Breaking News

जलतरणपटू प्रभात कोळीचा भीमपराक्रम

  • न्यूझीलंडची कूक स्ट्राईट खाडी पोहून केली पार
  • सात आव्हाने पूर्ण करणारा ठरला सर्वांत युवा स्विमर

पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात कोळी याने खडतर सात समुद्रांच्या आव्हानांपैकी सातवे आव्हान न्यूझीलंड येथील कूक स्ट्राईट खाडी नुकतीच पोहून पार केली. सात समुद्रांचे आव्हान पूर्ण करणार्‍या जगातील 21 जलतरणपटूंमध्ये प्रभातचा समावेश झाला असून सात समुद्र पार करणारा तो जगातील सर्वांत तरुण जलतरणपटू ठरला आहे.
प्रभातने यापूर्वी इंग्लंडची खाडी, अमेरिकेतील कॅटलिना खाडी, हवाई येथील कैवी खाडी, त्सुगुरु जापान, नॉर्थ चॅनेल आयर्लंड, जिब्राल्टर स्पेन अशा जगाच्या कानाकोपर्‍यात अनेक मोहिमा यशस्वीरीत्या पोहून पार केलेल्या आहेत. कुक स्ट्रेटचे आव्हान पेलण्यासाठी प्रभात न्यूझीलंडच्या वेलिंग्टन येथे 21 फेब्रुवारी रोजी पोहचला होता. 1 मार्चला सकाळी 10 वाजता प्रभातने दक्षिण आयर्लंड येथून पोहण्यास सुरुवात केली. पुढच्या तीन तासांत त्याने 14 किमी अंतर पार केले. शेवटचे सात किमी पोहण्यासाठी त्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. त्या वेळी वार्‍याचा वेग 60 किमी प्रति तास होता, परंतु प्रभातने गेल्या 13 वर्षांच्या ओपन वॉटर स्विमिंगच्या अनुभवाने प्रतिकूल परस्थितीवर मात करीत एकूण आठ तास 41 मिनिटांत कुक स्ट्रेट खाडी पोहून पार केली. याबद्दल त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
प्रभात हा कोळी कुटुंबातला. त्यामुळे समुद्राशी त्याचे घट्ट नाते आहे. प्रभातने सुरुवातीला धरमतर ते गेटवे हे सर्व नव्या सागरी जलतरणपटूंचे प्राथमिक आव्हान पार केले. त्यानंतर वयाच्या 14व्या वर्षीच कासा ते खांदेरी हा धोकादायक मानला जाणारा सागरी पट्टा पार करून त्याने आपल्यातील साहसी जलतरणपटूची चुणूक जगाला दाखवून दिली होती. पुढे त्याने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रगती केली. या कामगिरीबद्दल त्याला तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply