नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 25) ‘मन की बात’च्या 76व्या भागाद्वारे देशवासीयांना संबोधित केले. या वेळी देशातील नागरिकांनी कोरोनाच्या लशीसंबंधी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि देशातील लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना आपल्या सर्वांची दु:ख सहन करण्याची परीक्षा पाहत आहे. अशा वेळी मी आपल्याशी चर्चा करतोय. कोरोनाच्या पहिल्या लाटेशी यशस्वीरीत्या सामना केल्यानंतर देशातील नागरिकांचा आत्मविश्वास वाढला होता. आता कोरोनाच्या दुसर्या लाटेने पुन्हा एकदा देशाला संकटाच्या खाईत लोटले आहे. कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी आपल्याला आता तज्ज्ञांच्या आणि वैज्ञानिकांच्या सल्ल्याची गरज आहे. त्याला प्राथमिकता देणे आवश्यक आहे. राज्य सरकारांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण प्रयत्न करीत आहे, तसेच राज्येही आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात लस महत्त्वाची भूमिका बजावतेय. त्यामुळे माझा आग्रह आहे की कोरोना लशीबद्दल ज्या काही अफवा पसरत आहेत त्यांना बळी पडू नका. 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना मोफत लशीचा पुरवठा करण्यात येणार आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.