रवाशाला पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिसर्या घटनेत बोरघाटात मोटरसायकल स्लीप झाल्याने सागर खत्री व प्रियांका गरुड हे किरकोळ जखमी झाले आहेत.