नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या समावेशासाठी आग्रही असणार्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी (आयसीसी) टेन-10 म्हणजेच 10 षटकांच्या सामन्यांच्या आयोजनाचा प्रस्ताव उपयुक्त ठरू शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) यांनीही ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या पुनरागमनाला हिरवा कंदील दाखवल्याने आता आयसीसी यावर कशा प्रकारे तोडगा काढते याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवड्यात आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीची बैठक झाली. यादरम्यान 2023 ते 2031 या कालावधीतील क्रिकेट स्पर्धांची रूपरेषा आखण्याबरोबरच ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या पुनरागमनाविषयी चर्चा करण्यात आली. त्यानंतर झालेल्या बीसीसीआयच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीदरम्यान भारताने 2028च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांचे दोन्ही संघ सहभागी होतील, असे स्पष्ट केले, मात्र ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यास कोणत्या प्रकारात सामने खेळवण्यात यावे, याविषयी अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. पुढील दोन आठवड्यांत आयसीसीची आणखी एक बैठक होणार असून या वेळी ऑलिम्पिकचा मुद्दा ऐरणीवर असेल.