आपल्याकडे परंपरागत शेती जरी नसली तरी कृषी क्षेत्राशी निगडित करिअर करण्यास आपण उत्सुक असाल तर आपण व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण प्राप्त करून या क्षेत्रात भविष्य साकार करू शकता. कृषी आणि या क्षेत्राशी निगडित बाबींचा आपण विचार करूया.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 60-70 टक्के जनता आजही ग्रामीण भागात राहते आणि शेती हे त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपला पारंपरिक शेतीकडे कल राहिला आहे. परंतु, अलीकडच्या काळात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाल्याने शहरातील युवकांसाठी हे क्षेत्र रोजगारासाठी उपयुक्त ठरत आहे. बदलत्या काळानुसार विज्ञान आणि तंत्रज्ञान हे शेतीच्या विकासाला पूरक ठरत आहे. शेती आणि पशुपालन हा ग्रामीण भागातील आत्मा मानला जातो. बदलत्या काळात शेती उद्योगाला अधिकाधिक लाभदायी करण्यासाठी अनेक योजना सरकारकडून राबविल्या जात आहेत.
शेतकरी जगला तर देश जगेल, असे म्हटले जाते. कारण देशाची अर्थव्यवस्था मुळातच शेतीवर अवलंबून आहे. चांगले पीक आले तर देशात सुबत्ता नांदते, अन्यथा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच शेती देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देत आहे. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यातही कठोर मेहनत करणार्या शेतकर्यांबाबत खूप बोलले जाते, लिहले जाते. प्रत्यक्षात शेती करण्यास शहरी मंडळी उत्सुक नसतात. मात्र, हे चित्र आता बदलत चालले आहे. अर्थार्त आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगाच्या प्रगतीने कृषी क्षेत्रही अपवाद राहिलेले नाही. शेती म्हणजे केवळ मेहनत ही संंंकल्पना मागे पडू लागली आहे. कमी श्रमात कृषी क्षेत्रातून अधिक उत्पन्न घेणे अलीकडच्या काळात शक्य होऊ लागले आहे.
तंत्रज्ञानाच्या वाढत्या उपयोगातून कृषी क्षेत्रात शारीरिक श्रमावरची अवलंबिता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ आणि खर्चात कपात होऊ लागली आहे. कृषी यंत्राच्या वाढत्या उपयोगामुळे आणि उत्तम व्यवस्थापनामुळे कृषी क्षेत्र हे चांगल्या उत्पन्नाचे माध्यम बनत चालले आहे. गेल्या काही वर्षांत शहरातील युवकांनी देखील कृषी क्षेत्राकडे रुची दाखवण्यास सुरुवात केली आहे. चांगला अनुभव बाळगणारा युवक गावात जाऊन शेती उद्योग करताना दिसून येत आहे. तंत्रज्ञान आणि सायंटिफिक इनपूटमुळे कृषी क्षेत्रात नवनवीन संधी निर्माण होत आहेत. या क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या अनेक पर्यायांबरोबरच आरोग्यदायी जीवनशैलीचा अनुभव घेण्याची देखील संधी असते. जर आपल्या अंगी मेहनतीची तयारी असेल, कौशल्य, ज्ञान असेल तर आपणही कृषी क्षेत्रात संधी आजमावू शकतो.
कृषी क्षेत्रातील संधी : करिअरची चर्चा होत असताना विज्ञान आणि मॅनेजमेंटमध्ये सर्वाधिक संधीची शक्यता दिसते. त्याचवेळी कृषी क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी सायन्स आणि इंजिनिअरिंग, मॅनेजमेंटबरोबरच सोशल सायन्सची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक संधी आहेत. कृषी, फूड इंडस्ट्रीत बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स आणि स्टॅटटिक्सचा अभ्यास करणार्यांसाठी करिअरचे अनेक पर्याय आहेत. जर आपण इकोनॉमिक्स आणि बिजनेस मॅनेजमेंटच्या अभ्यासात रुची बाळगत असाल तर कृषी क्षेत्रात यशस्वी करिअर करू शकता.
अॅग्रिकल्चरल सायन्सच्या अभ्यासानंतर अॅग्री बिझनेस, आर अँड डी ऑर्गनायजेशन, पब्लिक आणि प्रायव्हेट एजन्सी, सरकारी आणि पॉलिसी मेकिंग एजन्सी या अॅग्रिकल्चरल प्रोफेशनलशी जोडता येतात. अॅग्रिकल्चरल सायन्सचा विचार केल्यास हे शास्त्र विविध प्रकारचे पीक उत्पादन, फार्मिंग गुणवत्ता पिकांच्या उत्पादनात वाढ, श्रम कमी करणे, माती आणि जल संरक्षण, कीटकनाशक यासारखे कार्य करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते आणि त्यात कुशल तज्ज्ञांची कृषी क्षेत्राला नेहमीच मागणी राहिली आहे.
कृषी क्षेत्रात करिअरची संधी : अॅग्रिकल्चरल सायन्स किंवा टेक्नॉलॉजीच्या अभ्यासासाठी विज्ञान विषयांसह 12 वी पास असणे गरजेचे आहे. पदवीनंतर अॅग्री बिझनेसचा अभ्यास करता येतो.
फूड सायन्स : फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी, फूड मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेसिंग, ट्रिटमेंट, प्रिजर्व्हेशन आणि डिस्ट्रीब्युशनशी निगडित विज्ञान शाखा आहे. अप्लाईड सायन्सच्या या शाखेत बायोकेमिस्ट्री, फिजिकल सायन्स आणि केमिकल इंजिनिअरिंगच्या अभ्यासाचा समावेश होतो. वेगाने होणारे शहरीकरण आणि बदलती जीवनशैलीमध्ये खाद्य सामग्रीची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी फूड सायंटिस्टची भूमिका महत्त्वाची आहे.
प्लांट सायन्स : प्लांट सायन्सशी निगडित प्रोफेशनलच्या कार्यक्षेत्रात अॅग्रोनॉमी, एन्वायरमेंटल सायन्स, प्लांट ब्रिडिंग आणि अँटोमोलॉजीशी संबंधित असतो. प्लांट सायन्सच्या अभ्यासात मुख्य रुपाने स्वाईल सायन्स आणि प्लांट बायोटेक्नॉलॉजीवर फोकस केले जाते. प्लांट बायोटेक्नॉलॉजिस्ट पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतो. शेतीतील दुष्काळ पिकावरील रोग आणि नैसर्गिक आपत्तीचे निदान करण्यासाठी दीर्घकालीन उपाय शोधणे आणि बियाणाच्या विकासासाठी प्लांट बायोटेक्नॉलॉजिस्टची भूमिका महत्त्वाची असते.
अॅनिमल सायन्स : शेतीबरोबरच जोड व्यवसाय हा शेतकर्यांसाठी उत्पन्नाचे साधन मानले जाते. त्यात प्रामुख्याने पशुपालनाचा समावेश होतो. शेतकरी विशेषत: गाय, म्हशी, शेळ्या, कुक्कुटपालन करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. जर आपल्याला लाईव्हस्टॉक प्रॉडक्शन आणि मॅनेजमेंटमध्ये रस असेल तर आपण अॅनिमल सायन्स शिकून चांगले करिअर करू शकता. अॅनिमल सायंटिस्ट जनावरांच्या न्यूट्रिशियन, सेफ्टी आणि विकासाकडे लक्ष देते. या विषयांतर्गत जनावरांचे जेनेटिक्स, न्यूट्रिशन, री-प्रॉडक्शन, ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचा अभ्यास करावा लागतो.
सॉईल सायन्स : अॅग्रिकल्चर सायन्समध्ये सॉईल म्हणजेच माती परीक्षण, अभ्यास हे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. हे एकप्रकारे प्लांट सायन्सशी निगडित कार्यक्षेत्र आहे. सॉईल सायन्सचा अभ्यास हा कृषीबरोबरच पर्यावरण शास्त्र आणि अर्थ सायन्स यांच्याशी थेटपणे जोडला आहे. स्पेशलायजेशन करताना सॉईल फॉर्मेशन, सॉईल क्लासिफिकेशन, स्वाईल मॅपिंग आणि प्रॉपर्टिज (फिजिकल, बायोलॉजिकल आणि केमिकल), सॉईल फर्टिलिटी, इरोजन आणि सॉईल मॅनेजमेंटचा विस्तृत अभ्यास करावा लागतो.
बिझनेस मॅनेजमेंट : संशोधन आणि विकासाबरोबरच कृषी क्षेत्रातील उद्योग आणि व्यवस्थापन हे थेटपणे एकमेकांशी जोडले गेले आहे. या कारणांमुळेच कृषी क्षेत्राशी निगडित प्रोफेशनल किंवा उद्योजक हे करिअरसाठी संधी शोधत असतात. देशातील निवडक विद्यापीठांत, शैक्षणिक संस्थांत अॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट हा एक लोकप्रिय अभ्यासक्रम म्हणून शिकवला जातो. या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी सायन्स किंवा कॉमर्सची पार्श्वभूमी असावीच असे नाही. जर आपल्याला या क्षेत्रात जायचे असेल तर आपल्याला मार्केटिंग, टेक्निकल सेल्स, मर्कडाईज, इकोनॉमिस्ट, अकाऊंटस, फायनान्स मॅनेजर, कमोडिटी ट्रेडर्स आदी रुपातून करिअर करू शकता.
अन्य करिअरचे पर्याय : हॉटिकल्चर, डेअरी फार्मिंग, फॉरेस्ट्री आणि वाईल्ड लाईफ, पर्यावरण, पेस्टिसाईड अँड केमिकल रिसर्च, व्हेटरनरी सायन्स, अॅनिमल हस्बेंडरी, अॅग्रिकल्चर इकोनॉमिक्स, अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट, एज्युकेशन आणि सोशल सर्व्हिसेस आदींचा समावेश आहे.
-विलास कदम