एखादी मुव्हीज कायमच तारुण्यात राहण्याची कारणे काय असतात? आजची जेन झी आणि जेन अल्फा पिढी चित्रपट, सिनेमा, फिल्म असं न म्हणता मुव्हीज म्हणते म्हणून तसं म्हटलं. चित्रपटाची थीम (अर्थात गोष्ट, कथा) त्या चित्रपटाचे वय जाणवून देत नाही की त्या मुव्हीजचे रुपेरी पडद्यावरील सादरीकरण (सोप्या भाषेत सांगायचे तर दिग्दर्शन) त्या मुव्हीजला कायमच ‘यंग’ अर्थात तरुण ठेवते?
फरहान अख्तर लिखित आणि दिग्दर्शित ‘दिल चाहता है’ (मुंबईत प्रदर्शित १० ऑगस्ट २००१) या मुव्हीजमध्ये तीन तरुण मित्रांची फ्रेंडशिप आहे, त्यांची भिन्न प्रकारची लव्ह स्टोरी आहे, त्यांचीच सहलही आहे, एक प्रकारचा हा ट्रॅव्हल मुव्हीज आहे आणि हे सगळे एकात एक असं काही गुरफटलय की आपण पडद्यावरच्या विश्वात मग्न होऊन जातो, हरवून जातो, हरखून जातो. बरं, पंचवीस वर्षांपूर्वी ही मुव्हीज एन्जॉय करताना तसं वाटलं हे स्वाभाविक आहे. नवीन शतक सुरु झाले होते. २००१ हे या दशकाचे पहिलेच वर्ष होते. जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्था यातून आलेला सामाजिक सांस्कृतिक माध्यमातील बदल रुजत होता. अशातच इनकमिग आणि आऊटगोविंग अजून फार स्वस्त नसलं तरी हळूहळू मोबाईल फोन हाती येत होता. मल्टिप्लेक्स युगाची सुरुवात होती, तरी एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये आपण रमलो होतो, उपग्रह वाहिन्यांच्या संख्येत वाढ होत होती. मनोरंजन उपग्रह वाहिन्या, वृत्त वाहिन्या, क्रीडा वाहिन्या विस्तारत होत्या.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचे नाविन्य अजून कायम होते. राकेश रोशन निर्मित आणि दिग्दर्शित ‘ कहो… ना प्यार है ‘( २०००) च्या अतिशय फ्रेश, तजेलदार, उत्फूर्त प्रेमकथेला तरुण पिढीने दिलेल्या मनसोक्त मनमुराद प्रतिसादाने खुललेले, फुललेलं दिलखुलास मनमोकळे वातावरण कायम होते. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर एक प्रेमकथा’ आणि आमिर खान प्रॉडक्शनचा आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ ( मुंबईत दोन्ही चित्रपट प्रदर्शित १५ जून २००१ला प्रदर्शित) च्या खणखणीत यशाने चित्रपटगृहावर हाऊसफुल्लचा फलक दिसत होता. लगानबरोबरच दिल चाहता हैचा एक मिनिटाचा पहिला ट्रेलर चित्रपटगृहात दाखवला जाऊ लागला ही या चित्रपटाकडे रसिकांना आकृष्ट करण्यासाठीची मस्त पायाभरणी.
दिल चाहता हैसारखा तरुण चित्रपट प्रदर्शित होण्यास सकारात्मक वातावरण होते. चित्रपट प्रदर्शित होण्याची काळ, वेळ, वातावरण खूप खूप महत्वाचे असते, चित्रपट अभ्यासक्रमात याचीही दखल आवश्यक आहे. चित्रपट कसा आहे याबरोबरच तो कधी प्रदर्शित झाला हेही अधोरेखित होणे आवश्यक.
दिल चाहता हैची गाणी लोकप्रिय असल्याने चित्रपट कधी पाहतोय असं झालं होतं. लोकप्रिय गाणी चित्रपटासाठी सपोर्ट सिस्टीम असतात. संगीतकार शंकर एहसान लॉय हे एम टीव्ही पिढीचे संगीतकार होते. विशेष म्हणजे जावेद अख्तर यांनी आपल्या गीतलेखनात नवीन पिढीचा मूड पकडला होता. (तोपर्यंत त्यांची चित्रपटसृष्टीतील वाटचाल तीसपेक्षा जास्त वर्षांची झाली होती. त्यांना काळासोबत बदलणं जमलं याचं कौतुक आहे.) या चित्रपटातील गाण्यांच्या चालीवर काम करण्यासाठी निर्माता रितेश सिधवानी आणि संगीतकार शंकर एहसान लॉय हे लोणावळा येथे दुहेरी दौऱ्यावर गेले. त्यांनी पासष्ट टक्के प्रमाणात पिकनिक एन्जॉय केली आणि त्यातूनच त्याना मिळालेल्या उर्जेतून चाली बांधल्या. म्हणजे काम पस्तीस टक्के केले. चित्रपटाच्या जडणघडणीत असे अनेक फॅक्टर असतात आणि ते आवश्यकही असतात. आणि हे नवीन पिढीचे समीकरण आहे. या चित्रपटातील दिल चाहता है (पार्श्वगायक शंकर महादेवन), जाने क्यू लोग प्यार करते है (उदित नारायण), वो लडकी है कहा (शान आणि कविता कृष्णमूर्ती), कोई कहे कहता रहे (शंकर महादेवन, शान आणि के के), तनहाई ( सोनू निगम), कैसी है यह रुत ( श्रीनिवास) ही गाणी पटकथेच्या ओघात येतात आणि आपण चित्रपटात गुंतत गुरफटत जातो. चित्रपटाच्या हलक्या फुलक्या खेळकर मूडला ही गाणी पूरक ठरल्याने ही गाणी ऐकताना अथवा गुणगानताना त्यांचे पडद्यावरचे सादरीकरण डोळ्यासमोर येते. चित्रपट निर्मितीत सगळेच घटक रस घेणारे असल्याचा हा सुपरिणाम. हेअर स्टाईलीश अधुना भवानी हिचा हा पहिलाच चित्रपट. तिने नवीन पिढीतील हेअरस्टाईलची आवडनिवड आणि या चित्रपटातील व्यक्तीरेखा यांचे मस्त भान ठेवले. सर्वच बाजूंनी हा चित्रपट जमून आला आणि तारुण्यात राहिला.
या चित्रपटाचं वितरण यशराज फिल्म्स वितरण यांचे आहे. यात खास वैशिष्ट्य असं की, यशराज फिल्म्सने आपल्या बॅनरखालील चित्रपट वितरित करत असतानाच अन्य निर्मात्यांचे चित्रपट वितरित करण्यातही विशेष रस घेतला. या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी यांनी केली आहे. या चित्रपटाचं मुंबई, गोवा आणि ऑस्ट्रेलिया येथे चित्रीकरण झाले. छायाचित्रणकार रवि के. चंद्रन आहे आणि संकलन ए. श्रीधर प्रसाद यांचं आहे.विशेष म्हणजे या चित्रपटासाठी सिंक साऊंड सिस्टीम वापरण्यात आली हे तेव्हा विशेष उल्लेखनीय होते, याचं कारण चित्रीकरणाच्या वेळीच कलाकारांचे आवाज ध्वनिमुद्रीत होणं हे तेव्हा आपल्या देशातील चित्रपटसृष्टीत काहीसं नवीन होते. या चित्रपटाच्या तारुण्यात ही गोष्ट महत्त्वाची. चित्रपट माध्यम अनेक तांत्रिक गोष्टींनी आकार घेत घेत जाते, म्हणून हे सांगायला हवेच.
आकाश मल्होत्रा (आमिर खान), समीर (सैफ अली खान) आणि सिद्धार्थ (अक्षय खन्ना) या तीन मित्रांची फ्रेंडशिप आणि त्यांचे खेळकर खोडकर आणि अनुभवातून गंभीर होणार त्यांचे लाईफ हे या चित्रपटाचे मध्यवर्ती सूत्र.आकाश मल्होत्राची गर्लफ्रेंड शालिनी (प्रीती झिंटा), सिध्दार्थ आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या तारा जैस्वाल (डिंपल कपाडिया)कडे आकर्षित होतो. तारा जैस्वाल ही इंटेरियर इंजिनिअर आहे. घटस्फोटीता आहे. हे अगदी वेगळे असे नातेसंबंध. समीरची मैत्रीण पूजा (सोनाली कुलकर्णी) या व्यक्तीरेखेभोवती हा चित्रपट रंगला. सैफ अली खान आणि सोनाली कुलकर्णी यांच्यावरचे यह लडकी है कहा या गाण्यातील प्रेक्षागृह दक्षिण मुंबईतील लिबर्टी चित्रपटगृह आहे.
फरहान अख्तर याने आपण गोवा आणि विदेशी केलेल्या भटकंतीवर आधारित डायरीवर ‘ हम तीन ‘ या नावाने पटकथा लिहिली. आणि ते नाव बदलून ‘ दिल चाहता है ‘ असं केले, ते एकदम फिट्ट बसले. चित्रपटाच्या नावात त्याचे व्यक्तिमत्त्व दिसायला हवे याचं हे एक उत्तम उदाहरण.
झोया अख्तरने या चित्रपटासाठी कलाकार निवडले. कास्टीग दिग्दर्शक ही एक नवीन संज्ञा तेव्हा विकसित होत होती. आकाश मल्होत्रा या व्यक्तीरेखेसाठी अक्षय खन्नाचा विचार जवळपास निश्चित झाला होता, आमिर खानने म्हटले, आपण ही भूमिका साकारु इच्छितो. अक्षय खन्नाने समजूतदारपणा दाखवला. (तोपर्यंत तो आपले स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होता. त्याला आणि सैफ अली खानला या तरुण चित्रपटाने फॉर्मात आणलं. चित्रपटाचं यश बरेच काही देते.) प्रीती झिंटाने या चित्रपटातील भूमिकेसाठी साडेतीन महिने भरपूर रिहर्सल केली, मेहनत घेतली आणि मगच कॅमेरासमोर उभी राहिली. या चित्रपटात अयूब खान, रजत कपूर, सुचित्रा पिलाई, युसुफ हुसेन, अहमद खान असे अनेक कलाकार आहेत. एकेकाळी दिलीपकुमारची कितवी नक्कल करतो असा प्रश्न पडलेल्या राकेश पांडेचीही या चित्रपटात छोटीशी का होईना पण भूमिका आहे. या चित्रपटातील गोव्यातील चित्रीकरण बहुचर्चित ठरले. विशेषतः चापोरी किल्ला परिसरात केलेले चित्रीकरण लक्षवेधक आहे. ऑस्ट्रेलियात सिडनी येथे चित्रीकरण झाले. चित्रपटाच्या सेटवर फरहान अख्तर याने आपल्याला आन्टी अशी हाक मारू नये, संबोधू नये असे डिंपल कपाडियाने अतिशय आग्रहाने सांगितले. हा चित्रपट तारुण्यात राहण्यासाठी ही गोष्टही महत्त्वाची.
एस्सेल एन्टरटेन्मेंट निर्मित ‘दिल चाहता है’ पंचवीस वर्षांचा झाला असं म्हणण्यापेक्षा दिल चाहता है हा कायमच पंचवीशीतील तरुण चित्रपट आहे असं म्हणूया. काही चित्रपट असेही असतात. असेही हवेत.
- दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper