Breaking News

घराणेशाहीचे जोखड

यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 2014 मधील आपल्या 282 जागांची संख्या ओलांडून 303 वर जाऊन पोहोचला तर काँग्रेस पक्ष 52 जागांवर चाचपडत राहिला. हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचे, त्यांच्या कार्यशैलीचे व धोरणांचे आहे. त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज न घेता राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’चा नारा लगावला. त्यांच्या या नार्‍याला लोकांनीच आपल्या प्रचंड मतदानातून चोख प्रत्युत्तर दिले.

काँग्रेस पक्षाची अवस्था आता अगदी केविलवाणी झाली आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि त्यात काँग्रेसचा धुव्वा उडाल्याचे चित्र स्पष्ट झाले. निकालापाठोपाठ दुसर्‍या दिवशी समाजमाध्यमांवर राहुल गांधी यांच्या पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची टिंगलटवाळी करणार्‍या संदेशांची अगदी झुंबड उडाली. ‘लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, तो पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमान्य केला, मग त्यांनीच पक्षाध्यक्ष म्हणून काम पहावे असे आर्जव पक्षनेत्यांकडून त्यांना करण्यात आले आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी ते मान्य केले व स्वत:चीच पुन्हा पक्षाध्यक्ष पदी नियुक्ती केली’ अशी काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीची यथेच्छ टिंगल उडवणारा एक संदेशही यात होता. वास्तवात शनिवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली, त्यात जे घडले ते उपरोक्त संदेशात म्हटल्याप्रमाणे अपेक्षित असेच होते. राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ केला आणि पक्ष कार्यकारिणीने तो नाकारला. हे असेच नाट्य कैकवेळा घडल्यामुळेच समाजमाध्यमांवर हा चेष्टेचा विषय ठरला. परंतु हे बहुदा त्या पक्षाला रुचले नसावे. सोमवारी पक्षाने निवेदन जारी करून यासंदर्भात अंदाज बांधणे, गावगप्पा करणे, अफवा पसरवणे हे थांबवण्यात यावे असे फ़र्मावले. पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक ही एक पक्षांतर्गत, गोपनीय बैठक असून तिच्या खाजगीपणाचा आब प्रसारमाध्यमांसह सगळ्यांनीच राखावा, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाकडून सोमवारी प्रसृत करण्यात आलेल्या निवेदनात आहे. अर्थात अशा निवेदनाने समाजमाध्यमांवरील टिंगलटवाळीला किती अटकाव होईल कोण जाणे? या टिंगलटवाळीचे लक्ष्य ठरली आहे ती काँग्रेसी संस्कृती, तिचे पाईक असलेले दुढ्ढाचार्य आणि तोच वारसा पुढे चालवणारी, ‘हो’ला ‘हो’ म्हणणारी नेतेमंडळी. हे सारे बदलल्याशिवाय काँग्रेस पक्षाला कात टाकता येईल का, हा खरा प्रश्न आहे. दरखेपेला आत्मपरीक्षण करायचे आणि बदलायचे मात्र काहीच नाही, यातून काय बुवा साध्य होणार? जनसामान्यांपैकी एक असलेले मोदीजी लोकांना आपलेसे वाटतात, त्यांच्यात आणि जनतेत एक आगळा दुवा आहे याची कल्पना वरून लादलेल्या नेतृत्वाला कशी यावी? आणि आश्चर्य म्हणजे अद्यापही त्या पक्षाला आपले कुठे चुकते आहे हे उमगताना दिसत नाही. पिढ्यान्पिढ्या ज्या अमेठीने गांधी घराण्याला तारले, त्या अमेठीनेही त्यांना आता नाकारले आहे. तेव्हा गांधी आडनावाची जादू आता ओसरते आहे, निव्वळ तेवढ्यावरच भिस्त ठेवून काहीही साध्य होणार नाही, हे वास्तव हा पक्ष कधी ध्यानात घेणार आहे कुणास ठाऊक? काँग्रेस पक्षाला आज स्वत:ला मुळापासून सावरण्याची गरज आहे, आणि मातीतील-रस्त्यावरील माणसाशी संवाद साधला जाण्यासाठी नेतृत्वही तळागाळातून आलेले हवे असते. परंतु काँँग्रेस आपले घराणेशाहीचे जोखड केव्हा उतरवणार कुणास ठाऊक?

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply