Breaking News

‘पुढील पाच वर्षे भारतासाठी एकलव्यासारखे काम करेन’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

मला विजयाचा विश्वास होता, मात्र विजय पचवण्याची क्षमता असायला पाहिजे. पुढील पाच वर्षें भारतासाठी मी एकलव्यासारखे काम करणार आहे, असे उद्गार देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातेतील अहमदाबाद येथील 50 वर्षे जुन्या भाजप कार्यालयाबाहेर झालेल्या सभेमध्ये काढले.

लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजप नेते नरेंद्र मोदी यांचे रविवारी (दि. 26) सायंकाळी सहा वाजता अहमदाबाद विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर मोदी यांनी सरदार वल्लभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी उपस्थित होते. यानंतर गुजरात भाजप कार्यालयापर्यंत रोड शो करण्यात आला. या वेळी सुरतमध्ये झालेल्या दुर्घटनेत निष्पाप चिमुकल्यांचा बळी गेल्यामुळे गुजरात भाजपने आपला जल्लोष कमी केला.    अतिशय साधेपणाने मोदींचे स्वागत करण्यात आले.

या वेळी जनसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर 300पेक्षा जास्त जागा मिळतील, असा मला विश्वास होता. हे मी दुसर्‍यांना सांगितले त्यावेळी माझी खिल्ली उडवण्यात आली, पण निकाल सर्वांसमोर आले. भारतीयांनी मला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. लोकांनी ठरवले होते की पुन्हा एकदा मजबूत सरकार द्यायचे. म्हणूनच जनतेने पुन्हा एकदा आम्हाला संधी दिली. 2014नंतर लोकांनी मला ओळखले, पण त्यापूर्वी भारतीयांना गुजरातमधील विकास माहीत झाला होता.  पुढील पाच वर्षे भारतासाठी महत्त्वाची असल्याचेही मोदी यांनी सांगितले.येथील लोकांच्या आशीर्वादासाठी मी आज येथे आलो आहे. गुजरातमधील  लोकांचे आशीर्वाद हीच माझी ताकद आहे. तुमच्या प्रेमाबद्दल माझ्याजवळ शब्द नाहीत. माझ्या प्रिय धरतीसमोर मी नतमस्तक होत आहे. येथील लोकांनी मला शिकवले, संस्कार, शिक्षण दिले, तेच आज मला कामाला येत आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच सुरत अग्नितांडवावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दुःख व्यक्त करण्यात आले. मृतांच्या कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची ईश्वर शक्ती देवो, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply